समान नागरी कायदा

ऑक्टोबर २०१६ मध्ये ‘समान नागरी कायदा’ विषयावर देशभरात वाद निर्माण करून मुस्लीम समाज पुनःश्च आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. चहूबाजूने मुस्लीम समाजावर वादविवाद स्वरुपात आक्रमक हल्ले होऊ लागले. देशभरातील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या राष्ट्रीय संकटाचा सामना करण्यासाठी पुढे सरसावल्या. यासाठी आपल्या अमूल्य वेळेचे, विद्वत्तेचे आणि बुद्धिमत्तेचे योगदानच काय तर बलिदानही देऊ लागल्या. मोठमोठे विद्वान आणि ज्ञानी पंडित आपले ज्ञान पाजळू लागले. अल्पशिक्षित मुस्लीम समाज चौफेर झालेल्या कुवैचारिक हल्ल्याने कावराबावरा झाला.

परंतु या वादाचा समान नागरी कायद्याच्या नावाने निर्माण करण्यात आलेल्या वादाचा परिणाम असा झाला की सुशिक्षित, सुज्ञ मुस्लीम तरुणवर्ग विचार करू लागला. वारंवार मुस्लीम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते, याचा शोध घेऊ लागला. अभ्यासाअंती आपले संतुलित मत मांडून वैचारिक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू लागला. संवादाच्या माध्यमातून मुस्लीम समाजाबद्दल असलेले गैरसमज दूर करून मुस्लीम समाजाच्या वास्तविक समस्या काय आहेत, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू लागला. मीदेखील असाच एक छोटासा प्रयत्न करून पाहिला. ‘फुल न फुलाची पाकळी’ म्हणून मी ‘समान नागरी कायदा’ या विषयावर १० छोटेखानी लेख लिहिले. प्रस्थापित वृत्तपत्रांनी त्या लेखांची साधी दखलही न घेतल्याने मी Social Media च्या माध्यमातून ते लेख सामान्यांपर्यंत पोहोचविले. राज्यभरातून माझ्या लेखांना सर्वच जातीधर्माच्या अभ्यासू मंडळींनी पसंत केले. पाहता पाहता Social Media वर माझी लेखमाला चांगलीच लोकप्रिय ठरली. या लेखांना पुस्तक रुपात संपादित करून प्रकाशित करण्याची मागणी होऊ लागली. बराचकाळ मी या मागणीकडे हंगामी मागणी समजून कानाडोळा केला. परंतु दिवसेंदिवस या मागणीचा जोर वाढतच गेला. सर्वच स्तरातून ही मागणी होऊ लागल्याने शेवटी मी या लेखमालेला पुस्तक रुपात प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला.

ऑक्टोबर २०१७ ला या लेखमालेचे पुस्तकाच्या रुपात प्रकाशन करण्यात आले. न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटीलसारख्या कायदेपंडिताने पुस्तकाची स्तुती केली. मुस्लिम समाजातील अनेक जमाती, तंजीम आणि इदाऱ्यांनी पुस्तकाचे मोफत वितरण केले. अनेक मौलाना, विद्वान आणि विचारवंतांनी पुस्तकाला आपल्या पंसतीची पावती दिली. प्रकाशनाच्या ५ महिन्यांच्या आतच पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची हातोहात विक्री झाली. दुसऱ्या आवृत्तीची मागणी होऊ लागली. पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे आणि मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात समाजजागृती व्हावी या उद्देशाने फेब्रुवारी २०१८ पासून पुस्तकाच्या PDF प्रती सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोफत वितरीत करण्यात येत आहेत.

जर तुम्हाला सदरील पुस्तक उपयुक्त वाटत असेल तर हे पुस्तक तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाने किंवा तुमच्या संस्थेच्या नावाने प्रकाशित करू शकता. सामाजिक जनजागृतीसाठी सदरील पुस्तकाच्या आशयात, प्रकरणात, लेखात, परिच्छेदात कोणताही बदल न करता विक्री किंवा मोफत वितरणासाठी प्रकाशनाची खुली परवानगी देण्यात येत आहे. प्रकाशित आवृत्तीच्या काही प्रती संदर्भासाठी लेखकाकडे पाठविण्यात याव्यात. प्रकाशनासाठी Original Document File विनामूल्य दिली जाईल.

समाज जागृतीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा. पुस्तक Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *