प्रकरण १५ – सेकंड इनिंग

मुस्लीम कायद्यावर एक आक्षेप असाही घेतला जातो की मुस्लीम समाजात विवाहासाठी वयोमर्यादा निर्धारित केलेली नाही. वयस्कदेखील उतरत्या वयात विवाह करताना दिसतात. मुस्लीम कायद्यात विवाहासाठी वयोमर्यादा महत्वाची नाही, कारण प्रेमात पडण्यासाठी वयाची अट नसते. प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो त्यांच्यावर) म्हणाले की प्रेमात पडलेल्या व्यक्तीकरिता विवाह एक अमूल्य भेट आहे. परंतु आयुष्याची एक खेळी खेळलेल्या व्यक्तीला दुसरी खेळी खेळण्याची इच्छा असेल तर समाज मान्यता देतो का? म्हणजे अर्धे आयुष्य जगलेल्या माणसाला उतारवयात प्रेम होत असेल किंवा झालं असेल तर त्याच्या विवाहाला समाज मान्य करेल का? हा प्रश्न आहे सेकंड इनिंग वाल्यांचा.

दिल पे किसका जोर?
कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात प्रेमात पडू शकते. प्रेमासाठी वयाचे बंधन नाही. प्रेमासाठी कोणतेच बंधन नाही. प्रेम कोणालाही होऊ शकते. ज्या मानवी भावना मानवाच्या हृदयात, प्रवृत्तीत लहानपणापासून असतात त्या भावना वयाच्या एक ठराविक मर्यादेनंतर संपुष्टात याव्यात अशी अपेक्षा आपण कशी करू शकतो? राग सर्वांना येतो, कोणत्याही वयात राग येऊ शकतो. दया सर्वांच्या हृदयात असते, दयेला वयाचे कसले बंधन? कोणत्याही मानवी भावनेवर आपण वयाचे निर्बंध नाही, तर मग हे बंधन प्रेमावर का लादले जाते? तरुण वयातील प्रेम नैसर्गिक पण म्हातारपणात प्रेम म्हटले की आपल्या कपाळी आठ्या का पडतात?

प्रेमींना एकत्र येऊ द्या:
प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण आहे का? शारीरिक आकर्षणापुरती मर्यादित प्रेमाची व्याख्या भयानक आहे. आज तर तरुण पिढीसाठी हेच प्रेम आहे. परंतु प्रेम याच्या पलीकडे आहे, प्रेम केवळ शारीरिक आकर्षण नव्हे, प्रेम एक नैसर्गिक ओढ आहे. प्रेम भावनिक बंध आहे, प्रेम आत्म्याचा गंध आहे. शरीर कुरूप असेल तरी हवीहवीशी वाटणारी साथ आहे तर प्रेम आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असेल तर प्रेम आहे. जर असे प्रेम असेल तर या प्रेमींना एकत्र येऊ द्या. प्रेषित मुहम्मद (शांती असो त्यांच्यावर) म्हणतात विवाह दोन प्रेमींसाठी एक अमूल्य भेट आहे. (अबू दाउद)

जीव कासावीस होतो:
पुरुष असो की स्त्री, दोघांनाही परस्पर आकर्षण आहे एकमेकांसाठी. हे आकर्षण केवळ शारीरिक नाही तर भावनिक आहे, आत्मिक आहे, मानसिक आहे. कारण पुरुष असो अथवा स्त्री एकटे असताना अपुरे आहेत. अर्धवट आहोत याची जाणीव आहे आणि पूर्ण व्हायची नैसर्गिक आस, अतृप्त भावना त्यांच्यात आहेत. चुंबकाचे दोन तुकडे ज्या प्रकारे एकमेकांकडे आकर्षिले जातात अगदी त्याचप्रकारे स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षिले जातात. पूर्णत्वाला प्राप्त करण्यासाठी. पूर्ण होण्यासाठी. तिच्या शिवाय त्याचा आणि त्याच्या शिवाय तिचा जीव कासावीस होतो.

थकलेल्यांना आधार:
जन्माला आलेला माणूस चालू-बोलू लागतो. या जगाच्या धावपळीत धावू-पळू लागतो. लहानपण मागे सुटले की व्यावहारिक बनतो. कधी कधी मानवी भावनांचा अतिरेक झाला तर व्यवहार धाब्यावर ठेऊन आपल्या भावना सर्रास व्यक्त करतो. प्रेम असेल तर जाहीरपणे कबुल करतो. संसारात रमतो, मुलाबाळांसाठी उभे आयुष्य खर्ची घालतो. या धावपळीत तो आपले आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतच असतो. परंतु या आयुष्याच्या एखाद्या वळणावर त्याचा साथीदार त्याची साथ सोडून निघून जातो. कोणाची फारकत होते तर कोणाचा साथीदार या जगाचा निरोप घेतो. साथीदार गमावल्याने तो एकाकी पडतो. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खचतो. या वळणावर त्याला एका नव्या साथीदाराची गरज पडते.

कामवासना नव्हे आधाराची गरज आहे:
ज्येष्ठांना खऱ्या आधाराची गरज ही आयुष्याच्या उत्तरार्धात असते. त्यांच्या जीवनातील एकाकीपणा दूर करण्यासाठी जीवनसाथीची आवश्यकता असते. यासाठी पन्नाशीपुढील विधवा, विधूर आणि फारकत घेतलेल्यांचा पुर्नविवाह लावण्याची मोहिम हाती घेण्याची गरज आहे. हा पुर्नविवाह म्हणजे कामवासनेसाठी नव्हे तर परस्परांना आधार देण्यासाठी असतो. वृद्धांनी उतारवयात केवळ नातवंडांशी खेळावे का? तुम्ही तुमच्या जीवनसाथी सोबत जगावे आणि त्यांनी एकटे जगावे, हा कसला नियम? जेंव्हा त्यांच्याकडे करण्यासाठी कसलेच काम नाही, घरात केवळ बसून राहणे इतकेच जीवन त्यांना जगायचे आहे तर दिवसाचे २४ तास, महिन्याचे ३० दिवस आणि वर्षाचे १२ महिने त्यांनी एकांतात का कंठावेत?

सेकंड इनिंग:
अशाच वृद्ध विधवा, विधुर आणि फारकत घेतलेल्यांसाठी आहे ‘सेकंड इंनिंग’. इस्लामने १४०० वर्षांपूर्वी वृद्धांना दिलेली विवाहाची मान्यता आता जगभरात मान्यता प्राप्त करू लागली आहे. जागतिक मुस्लीम समाजात वृद्धांचे विवाह अगदी सामान्य गोष्ट आहे. जसे तरुणांचे विवाह अगदी तसेच! तुम्ही गुगलवर साधे सर्च जरी केले तरी सर्वात जास्त रिझल्ट मुस्लीम समुदायातून मिळतात. परंतु भारतीय मुस्लीम समाजात हे प्रमाण नगण्य आहे. आमच्या उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद सारख्या ठिकाणी मुस्लीम समाजात असे विवाह अपवादाने का होईना निदान होतात तरी! परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात तर हे चित्र अगदीच दुर्मिळ आहे. इतर समाजातही हे प्रमाण अत्यल्प आहे.

सधन कुटुंबांनी ज्यांची मुले परदेशात स्थायिक झाली आहेत, इकडे एकटे जीवन जगण्यापेक्षा दुसऱ्या विवाहाचा पर्याय निवडला आहे. तसेच कित्येक सेवानिवृत्त अधिकारी जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तेदेखील याच दिशेने आपला प्रवास करीत आहेत. मुंबई, पुणे सारख्या शहरात यासाठी वृद्धांचे मेळावे आयोजित केले जात आहेत. परंतु समाज आजदेखील अशा लोकांना साशंक दृष्टीकोनातून पाहतो. समाजाला हे वास्तव आजदेखील पचलेले नाही.

वृद्धांच्या विवाहासाठी चळवळी:
‘चीनी कम’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून वृद्धांचे हे भावविश्व समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. एखाद्या वृद्धाला एखादी तरुणी आवडू शकते तर एखाद्या जेष्ठ बाईला एखादा तरुण आवडू शकतो. त्यांच्या आयुष्याचं समीकरण काय असेल ते स्वतः ठरवतील. प्रत्येक संबंधाकडे केवळ वासनायुक्त दृष्टीने पाहणारेच ‘वयाला’ प्रमाण मानून बिनबुडाची टीका करू शकतात. आज काही सामाजिक संघटना या अनुषंगाने काम करीत आहेत. समाजात यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे गरजेचे आहे. यामुळे वृद्धांचे आयुष्य सुखकर होईल आणि त्यांना एक मजबूत भावनिक आधार लाभेल यात कसलीच शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *