प्रकरण १३ – बहुविवाहाला कायदेशीर मान्यता

मुस्लीम व्यक्तिगत कायद्यातला सर्वात वादग्रस्त मुद्दा म्हणजे बहुविवाह. इस्लाममध्ये पुरुषाला देण्यात आलेली बहुविवाहाची परवानगी नेहमीच टीकेचा विषय ठरली आहे. या अनुषंगाने मुस्लीम स्त्रीवर होणाऱ्या कथित अत्याचाराचा पुळका अनेक मुस्लीम विरोधी संस्था आणि संघटनांना येतो. किती विपर्यास आहे पहा, ज्यांचे उभे आयुष्य मुस्लीम समाजाचा विरोध करण्यात गेले त्यांना मुस्लीम स्त्रियांचा पुळका येत आहे. असो. जगात पुरातन काळापासून विवाहाशी संबंधित अनेक संस्था प्रचलित आहेत. त्यापैकी एक संस्था बहुपत्नीत्व आहे. बहुपत्नीत्व म्हणजे एका पुरुषाला एकापेक्षा जास्त पत्नी असणे. बहुपत्नीत्व एक प्रचलित विवाह संस्था असून जगातील कोणताही देश, धर्म, समाज, जात, पंथ आणि संप्रदाय यास अपवाद नाही.

बहुपत्नीत्व एक पुरातन विवाहसंस्था:
काही लोकांना (मुस्लिम असो की मुस्लिमेत्तर) असा गैरसमज आहे की बहुपत्नीत्व इस्लामचा एक अविभाज्य भाग आहे किंवा जगात बहुपत्नीत्वाची संकल्पना इस्लामने सुरु केली आहे. असे काहीच नाही. बहुपत्नीत्व इस्लामचा भागही नाही आणि इस्लामने सुरु केलेली संस्थादेखील नाही. तसेच इस्लामच्या दृष्टिकोनात चांगला किंवा वाईट मुस्लिम असण्याशी बहुपत्नीत्वाचा काडीचाही संबंध नाही. पुरातन काळापासून समाजात एकापेक्षा अनेक स्त्री जोडीदार असण्याची संस्था चालत आली आहे. इस्लाम आणि बहुपत्नीत्वाबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण बहुपत्नीत्वाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊयात.

समाजात बहुपत्नीत्व संस्था:
इतिहासाचा अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की बहुपत्नीत्व एक पुरातन संस्था आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील शुद्धोधन यांना दोन पत्नी होत्या, त्याही सख्ख्या बहिणी होत्या. जर बहुपत्नीत्व इस्लामची देणगी असली असती तर शुद्धोधनाने २ पत्नी कशा केल्या? सम्राट अशोकाचे पिता राजा बिंदूसार यांना १६ पत्नी होत्या, तर सम्राट अशोकाला ५ राण्या होत्या.

पुरातन हिंदू धर्मात बहुपत्नीत्व संस्था:
व्यासलिखित पुरातन भारताच्या इतिहासात बहुपत्नीत्वाच्या असंख्य नोंदी आढळतात. कश्यपला १३ पत्नी होत्या, सोमाला २७ पत्नी होत्या तर अरीष्ट्नेमिला ४ पत्नी होत्या. रामाचे पिता दशरथ यांना ३ पत्नी असल्याचे प्रसिद्ध आहे. कृष्णाला ८ मुख्य पत्नी होत्या तर १६,१०० उपपत्नी होत्या. कृष्ण पिता वासुदेव यांस १६ किंवा १८ पत्नी होत्या. हनुमानाचे पिता केसरी यांना अंजनी आणि अद्रिका या २ पत्नी होत्या. गणेशला सिद्धी आणि रिद्धी या २ पत्नी असल्याचा उल्लेख शिव पुराण आणि रुद्र संहितेमध्ये आलेला आहे. मनुस्मृतीचा लेखक मनु यास १० पत्नी होत्या. अशी एक दोन नव्हे शेकडो उदाहरणे भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास अभ्यासला असता आपल्याला आढळून येतात.

भगवदगीतेचे भाष्यकार स्वामी प्रभुपाद बहुपत्नीत्वावर भाष्य करताना गीतेच्या टीकेत लिहितात, ‘वेदांच्या शिकवणीनुसार बहुपत्नीत्वाला परवानगी आहे. म्हणूनच कृष्णाने १६,००० विवाह केले; अर्जुनाने ४ आणि वासुदेवाने १६ किंवा १८ विवाह केले होते.’

बुद्ध धर्म आणि बहुपत्नीत्व:
बुद्ध धर्मात बहुपत्नीत्वावर कोणतेही निर्बंध नाहीत. थायलंड, म्यानमार, श्रीलंकामध्ये बहुपत्नीत्व प्रथा प्रचलित आहे. तिबेट तर बहुपत्नीत्वाचे माहेरघर म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे.

मध्ययुगीन भारतात बहुपत्नीत्व संस्था:
पुरातन काळापासून बहुपत्नीत्व संस्था समाजात मान्यताप्राप्त आहे. मध्ययुगीन इतिहासातही याचे पुरावे आढळतात. शहाजीराजेंना जिजाबाई आणि तुकाबाई या २ पत्नी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ८ विवाह केले होते. त्यांच्या पुत्राचे राजारामाचे ४ विवाह झाले होते. महाराज भूपेंद्र सिंग पटियाला यांना ५ पत्नी होत्या. उदयपूरचे महाराज फतेह सिंग यांना २ पत्नी होत्या. महाराजा रणजीत सिंग यांना ११ पत्नी होत्या. जयपूरचे राजे मानसिंग यांनी १२ विवाह केले होते. त्यांची राजधानी असलेल्या जयपूरच्या आमेर किल्ल्यामध्ये १२ राण्यांचे १२ महाल आजदेखील सुरक्षित आहेत.

आधुनिक भारतात बहुपत्नीत्व संस्था:
कोणी असे म्हणू नये की या पुरातन बाबी आहेत आणि आज असे होत नाही. प्रसिद्ध उद्योजक गजानन बिर्ला यांना एकापेक्षा जास्त पत्नी होत्या. दक्षिण भारताचे प्रसिद्ध उद्योजक पी. राजगोपाल यांचा दुसऱ्या पत्नीचा खटला भारतात चांगलाच गाजला. धर्मेंद्र यांना प्रकाश कौर आणि हेमामालिनी या दोन पत्नी आहेत. मुलायम सिंग यादव यांना मालती देवी आणि साधना गुप्ता या दोन पत्नी आहेत. रामविलास पासवान यांनी राजकुमारी देवी आणि रीना शर्मा यांच्याशी विवाह केले आहेत. वरील उदाहरणांपैकी एकही व्यक्ती इस्लामशी संबंधित नाही. उदाहरण देण्यामागे एवढाच हेतू आहे की बहुपत्नीत्व प्रत्येक काळात एक प्रचलित संस्था होती आणि आहे, हे सर्वसामान्यांना कळावे.

बहुपत्नीत्व संस्था आणि सामान्य भारतीय:
भारतात १५.२५ टक्के आदिवासी समाज बहुपत्नीधारक आहे, ६.७२ टक्के जैन समाज बहुपत्नीधारक आहे. ७.९ टक्के बौद्ध समाज बहुपत्नीधारक आहे. भारतात मुस्लिमांच्या अपेक्षेत हिंदू समाज जास्त बहुपत्नीधारक आहे. हिंदू समाजात ५.८ टक्के बहुपत्नीधारक आहेत. भारत सरकारच्या १९७१ च्या जनगणनेनुसार मुस्लिम समाजात बहुपत्नीधारकांची संख्या १२ लाख होती तर तीच संख्या हिंदू समाजात १ कोटी पेक्षा जास्त होती. 2005-06 National Family Health Survey च्या रिपोर्टनुसार भारतात १.८ टक्के हिंदू बहुपत्नीधारक आहेत. हिंदू लोकसंख्येच्या १.८ टक्के म्हणजे १.४ कोटी हिंदू बहुपत्नीधारक आहेत. मुस्लीम समाजातील बहुपत्नीधारकांचे प्रमाण या तुलनेत अगदीच नगण्य आहे. मुस्लीम समाजापेक्षा इतर समाजात यावर मोठ्या प्रमाणात आचरण केले जाते, तेही लपून-छपुन.

इ.स. १९९३ मध्ये अहमदाबादच्या आठ मुस्लिमबहुल प्रभागात केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की केवळ २७९ पुरुषांना दुसरी पत्नी आहे. नुकतेच महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल असलेल्या मालेगाव शहरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले की ५ लाख मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये केवळ १५१ पुरुष बहुपत्नीधारक आहेत. म्हणजे ही संख्या ०.१ टक्केदेखील नाही.

बहुपत्नीत्व आणि भारतीय दंडविधान:
भारतीय दंड विधानानुसार हिंदूंवर बहुपत्नीत्व बंदी आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा बहुविवाहापासून परावृत्त करण्यासाठी आहे. असे असून देखील कित्येक भारतीय (मुस्लिम वगळता) दुसरी पत्नी करतात. परंतु तिला कायद्यानुसार दुसऱ्या पत्नीला ‘पत्नी’चा दर्जा प्राप्त होत नाही, तर ती पतीची ‘ठेवलेली’ गृहीत धरली जाते. पहिल्या पत्नीने अन्याय होत असल्याची तक्रार केल्यावरच पतीविरोधात पहिल्या पत्नीवर अन्याय करत असल्याची केस होते. बहुपत्नीत्व अदखलपात्र गुन्हा आहे.

बहुपत्नीत्व आणि इस्लाम:
बहुपत्नीत्वाबाबतीत इस्लामवर केला जाणारा आरोप निराधार आहे. लक्षात असू द्यावे की इस्लाम बहुपत्नीत्वाची अंतिम संख्या निर्धारित करतो. जास्तीत जास्त ४! चार पेक्षा जास्त पत्नींना इस्लाम मान्यता देत नाही. इस्लाम बहुपत्नीत्वाचा जनक नाही आणि बहुपत्नीत्वाला प्रोत्साहितदेखील करीत नाही. जगातील कोणत्याच धर्मग्रंथात किंवा कोणत्याही देशाच्या संविधानात किंवा कोणत्याही देशाच्या कायद्यात असा नियम नव्हता की ‘विवाह एकीशीच करा’ परंतु कुरआनमध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे की ‘विवाह एकीशीच करा’ (पवित्र कुरआन ४:३)

काही लोकांना गैरसमज आहे की इस्लाम बहुपत्नीत्वाला प्रोत्साहन देतो. याबाबत चर्चा करताना इस्लामनुसार कर्मांची विभागणी कशाप्रकारे करण्यात आली आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. इस्लामनुसार कर्मांचे ५ प्रकार आहेत, ते खालीलप्रमाणे

1। फर्ज म्हणजे अनिवार्य
2। मुस्तहब म्हणजे प्रोत्साहित
3। मुबाह म्हणजे परवानगीकृत
4। मकरुह म्हणजे तिरस्कृत
5। हराम म्हणजे निषिद्ध

बहुपत्नीत्व प्रथा मुबाह या प्रकारात मोडते. बहुपत्नीत्वाला इस्लाम केवळ परवानगी देतो, प्रोत्साहन नाही. परंतु ही परवानगी न्यायाच्या अटीवरच देतो. पवित्र कुरआनमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे, “तुम्ही आपल्या निवडीच्या स्त्रियांशी विवाह करू शकता. दोन, तीन, चार; परंतु जर का तुम्ही न्याय करू शकणार नाही तर एकच पत्नी बरी!” (पवित्र कुरआन ४:३). परंतु कुरआन हेदेखील स्पष्ट करतो की पुरुष कितीही चांगला असला तरी तो न्याय करण्यास असमर्थ ठरणार, “तुम्ही कधीही न्याय करू शकणार नाही. (पवित्र कुरआन ४:१२९). बहुपत्नीत्व आणि इस्लामचा परस्पर संबंध जोडणे म्हणजे आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर करण्यासारखेच आहे. बहुपत्नीत्व एक प्रचलित संस्था आहे ज्याला इस्लामने परवानगी नाकारली नाही तर मर्यादा निश्चित केली आहे.

बहुपत्नीत्वाची परवानगी का देण्यात आली?
अशा स्त्रिया ज्यांच्याशी विवाह करण्यास सामान्य परिस्थितीत पुरुष पुढे पाऊल टाकणार नाहीत, अशा स्त्रियांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी देण्यासाठी इस्लामने बहुपत्नीत्वाला परवानगी दिली. उदा. मुतल्लका, विधवा, वांझोटी म्हणून सोडलेली, शारीरिक विकलांग, अत्याचारपीडिता इ.

येथे आपण एक उदाहरण घेऊयात. देहविक्रीचा व्यवसाय करण्याऱ्या स्त्रियांचे पुनर्वसन सर्वच राष्ट्रांसमोरील एक ज्वलंत समस्या आहे. या समस्येच्या निवारणासाठी बहुपत्नीत्व एक संजीवनी सिद्ध होऊ शकते. आपण सर्वजण गप्पा मारतो की देहविक्रय एक अमानवीय क्षेत्र आहे. परिस्थितीच्या बळी ठरलेल्या स्त्रियांचे ते क्षेत्र आहे, त्यांना मानव म्हणून वागणूक मिळाली पाहिजे वगैरे. परंतु हे क्षेत्र नष्ट व्हावे म्हणून आपण कोणते पाऊल उचलले आहे? उलट आपण ज्या मागण्या पाहत आहोत त्यामुळे या क्षेत्रातील स्त्रियांनादेखील त्या सर्व सोयी सुविधांचा पुरवठा करण्याची मागणी आणि आंदोलने होत आहेत, ज्या सोयी सुविधांचा उपभोग एक सामान्य व्यक्ती घेते. त्यामुळे हे क्षेत्र नष्ट तर होत नाही उलट आणखीन जास्त मजबूत होत चालले आहे. तुम्हाला हे क्षेत्र बंद करायचे असेल तर एकदाच बंदी घालून टाका आणि या क्षेत्रातील स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करा. त्यासाठी एक पर्याय हा असू शकतो की त्यांचे नियमित ग्राहक असलेल्यांना बहुपत्नीत्वासाठी प्रोत्साहित करा. यापैकी असंख्य असे विवाह करण्यास एका पायावर तयार असतील. यामुळे सर्वांचे तर नाही परंतु बहुसंख्य स्त्रियांचे पुनर्वसन होईल.

डॉ. ऍनी बेझंट आणि बहुपत्नीत्व:
बहुपत्नीत्वावर भाष्य करताना डॉ. ऍनी बेझंट म्हणतात, “कायद्याच्या निष्काळजीपणामुळे आणि कायद्याने कोणताही आश्रय न दिल्यामुळे, समाजाकडून वाममार्गाला लागून एखाद्या अनौरस अर्भकासोबत सदाचाराच्या सीमाबाहेर उघड्या रस्त्यावर फेकले जाऊन रात्रीमागून रात्री जाणाऱ्या-येणाऱ्या कोणाचीही बळी ठरण्यापेक्षा आणि पवित्र मातृत्वाला कायमचं गमावून लोकांकडून तिरस्कारले जाण्यापेक्षा स्त्रियांसाठी हे केव्हाही चांगले, आनंदाचे आणि सन्मानाचे आहे की, एकाच पुरुषाशी एकजीव होऊन कडेवरील आपल्या चिमुकल्या लेकरासह समाजाकडून सन्मान प्राप्त करण्यासाठी तिने इस्लामी बहुपत्नीत्ववादी व्यवस्थेमध्ये जगावे.” (ब्युटीज ऑफ इस्लाम, पृ. १३)

बहुपत्नीत्व आणि मौजमजेचा आरोप:
मुस्लीम समाजातील ते लोक जे बहुपत्नीत्वाचा स्वीकार करतात, त्यांच्यावर मौजमजेचा आरोप केला जातो. ही अत्यंत खालच्या पातळीची मानसिकता आहे. तरीही आम्ही मोठ्या उदार मनाने मान्य करतो की मारतो आम्ही मजा! परंतु आम्ही तात्पुरती मजा न मारता चिरकाल मजा मारतो त्या स्त्रीशी लग्न करून, तिला कायदेशीर पत्नीचा दर्जा देऊन, तिच्या पोटातील संततीला आपली संतान बनवून, तिच्या शारीरिक आणि भौतिक गरजा वैध पद्धतीने पूर्ण करून, तिला सन्मानाचे जीवन देऊन. ही मजा त्या तात्पुरत्या मजेपेक्षा कधीही श्रेष्ठ आहे जी एखाद्या हॉटेलच्या रुममध्ये लपून-छपून मारली जाते.

समाजाला बहुपत्नीत्वाची गरज आहे:
आज आपल्या देशात हजारो लाखो नव्हे कोट्यावधी स्त्रियांच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवाडीनुसार देशात विधवा, घटस्फोटीता, विभक्त आणि अविवाहीतांची (वय होऊन गेले आहे) संख्या कोट्यावधीत आहे.

विधवा ४,३२,६१,४७८
घटस्फोटीता       ९,०९,५७३
विभक्त      २३,७२,७५४
अविवाहित       ५६,०५,९०४
एकूण     ५,२१,४९,७०९

 
महिला हक्कांच्या नावावर महिलांच्या शोषणात हातभार लावणाऱ्या संस्थांनी या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आज या महिला उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, ही वास्तविकता नाकारून कसं चालणार? यापैकी बहुसंख्य महिलांचा गैरवापर केला जात आहे. या महिलांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेतला जात आहे. बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता मिळाल्यास या महिलांच्या जीवनाचे सार्थक होऊ शकते. एकाच निर्णयाने कोट्यावधी महिलांचे जीवन बदलू शकते. कारण इस्लामला अभिप्रेत असलेले बहुपत्नीत्व, पत्नीदरम्यान समान न्याय करणारे आहे. पत्नी कितवीही असू दे, इस्लाम तिला सामाजिक मान्यता आणि सर्व क्षेत्रात समान अधिकार देतो.

महिलांनी सक्षम बनावे, आत्मनिर्भर बनावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडे या कोट्यावधी महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा कोणता मार्ग आहे तो समाजासमोर मांडायला हवा. बहुपत्नीत्वाच्या नावाने बोटं मोडायची सोडून देऊन पर्यायी व्यवस्था सादर करा. बहुपत्नीत्वमुळे पुरुषांच्या खांद्यावर जबाबदारी येईल आणि एकट्या स्त्रीचा गैरवापर करण्याची संधी त्याला मिळणार नाही. एकपत्नीत्वाचा स्वीकार करून विवाहबाह्य संबंध ठेऊन स्त्रीचा उपभोग घेणारे समाजात लाखोने सापडतील. त्यांना लगाम लावण्यासाठी बहुपत्नीत्व सर्वोत्तम पर्याय आहे.

बहुविवाह कायदेशीर मान्यता प्राप्त करत आहे:
भारतीय न्यायव्यवस्थेत हिंदूंना द्विभार्या प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जरी दुसरी पत्नी करण्यापासून थांबविण्यात आले असले तरी दुसरा विवाह फौजदारी गुन्हा ठरत नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ला अधिकृत मान्यता दिली आहे. म्हणजे दोन व्यक्ती परस्पर सहमतीने एका नात्यात एकत्र येऊ शकतात. एका व्यक्तीने किती ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ करावेत यावर कसलेही बंधन नाही. एक विवाहित पुरुषदेखील परस्त्री बरोबर ‘लिव्ह इन …..” मध्ये राहू शकतो. या नात्यातील स्त्रीला ते सर्व अधिकार प्राप्त असतील जे पत्नीला प्राप्त असतात. परंतु ती त्याची पत्नी म्हणून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून शकणार नाही. म्हणजे ही बहुविवाहाला मागच्या दाराने दिलेली मान्यताच आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने बहुपत्नीत्व या विषयावर लिहिताना प्रतिपादन केले होते, “अहमदाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात २९,५५१ मैत्री कराराच्या घटनांची नोंद झाल्याचे आढळून आले आहे. मैत्री कराराचा वापर विवाहित हिंदू पुरुष आणि स्त्रिया यांच्या दरम्यान हिंदू विवाह कायद्याच्या कलमापासून सुरक्षित राहण्यासाठी केला जातो.” (१३ जुलै २००३) म्हणून मुस्लीम स्त्रीवर अत्याचार होत आहे म्हणून बोंब ठोकणाऱ्यांनी सर्वप्रथम आपल्या ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ अंतर्गत कसलीही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त न करता राहणाऱ्या बहिणींस न्याय मिळवून द्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *