प्रकरण १ – || हे राज्य अवघ्यांचे | सर्व जातीपातीने ते रक्षावे ||

स्वराज्य सर्वांचे होते. स्वराज्याची संकल्पना सर्वसामान्य जनता आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी होती. अशा लोक कल्याणकारी राज्याचे रक्षण करणे सर्वांची सामुहिक जबाबदारी असते. स्वराज्य हे रयतेचे राज्य होते, सर्वसामान्यांचे राज्य होते! म्हणून शिवाजी राजांचे ब्रीदवाक्य होते,

|| हे राज्य अवघ्यांचे | सर्व जातीपातीने ते रक्षावे ||

परंतु याच्या अगदी विपरीत आपण पाहतो की मागील काही दशके स्वराज्याबाबत अनेक प्रकारे अपप्रचार केला गेला. शिवाजी राजांना मुस्लिमांचा शत्रू ठरवून मुस्लिम सत्तेचा विध्वंस करू पाहणारा राजा म्हणून सर्वसामान्य जनतेसमोर सादर केले गेले. शिवाजी राजांचे राज्य हे केवळ हिंदूंचे राज्य होते, शिवाजी राजे मुस्लिमांचे कट्टर शत्रू होते, मुस्लिमांचा कर्दनकाळ होते; असा खोडसाळ अपप्रचार स्वार्थी आणि संकुचित मानसिकतेने केला. महाराष्ट्राचे दुर्दैव असे की आजदेखील अशाप्रकारचा अपप्रचार सातत्याने केला जातो आहे.

शिवाजी राजे जर खरेच मुस्लिमांचे शत्रू असते; तर मर्द मुस्लिमांनी स्वराज्यासाठी चाकरी केली असती का? शिवाजी राजांच्या दीड लाख घोडेस्वारांपैकी सहासष्ठ हजार घोडेस्वार मुस्लिम होते. तसेच त्यांचे १९ मुख्य सरदार मुस्लिम होते.[1] शिवाजी महाराजांच्या सैन्यात प्राणाची बाजी लावणारे अठरापगड जातीजमातीतील आणि मुस्लिम समाजातील असंख्य लोक होते. त्यांचे राज्य जर अधर्मांध[2] मानसिकतेवर आधारित असते तर मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या भगव्या झेंड्याखाली कधीच लढले नसते. स्वराज्य हे केवळ हिंदूंचे राज्य अजिबात नव्हते, तसेच ते मुस्लिमविरोधी राज्यदेखील कधीच नव्हते. आधुनिक इतिहास संशोधकांनी बरेच संशोधन करून सत्य समाजासमोर आणण्याचे काम केले आहे. याबाबत भाष्य करताना चंद्रशेखर शिखरे लिहितात, “शिवाजी महाराजांचा लढा ज्या सत्तांविरुद्ध होता त्या सर्व सत्ताधिशांचा धर्म इस्लाम होता. त्यामुळे या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे रूप देणे सोपे झाले आहे. परंतु शिवाजी महाराजांचे वडील, त्यांचे आजोबा व त्यांचे मामा आणि त्यांचे अनेक नातेवाईक हे मुसलमान सत्ताधिशांकडून लढले ही गोष्ट आपण दुर्लक्षित करतो. ज्या काळात अक्षरशः लाखोंच्या संख्येने हिंदू सैनिक या चार-पाच मुसलमान शाह्याकडून लढत होते, त्याच काळात शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिकांचा समावेश होता. राजाचा धर्म म्हणजे राज्याचा धर्म असे चुकीचे गृहीतक आधुनिक इतिहासकारांनी जनसामान्यांमध्ये रुजवून या संघर्षाला हिंदू-मुस्लिम संघर्षाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यकार्यात अनेक मुस्लीम सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.”[3]

मुस्लिम शाह्यांमध्ये लाखाने मोजावे लागतील इतके हिंदू चाकरी करत असताना त्या शाह्या हिंदू विरोधी होत्या असे म्हणणे म्हणजे अकलेची दिवाळखोरी जाहीर करण्यासारखेच आहे. तसेच शिवाजी राजांच्या सैन्यामध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम चाकरी करीत असताना शिवाजी राजे मुस्लिमद्वेष्टे होते किंवा मुस्लिमांचा कर्दनकाळ होते म्हणणे हा शुद्ध बावळटपणाच आहे. एखादी मुस्लिम शाही हिंदूविरोधी असताना कोणता असा हिंदू असेल जो हिंदुविरोधी मुस्लिमशाहीत चाकरी करेल? तसेच शिवशाही मुस्लिमविरोधी असती तर कोणत्या मुस्लिमाने शिवशाहीत चाकरी पत्करली असती? एखाद-दुसरा अपवादाने आढळला असता तर आपल्याकडे तसे गृहीत धरायला निदान जागा तरी राहिली असती. परंतु हजारो आणि लाखोंच्या संख्येने सैनिक परधर्मीय शासकांकडे चाकरी करीत असताना, केवळ शासकांचा धर्म वेगळा होता म्हणून त्यांच्या संघर्षाला धर्मसंघर्षाचे रूपे देणे अत्यंत घातक आणि पक्षपातीपणाचे आहे. आपण या दोन्ही प्रश्नांची उत्तरे स्वतंत्रपणे शोधण्याचा प्रयत्न करूयात.

शिवाजी राजे मुस्लिम द्वेष्टे होते का?
सर्वप्रथम हे पाहूयात की शिवाजी राजे मुस्लिमद्वेष्टे होते का? शिवाजी राजे मुस्लिम द्वेष्टे होते, ते मुस्लिमांचा द्वेष करायचे. शिवाजी राजांशी निष्ठा राखायची असेल तर मुस्लिमांचा द्वेष करायलाच हवा. परिणामी देशाला मुस्लिममुक्त करायलाच हवे; अशा स्वरूपाचा अपप्रचार करून बहुसंख्यांक समाजातील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम काही असामाजिक प्रवृत्ती करीत असतात. इतिहासातील प्रभावशाली चरित्रांना आपल्या राजकारणातील एक प्रभावी अस्त्र म्हणून हे स्वार्थी लोक वापरत असतात. परंतु खरेच शिवाजी राजे यांनी जो संघर्ष केला, तो मुस्लिम विरोधी होता का, हे पाहणे गरजेचे आहे.

‘दगलबाज शिवाजी’च्या माध्यमातून शिवाजी राजांची मुत्सद्देगिरी प्रभावीपणे मराठी वाचकांसमोर मांडणारे प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात ते तर तुम्ही वाचलेच असेल. नसेल वाचले तर हे घ्या, वाचा. ते लिहितात, “शिवाजी काय मुस्लिम द्वेष्टा होता? मुळीच नाही. तो कोणाचाच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती. त्या गुलामीचा तो द्वेष्टा होता…. त्याने अफझलखानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान होता म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय.”[4]

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे[5] प्रबोधनकार ठाकरे स्वतः शिवाजी राजे मुस्लिम द्वेष्टा नसल्याचे सांगतात. शिवाजी राजांचा तत्कालीन संघर्ष हा पूर्णतः सत्तेचा संघर्ष होता. धर्म कधीच त्या संघर्षाचा प्रेरक नव्हता. शिवाजी राजांच्या संघर्षाला धार्मिक रंग देण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे. त्याबद्दल भाष्य करताना ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य म्हणतात, “काही लोकांनी शिवरायांच्या लढ्याला धार्मिक लढ्याचे स्वरूप दिले. ते भारताच्या सार्वभौमत्वासाठी अत्यंत घातक आहे. आपली राजकीय पोळी भाजून छत्रपती शिवरायांना मुस्लिम द्वेष्टे म्हणून समाजासमोर आणणे ही शिवरायांची फार मोठी वैचारिक बदनामीच आहे. शिवरायांना मुस्लिमांच्या विरोधी उभे करणे हे सुद्धा राजकीय पक्षांचे षड्यंत्र आहे.”[6]

विषय स्पष्ट व्हावा म्हणून आणखीन एक संदर्भ पाहूयात. श्यामसुंदर मिरजकर यासंदर्भात भाष्य करताना म्हणतात, “तो कालखंड हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्ता संघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हिंदू विरुद्ध मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते. मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. शिवरायांच्या विरोधात जावळीच्या चंद्रराव मोरे, बाजी घोरपडेपासून मिर्झा राजा जयसिंगापर्यंत अनेक हिंदू लढले आहेत. तर आरमार प्रमुख दौलतखान आणि दर्यासारंग, तोफखानाप्रमुख इब्राहीम खान, स्वराज्याचा पहिला सरनोबत नूरखान बेग, अफझलखान वधा वेळचा शिवरायांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहीम, आग्रा भेटीतील विश्वासू सेवक मदारी मेहतर, वकील काझी हैदर असे अनेक मुस्लिम इमानदारीने शिवरायांच्या बाजूने लढले आहेत. याचा अर्थ हा दोन धर्मातील संघर्ष नव्हता असाच आहे.”[7]

हिंदुत्ववाद्यांचे लाडके प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांचे विचारही याबाबतीत पाहण्यासारखे आहेत. पहा ते काय लिहितात. ते लिहितात, “आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातला कुशल सेनापती, युद्धनीतितज्ञ आणि मुत्सद्दी असा राजा होता. इ.स. १६८१ मध्ये आपल्या लक्षावधींच्या फौजा घेऊन औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला त्यावेळी त्या संघर्षाचे स्वरूप आशयाच्या दृष्टीने धार्मिक नव्हते. एक तर औरंगजेबाच्या सैन्यात अक्षरशः लाखांनी मोजावे लागतील एवढे मोठे प्रमाण हिंदू सैनिकांचे होते. नुसते सैनिकच नव्हते, तर अनेक सरदार आणि सेनापती हेही हिंदू धर्माचे होते. औरंगजेबाच्या सैन्यात असणाऱ्या हिंदूंना हा लढा दोन धर्मामधील आहे असे वाटलेले दिसत नाही. स्वत: औरंगजेबसुद्धा मराठ्यांच्या राज्याबरोबर आदिलशाह व कुतुबशाह ही दोन मुस्लिम राज्ये नष्ट करण्याचे ठरवून आलेला होता! मुसलमान आदिलशाह व कुतुबशाह आणि हिंदू संभाजी एका बाजूला आणि मुसलमान औरंगजेब, त्याचे लाखो हिंदू सैनिक व शेकडो हिंदू सरदार दुसऱ्या बाजूला – असा हा संघर्ष होता. हा दोन धर्मांच्यामधील संघर्ष नव्हता.”[8]

शिवरायांच्या कालखंडात मोगल, आदिलशाह, कुतुबशाह यांची सत्ता होती. स्वराज्याच्या स्थापनेसाठी यांच्याशी लढणे अपरिहार्य होते. त्यामुळे शिवाजी राजांनी दिलेला लढा हा धार्मिक नव्हे तर राजकीय लढा होता. शिवरायांचा संघर्ष इस्लामविरोधी किंवा मुस्लिमविरोधी नव्हता. शिवाजी राजांचा लढा मुस्लिमविरोधी असल्याचा एकही पुरावा आपल्याला सापडत नाही. आज शिवाजी राजांची २०३ अस्सल पत्रे उपलब्ध असून त्यामध्ये त्यांनी त्यांच्या शत्रूचा उल्लेख मोगल, आदिलशाह असा केला आहे. मुसलमान असा उल्लेख कोठेही नाही.[9] जर त्यांचे शत्रुत्व मुस्लिमांशी असले असते तर तसा उल्लेख केलेला आपल्याला दिसून आला असता.

हिंदू स्वराज्य नव्हे हिंदवी स्वराज्य:
शिवाजी राजे मुस्लिमविरोधी होते हे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी ‘हिंदवी स्वराज्या’चा आधार घेतला जातो. शिवाजी राजांनी आपल्या स्वराज्याला ‘हिंदवी स्वराज्य’ संबोधले. म्हणून काहींना आपल्या धर्माधीष्टीत राज्याचे जोखड शिवाजी राजांच्या खांद्यावर टाकण्याची संधी मिळाली. त्यामुळे ते आपला माल ते शिवाजी राजांच्या नावाचा वापर करून विकू लागले. आमचे हिंदू राष्ट्र ही शिवाजी राजांचीच इच्छा आहे असा अपप्रचार करून लागले. परंतु आधुनिक इतिहासकार हे स्पष्ट करतात की शिवाजी राजांच्या हिंदवी स्वराज्याचा अर्थ हिंदूचे राज्य असा कधीच नव्हता. गृहीत धरा की शिवाजी राजांना केवळ हिंदूंचेच राज्य अपेक्षित होते तर मग प्रश्न निर्माण होतो की हिंदू या प्रचलित शब्दाचा प्रयोग न करता, हिंदवी शब्दाचा प्रयोग का म्हणून केला? हिंदवी या शब्दाचा प्रयोग करण्यामागे काय कारण असावे? याचे उत्तर देताना प्रा. मा. म. देशमुख म्हणतात की “आज ज्या अर्थाने भारत किंवा भारतीय हे शब्द वापरले जातात, मध्ययुगात त्याच अर्थाने हिंदवी हा शब्द वापरला जात असे. हिंदवी स्वराज्य हे केवळ हिंदूंचे राज्य नसून सर्वजातीधर्मीय राज्य होते.”

शिवाजी राजांचे राज्य हिंदू राज्य अजिबात नव्हते, याच्या समर्थनार्थ आणखीन एक पुरावा पहा. प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, “अनेकांच्या मनात वर्तमानकाळातील हिंदूविरोधी मुसलमान[10] अशाप्रकारचा झगडा असतो. स्वतःच्या मनातील असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काही जणांची धडपड असते. या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे हिंदूंचा राजा म्हणून आणि त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही. ते स्वतः हिंदू धर्मियांच्या धार्मिक राजवटीच्या निर्मितीसाठी झगडत नव्हते. आपल्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक आदेशांनुसार श्रुती-स्मृती-पुराणांना अनुसरून एक राज्य निर्माण करण्याची त्यांची इच्छा नव्हती; तसा त्यांचा प्रयत्नही नव्हता. प्रत्यक्ष त्यांच्या स्वतःच्या आरमारात दर्यासारंग दौलत खान, इब्राहीम खान असे अनेक मुस्लिम अधिकारी होते. त्यांच्या फौजेत विजापूरहून आलेले सातशे पठाणही होते.[11] त्यांनी स्वतः सर्व मुस्लिम धर्मस्थानांना संरक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. राजकारणाच्या पटावर औरंगजेबाविरुद्ध ते उभे होते, तरी त्यांनी औरंगजेबाला त्याचे पणजे अकबर बादशाह यांच्या थोरवीची आठवण करून दिली आहे. कुतुबशाहीशी त्यांचे संबंध प्रायः प्रेमाचे आणि मित्रत्वाचे राहिले.”[12]

यावरून हे सिद्ध होते की शिवाजी राजांचे राज्य मुस्लिमविरोधी नव्हते. तसेच ते राज्य हिंदूंचेही नव्हते. आता आपण पाहूयात की मध्ययुगातील मुस्लिम शाह्या हिंदूविरोधी होत्या का? कारण केवळ एक बाजू पाहिल्याने शिवाजी राजांचे स्वराज्य कधीच कळणार नाही. शिवाजी राजांचे स्वराज्य समजण्यासाठी दुसरी बाजू पाहणे गरजेचे आहे.

 

[1] बेरिंगे श्रीकांत, छत्रपती शिवराय आणि इस्लाम, पृ. ९
[2] धर्मांध शब्दावर माझा आक्षेप आहे. धर्म माणसाला अंध नव्हे डोळस बनवतो. धर्माने नव्हे तर अधर्माने माथेफिरूंना अंध केलेले असते म्हणून मी ‘अधर्मांध’ असा शब्दप्रयोग करतो.
[3] शिखरे चंद्रशेखर, प्रतिइतिहास, पृ.२३
[4] ठाकरे प्रबोधनकार, दगलबाज शिवाजी, पृ. ३७
[5] प्रबोधनकरांचे हिंदुत्व आणि हिंदुत्वववाद्यांचे हिंदुत्व यात जमीन आस्मानचे अंतर आहे.
[6] बेरिंगे श्रीकांत, छत्रपती शिवराय आणि इस्लाम, पृ. १७
[7] बेरिंगे श्रीकांत, छत्रपती शिवराय आणि इस्लाम, पृ. १८-१९
[8] कुरुंदकर नरहर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, पृ. १७
[9] श्रीकांत बेरिंगे, छत्रपती शिवराय आणि इस्लाम, पृ. २८-२९
[10] ‘पुरोगामी’ ‘समाजवादी’ प्रा. नरहर कुरुंदकर अतिशय धूर्तपणे मुसलमानांना हिंदूविरोधी ठरवितात.
[11] ‘सातशे पठाण’च्या समर्थनार्थ अधिकृत दस्तावेज सापडत नाहीत. म्हणून ही माहिती खरी मानली जाऊ शकत नाही.
[12] कुरुंदकर नरहर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, पृ.१५

One thought on “प्रकरण १ – || हे राज्य अवघ्यांचे | सर्व जातीपातीने ते रक्षावे ||

  • May 29, 2018 at 1:39 PM
    Permalink

    Thank u sir.. For this knowledge and information!!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *