प्रकरण ७ – भारतात इस्लामचा प्रचार

मुसलमानांचा भारतावर विजय:
मध्ययुगीन इतिहासातील मुस्लिमांच्या भारतवर्षावरील विजयाला देशाच्या दृष्टीने अवनतीचे कारण ठरविले जाते. परंतु याबाबतीत विवेकानंद अगदी विरुद्ध विचाराचे आहेत. अमेरिकेतील ‘अमेरिकन सोशल सायन्सेस असोसिएशन’ च्या परिषदेत विवेकानंदांनी दोन व्याख्याने दिली. अनेक विद्यापीठांतील विविध ज्ञानशाखेतील संशोधक आणि प्राध्यापक यांची ही संघटना. तेथे त्यांनी धर्म आणि तत्वज्ञानाला बाजूला ठेऊन कोणता विषय निवडला असेल? तर तो विषय होता ‘भारतातील मुस्लिमांची राजवट’. भारतीय संस्कृतीच्या विकासातील, सुधारणेतील योगदान ते अगदी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रमाणेच अगदी सडेतोड, वस्तुनिष्ठ, प्रामाणिक आणि बिनधास्तपणे मांडतात. त्यांच्या व्याख्यानाचा सार त्यांच्या शब्दांत असा मांडता येईल, “मुसलमानांच्या विजयामुळे आपल्याला पुष्कळ चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या यात शंका नाही.” [1]

भारतावर मुस्लिमांनी केलेल्या विजयी स्वाऱ्या इस्लाममुळे नसून त्या काळातील तत्कालीन नियमांनुसार होत्या. ज्याप्रमाणे सिकंदर आणि नेपोलियन जग जिंकण्यास निघाले होते, त्याप्रमाणे काही मुस्लिम शासकदेखील निघाले होते. त्यातही भारतावर स्वारी केलेल्या अनेक मुस्लिम शासकांचे मूळ याच मातीत होते. त्यांच्या स्वाऱ्या शासक असल्यामुळे होत्या, त्यांच्या मुस्लिम असल्यामुळे नव्हे! विवेकानंद म्हणतात, “ज्या तुर्क प्रभृती तार्तर जाती बौद्ध धर्म सोडून मुसलमान झाल्या, तेव्हा त्यांनी हिंदू, अरब, पारशी साऱ्यांनाच जिंकून टाकले. भारतवर्ष जिंकणाऱ्या समस्त मुसलमानांपैकी कुणीही अरबी किंवा पारशी नव्हता, सर्वच तुर्क, तार्तर होते. भारतावर स्वाऱ्या करणाऱ्या समस्त मुसलमानांना राजपुतान्यात ‘तुर्क’ म्हणत – आणि तेच खरे आहे, तेच ऐतिहासिक सत्य आहे. राजपुतान्यातील भाटांनी जे गायले आहे – ‘तुरुगनको बढीजोर’ – ‘तुर्क फार जबरदस्त’ – तेच ठीक. कुतबुद्दिनपासून तो मोगल बादशाहपर्यंत सारेच तार्तर होते – ज्या जातीचे तिबेटी, त्याच जातीचे होते. फक्त ते मुसलमान बनले आणि हिंदूंशी व पारशांशी लग्नसंबंध जोडून त्यांनी आपले थापट, गोल चेहरे बदललेत इतकेच. [2]

एकेश्वरवादाच्या वैचारिक शक्तीमुळे एका झंझावताप्रमाणे जगात सर्वदूर इस्लामचा प्रसार झाला. एक सर्वव्यापी, निरपेक्ष आणि सामर्थ्यशाली निर्मात्याची संकल्पना जगभरातील लोकांना प्रभावित करीत होती आणि आजदेखील करीत आहे. एकेश्वरवादाने जगात व्यवहारात समता प्रस्थापित करून दाखविली. मुस्लिम समाज समतेच्या बाबतीत जगात एक आदर्श समाज ठरला. या समतेने प्रभावित होऊन भारतातील दीनदलितांनी इस्लामचा स्वीकार केला. १५ नोव्हेंबर १८९४ रोजी हरिदास बिहारीदास देसाई यांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, “भारतात गरिबांमधूनच इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक मुसलमान झालेले का आढळतात? केवळ तलवारीच्या जोरावर त्यांच्यात असे धर्मांतर घडवून आणले गेले असे म्हणणे म्हणजे महामूर्खपणाच होय. त्यांनी धर्मांतर केले… जमीनदारांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी… पुरोहितांच्या हातातून मुक्त होण्यासाठी – स्वाधीनतेसाठी. म्हणून बहुसंख्य जमीनदार असलेल्या बंगालमध्ये मुसलमान किसानांची संख्या हिंदू किसानांपेक्षा अधिक आढळून येते. या लाखो अवनत व दलित नरनारींच्या उद्धाराची चिंता आहे कुणाला? मुठभर पदवीधर किंवा मुठभर धनिक म्हणजे काही देश नव्हे.” [3]

भारतीय समाजातील जातीव्यवस्थेचे उच्चाटन करण्याचा विचार इस्लाम आणि मुस्लिमांच्या आगमनानंतर मांडला गेला. म्हणून जातीव्यवस्थेच्या समर्थकांचा मुस्लीमांप्रती द्वेष अगदी टोकाचा असतो. मद्रास येथे दिलेल्या व्याख्यानात विवेकानंद म्हणतात, “या जातीविशिष्ट (वर्णव्यवस्था) अधिकारांना नष्ट करण्याचे श्रेय मुसलमान शासकांनाही दिले पाहिजे. त्यांचे शासन तसे पाहिले तर पूर्णपणे वाईट नव्हते. कोणतीही गोष्ट सर्वस्वी वाईट वा चांगली नसते. भारतावर मुसलमानांनी मिळवलेला विजय गरिबांच्या आणि दलितांच्या उन्नतीस कारणीभूत झाला. म्हणूनच आपल्यापैकी एक पंचमांश (२०%) लोक मुसलमान बनले. तलवार व बंदुका यांनीच हे सर्व घडवून आणले असे समजणे कमालीचा वेडेपणा ठरेल.” [4]

मोगल शासनाला हिंदू धर्मविरोधी शासन म्हणून सादर केले जाते. मोगलांच्या धर्मसहिष्णुतेबद्दल भाष्य करताना ‘पूर्व आणि पश्चिम’ मध्ये विवेकानंद म्हणतात,  “अर्वाचीन काळात पठाण घराणी येत होती नि जात होती, एकही इथे टिकून राहून राज्य करू शकले नाही, का की ते हिंदूंच्या या धर्मावर सारखे आघात करीत होते. तेच मोगलांचे राज्य बघा, कसे सुदृढ, सुप्रतिष्ठित नि किती विलक्षण बलशाली झाले. का? कारण हेच की मोगलांनी या ठिकाणी घाव घातला नाही. मोगल सिंहासनाचे आधारस्तंभ हिंदूच तर होते – जहांगीर, शहाजहान, दारा शिकोह या साऱ्यांच्या आया हिंदूच होत्या की!” [5]

मोगल हे पूर्वाश्रमीची बौद्धधर्मीय मंगोल जमात! मंगोल जमातीचा इतिहास म्हणजे रक्तपाताचा, संहाराचा इतिहास. मंगोल जगात जेथे कोठे गेले तेथे त्यांनी भंयकर कत्तली केल्या, संहार केला. चंगेज खान, हलाकू खान आणि कुबलाई खान हे अत्यंत क्रूर असे मंगोल शासक. या मंगोल जमातीला सभ्य करण्याचे श्रेय इस्लामचे! केवळ लढाया आणि रक्तपात करणारी मंगोल जमात इस्लाम स्वीकारताच स्थिर झाली. राज्य आणि प्रशासनात इस्लामी चिंतनाचा प्रभाव दिसू लागला. लेखन, साहित्य आणि कलाविषयी जागरूकता वाढीस लागली. विवेकानंद म्हणतात, “मोगल बादशाहांच्या राजवटीत कलेचा खूप विकास झाल्याचे आढळून येते. त्यांच्या कलेची गौरवमय स्मारके म्हणून आजही ताजमहाल, जुम्मामशीद (दिल्लीची जामा मस्जिद) वगैरे कृती भारतात विद्यमान आहेत.”[6] मुघलांचे शासन क्रूर होते म्हणणाऱ्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. कला, संस्कृती आणि सभ्यतेचा विकास तर शांती आणि समृद्धीच्या काळात होतो. जर मुघल शासन क्रूर आणि जालीम शासक होते तर मुघल काळात कलेचा विकास कसा झाला? मोगल काळात गंगा-जमनी संस्कृती आपल्या परमोच्च शिखरावर कशी विराजमान झाली? सभ्यतेने आदर्श कसा काय निर्माण केला?

[1] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ५, पृ. १७३
[2] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – १, पृ. ३३९
[3] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – २, पृ. ३६३
[4] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ५, पृ. १९३
[5] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – १, पृ. २९१
[6] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ६, पृ. १२९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *