प्रकरण ६ – शिवाजी राजांची धोरणे

शिवाजी राजांचे मुस्लिमविषयक धोरण:
‘राजाचा धर्म हाच राज्याचा धर्म’ हा जगाचा सनातन पायंडा मुस्लिम शासकांनी मोडून काढला. शिवाजी राजांनी हाच कित्ता गिरवीत आपल्या स्वराज्याची उभारणी केली. स्थानिक मुसलमानांना आपल्या व्यक्तिगत धर्माचरणास स्वातंत्र्य दिले असल्यामुळे खेडोपाडी अल्पसंख्यांक असलेला मुसलमान समाज आपला आयुष्यक्रम विनात्रास घालवीत होता.[1] मुस्लिमांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्यास मुभा होती. हिंदू सणाप्रमाणेच मुस्लिमांचे ईद आणि बकरीद हे सण उत्साहाने साजरे केले जात.[2] परंतु आज धर्मनिरपेक्ष भारतात तथाकथित सुधारणावादी हिंदू बांधवांकडून मुस्लिम समाजाच्या मोजून दोन असलेल्या उत्सवांच्या विरोधात जनभावना तयार करण्याचे काम केले जात आहे. कदाचित त्यांचे वास्तविक आदर्श शिवाजी महाराज नसून इतर कोणीतरी असावेत.

शिवाजी राजे हिंदू होते, परंतु हिंदुत्ववादी नव्हते. इतर धर्मांना अमान्य करणारी केवळ हिंदुत्वाला सर्वोच्च मानणारी विचारसरणी त्यांची नव्हती. पानसरे लिहितात, शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा अभिमानी होता व त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली; या गोष्टी खऱ्या आहेत पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही, असे त्याला कधीच वाटले नाही.[3]

मुस्लिम शासकांच्या धोरणात दिसणारी उदारता शिवाजी राजांच्या ठिकाणीही दिसते. हिंदू जनतेला धर्म स्वातंत्र्याचा पुरेपूर उपभोग घेऊ देणे हे तत्कालीन मुस्लिम शासकांचे वैशिष्ट्य होते. याबद्दल भाष्य करताना चंद्रशेखर शिखरे म्हणतात, “बादशाहने नेमलेले काझी असत परंतु पंचायतीने दिलेल्या निवाड्यामध्ये मुल्ला, मौलवी व काझींना (न्यायाधीश) हस्तक्षेप करण्याचा अधिकार नव्हता. राजकीय अथवा वतनाच्या (दिवाणी) वादांबद्दल व गंभीर गुन्ह्यांबद्दल मनसबदार अथवा जहागीरदार न्यायनिवाडा करीत असत. हे न्यायनिवाडे प्रचलित हिंदू रूढी परंपरा यांना अनुसरूनच होत. बादशाह जरी मुस्लिम असले तरी शरीयतचा कायदा हिंदू प्रजेसाठी नव्हता.”[4]

ते पुढे लिहितात, “शासनाने नेमलेले काझी न्यायाधीश असत, पण हिंदुंवर शरियत कायदा लादला गेलेला दिसत नाही. इतकेच नव्हे तर हिंदूंच्या पारंपारिक न्यायव्यवस्थेत फारशी ढवळाढवळ केलेली आढळून येत नाही. हिंदुच्या वैयक्तिक व सामाजिक व्यवहारासंबंधीचे वाद पूर्व परंपरा व प्राचीन शास्त्रे यांच्या आधारे सोडविल्या जात. धार्मिक तंटे हे नाशिक, पैठण आणि काशी येथील धर्मपीठांकडे जात असत. या सर्व गोष्टीवरून असे दिसून येते की शिवपूर्वकालात हिंदू समाज राजकीय सत्तेला मुकलेला असला तरी शासनव्यवस्थेत व प्रशासनात अनेक ठिकाणी अधिकारावर होता.”[5]

शिवाजी राजांचे मशीदविषयक धोरण:
पानसरे लिहितात, शिवाजीनं सुरतेच्या केलेल्या दोन्ही लुटीची तपशीलवार वर्णनं उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णनं आहेत. पण एकतरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली परंतु कथित स्वरुपात मुस्लिमांनी मशिदीत रुपांतर केले अशी एकतरी मशीद पडून पुन्हा तेथे मंदिर बांधल्याची नोंद आहे का? मुळीच नाही. याउलट मशीदींना दान व इनामे दिल्याच्या नोंदी मात्र आहेत.[6] आज ‘बनायेंगे मंदिर’ म्हणणारे स्वत:ला शिवरायांचे सैनिक म्हणतात. किती ही घोर विटंबना? महापुरुषांना डोक्यात न घेता केवळ डोक्यावर घेऊन नाचल्याने केवळ विकृती जन्माला येतात, अनुयायी नव्हे! हा शिवाजी राजांचा वैचारिक खून कधीपर्यंत सहन केला जाणार? मशीद पाडण्याची किंवा मशीदींवर बंदी घालण्याची भाषा करताना आरोप केला जातो की मशीदीत देशद्रोहाची शिकवण दिली जाते. कथित आरोपाप्रमाणे मशीदीत जर खरेच देशद्रोहाची आणि दहशतवादाची शिकवण दिली जात असेल तर राजांनी मशीद बांधण्याचा आदेश का दिला? मशीदी कुठे हिमालयावर, जंगलात आणि निर्मनुष्य स्थळी नसतात. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी मशीदी असतात. मशीदीबद्दल संशय असल्यास एखाद्या मशीदीस भेट देऊन शहानिशा करण्याची तसदी घ्यायला हवी.

स्वराज्यात मशीदीबाबत कोणते धोरण अवलंबविले जात होते यावर भाष्य करताना प्रेम हनवते म्हणतात, हिंदूंच्या देवदेवतांना, मंदिरांना वतने, अनुदाने मिळत तशी मुस्लिमांच्या पीर, फकीर, दर्गा आणि मशीदींनाही अनुदाने आणि वतने दिली जात होती. त्यांच्या दिवाबत्तीची सोय सरकारी तिजोरीतून करण्यात येत असे; तसेच ज्याप्रमाणे महाराजांनी मंदिरे बांधली, त्याचप्रकारे त्यांनी आपल्या मुस्लिम प्रजेसाठी रायगडावर मशीदही बांधली.[7]

रायगडावर मशीद बांधणीचा किस्सा हा असा! रायगडावर राज्याभिषेकाच्या तयारीसाठी अनेक नवीन इमारती बांधल्या जात होत्या. बरेचसे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा महाराज मोरोपंत पिंगळे यांचे सोबत पाहणी करण्यासाठी गेले. सर्व पाहणी करून ते म्हणाले, “तुम्ही जगदीश्वराचे मंदिर बांधले, चांगले केले. पण माझ्या मुस्लिम प्रजेसाठी मस्जिद कोठे आहे?” त्यावर पिंगळे काय बोलणार? लागलीच महाराजांनी आज्ञा दिली की माझ्या मुस्लिम प्रजेसाठी मस्जिद बांधा आणि तीही माझ्या महालासमोर बांधा. त्यानुसार पिंगळ्यांनी राजगडावर महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून मस्जिद बांधली.[8]

शिवाजी राजांचे कुरआनविषयक धोरण:
शिवाजी राजांचे मुस्लिमविषयक धोरण शिवाजी राजांची विध्वंसक प्रतिमा समाजासमोर सादर करणाऱ्यांच्या प्रयत्नांना ध्वस्त करण्यासाठी पुरेशी आहे. अधर्मांध मानसिकता नेहमी इतर धर्मांचा द्वेष करण्यासाठी त्या धर्माच्या प्रतीकांची विटंबना करण्याचा प्रयत्न करते. कधी मंदिर-मशिदींवर दगडफेक केली जाते तर कधी वेद-कुरआनसंबंधी चुकीचे विधान केले जाते. शिवाजी राजांचे कुरआन बाबतीत वर्तन काय होते हे पाहायलाच हवे. प्रबोधनकार ठाकरे लिहितात, “पवित्र कुरआन हाती पडताच तो त्याची पालखीत वाजतगाजत सन्मानपूर्वक परतवणी करीत असे. दक्षिणेतील कित्येक मशिदींना शिवाजीने दिलेली वर्षासने आजही चालू आहेत.”[9]

मुस्लिम इतिहासकार खाफीखान याने नोंदवून ठेवलेला हा उतारा खूप बोलका आहे. “शिवाजीने सैनिकांकरिता असा सक्त नियम केला होता की, सैनिक ज्या ज्या ठिकाणी लुट करण्यास जातील; तेथे तेथे त्यांनी मशिदीस, कुरआन ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस तोषीस अगर त्रास देता कामा नये. जर एखादा कुरआन ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पुज्यभाव[10] दाखवून तो आपले मुसलमान सैनिकांच्या स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्यास व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांचे सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे.”[11]

जिझिया रद्द करण्यासाठी शिवाजी राजाने आलमगीर औरंगजेबाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात उल्लेख आहे, “कुरआन धर्मग्रंथ प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते आस्मानी किताब आहे. त्यात ईश्वरास ‘जगाचा ईश्वर’ म्हटले आहे. ‘मुसलमानांचा ईश्वर’ असे कोठेही म्हटले नाही. कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एकरंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जातीधर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे होय.”[12]

कुरआन ईश्वराची वाणी आहे. त्यात अल्लाहला मुसलमानांचा ईश्वर नव्हे तर जगाचा ईश्वर म्हणून संबोधिले आहे ही इस्लाम धर्माच्या मूलतत्वांची चर्चा आहे. शिवाजी राजे जितक्या सहजतेने ही चर्चा करीत आहेत त्यावरून हा निष्कर्ष निघतो की शिवाजी राजांच्या संपर्कात अनेक मुस्लिम विद्वान असावेत. राजांची त्याच्याशी इस्लामी तत्वांशी निगडीत चर्चाही होत असावी असे दिसते.

मुस्लिम साधू संतांशी व्यवहार:      
शिवाजी राजांचे मुस्लिम धर्मस्थळ संबंधित धोरण समजून घ्यायचे असेल तर सभासद बखरीतला हा उतारा वाचा, “मुलखात देव-देवस्थाने जागोजागी होती. त्यास दिवाबत्ती, नैवेद्य, अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर, मशीदी, त्यांचे दिवाबत्ती, नैवेद्य, स्थान पाहून चालविले.” शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात, त्यात ‘याकुतबाबा’ या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे.[13]

इस्लामी बैरागी, साधू, अवलीयांना आपल्या खर्चाने मठ बांधून दिले; त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. मुसलमानांचे पीर, मस्जिद यांची दिवाबत्ती व नैवेद्याचा स्थान पाहून चालविले. इतकेच नव्हे तर मुस्लिम संत आणि मुस्लिम देवस्थानांना जमिनी इनाम देऊन त्यांच्या निर्वाहाची व्यवस्था शासकीय खर्चातून केली.[14] काझी राईरकर वास्तव्य कसबे लोणशी ता. निजामपूर हे खुतबा आणी नमाज पठणासाठी रायगडावर येत असत. त्याबद्दल त्यांना ४ रु. मानधन देण्यात येत असे.[15]

मुस्लिम मावळ्यांशी व्यवहार:
मदारी मेहतर हा शिवाजी राजांचा अत्यंत विश्वासू सोबती होता. शिवाजी राजांनी त्याच्या मृत्युनंतर त्याला रायगडावरच दफन केले. श्री. आवळसकर ‘शककर्ता शिवाजी’ तील पृ. २२३ चा आधार घेऊन म्हणतात, “रायगडावर महादरवाजापासुन पाऊण मैलाच्या वाटचालीनंतर रायगडाच्या अच्युत जागी आपण पोहोचतो. त्या आरंभी लागणारी कबर ज्याने शिवाजीचे आग्र्यास प्राण वाचविले, त्या शिवाजीच्या शय्यागारातील सेवक फारस मदारशहा याची होय.”[16]

अफझल खानाशी व्यवहार:
शिवाजी राजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचा प्रसंग बराच रंगवून सांगितला जातो. पण अफजलखानच्या मृत्युनंतर शिवाजी राजांनी त्याच्या मृत शरीराशी आणि त्याच्या मुलांशी काय वर्तन केले हे सांगितले जात नाही. इतिहास सांगताना, वाचताना, लिहिताना आपल्या सोयीचा तेवढा मांडायचा हा जणू नित्यक्रम झाला आहे. जेव्हा अफजल खानाची हत्या केली तेव्हा अफजलखानाची मुले शिवाजी राजांच्या समोर आणण्यात आली. त्या प्रसंगावर भाष्य करताना आधुनिक भारताचे पहिले मुस्लिम मराठी साहित्यिक सय्यद अमीन म्हणतात, “तेव्हा त्यांनी पाहिले, महाराजांच्या डोळ्यात अपार करुणा होती, चेहऱ्यावर प्रेम होते. सद्गदित अंत:करणाने महाराजांनी खानच्या दोन्ही मुलांना छातीशी धरून कवटाळले, कुरवाळले. हे पाहून सर्व कैद्यांना गहिवरून आले. महाराजांनी त्यांना धन, वस्त्रे, भूषणे व इतर देणग्या देऊन मुक्त केले.”[17]

अफजलखानच्या मृत्युनंतर शिवाजी राजांनी त्याच्याशी काय वर्तन केले याबद्दल भाष्य करताना पंडित महादेवशास्त्री जोशी म्हणतात, “प्रतापगडावर प्रेक्षणीय बाब काय? म्हणून कोणी विचारले तर अफझलखानची कबर असेच उत्तर द्यावे लागेल; पण त्याबद्दल आश्चर्य करण्याचे कारण नाही. आश्चर्य करायला हवे ते शिवरायांच्या उदार वृत्तीचे! त्यांनीच प्रथम त्याच्या वीरमरणाची कदर राखली, त्याच्या थडग्याचा आदर केला.”[18] आणि आज शिवाजी राजांचे नाव घेऊन आपले उद्योग चालविणारे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानची कबर हटविण्याची भाषा करीत आहेत.

[1] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. १९
[2] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. २४
[3] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.४२
[4] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२९
[5] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२०
[6] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.३९
[7] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. १९
[8] श्रीकांत बेरिंग, छत्रपती शिवाजी आणि इस्लाम, पृ. ९
[9] प्रबोधनकार ठाकरे, दगलबाज शिवाजी, पृ.२८
[10] टीप: कुरआन मुसलमानांसाठी पूज्य नसून मार्गदर्शक ज्ञानकोश आहे
[11] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.३९
[12] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.४१
[13] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.३९
[14] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. २५
[15] शांताराम विष्णू आवळकर, रायगडाची जीवनगाथा, पृ.७
[16] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. २७
[17] सय्यद अमीन, महापुरुष शिवाजी महाराज, पृ. ५४
[18] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. २७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *