मांसाहार धार्मिक दृष्टीकोनातून

प्रकरण १ ले

आता चर्चा मांसाहारासंदर्भात करूयात. अनेकांचा असा गैरसमज असतो की मुस्लिमांच्या मांसाहारामागे धार्मिक प्रोत्साहन कार्यरत असते. या प्रकरणात आपण मांसाहाराबद्दलचा सर्वधर्मिय दृष्टीकोन अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी शाकाहार आणि मांसाहाराची व्याख्या काय आहे हे पाहूयात. अनेकांना असा गैरसमज आहे कि मांसाहार म्हणजे फक्त आणि फक्त मांसाचा आहार. मांसाहाराची हि व्याख्या कोणत्याही शब्दकोशात शोधूनही सापडत नाही. मांसाहाराची व्याख्या केवळ इतकीच आहे कि आहारात मांसाचा किंवा प्राण्यांपासून प्राप्त होणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे. मांसाहारी लोक पालेभाज्या, फळ, वनस्पती, कडधान्ये, दुध आणि अंडीसोबत मासे, चीकन आणि मांस खातात. परंतु शाकाहाराचे तसे नाही. शाकाहार म्हणजे फक्त आणि फक्त वनस्पतीजन्य पदार्थांचाच आहार म्हणून उपयोग करणे.

सगळेच शाकाहारी सारखे नसतात. काही शाकाहारी केवळ पालेभाज्या आणि फळाहार करतात. तर काही शाकाहारी पालेभाज्या आणि फळांसोबत कडधान्ये खातात. बहुसंख्य शाकाहारी पालेभाज्या, फळ आणि कडधान्ये यांच्या सोबत दुधही पितात. दुध तर कोणत्याही झाडाला लागत नाही. असो! अनेक शाकाहारी पालेभाज्या, फळ, कडधान्ये आणि दुध यांच्यासोबत अंडीही खातात.[1] शाकाहारीचे हे वर्गीकरण जागतिक शाकाहारी सोसायटीने तयार केले आहे.

इस्लाम आणि मांसाहार:
इस्लामचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हे आहे कि त्याची प्रत्येक शिकवण निसर्गाच्या अनुरूप आहे. त्याचा प्रत्येक आदेश आणि त्याचा प्रत्येक नियम नैसर्गिक आहे. त्याच्या शिकवणीत काहीच उणीव नाही, उणीव आहे तर ती आमच्या दृष्टीकोनात! एक १००% शाकाहारी व्यक्तीदेखील मुस्लिम असू शकते. कारण मुस्लिम व्यक्तीचे मुस्लिम असणे शाकाहार किंवा मांसाहारावर अवलंबून नाही. कुरआनने किंवा प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांनी कोठेही मुस्लिम होण्यासाठी मांसाहाराची अट घातलेली नाही. म्हणून जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीस वाटत असेल की त्याने शाकाहारी बनावे तर इस्लाम त्याच्या मार्गातील अडथळा अजिबात सिद्ध होत नाही.

इस्लाम मांसाहाराला परवानगी देतो:
जगभरात विशेषतः भारतीय समाजात धार्मिक वर्तुळात एक विशिष्ट विचारप्रणालीचा प्रभाव दिसून येतो. या विचारप्रणालीनुसार धार्मिक स्वभावाची व्यक्ती, ईशपारायण व्यक्ती मांसाहारी असू शकत नाही. म्हणून आपल्या निदर्शनास आले असेल की अनेक धार्मिक प्रवृत्तीचे लोक जेव्हा धर्माचे अनुसरण करायला लागतात, तेव्हा मांसाहाराचा त्याग करतात. गळ्यात माळ घालतात. दिवस पाळतात. त्यांच्यानुसार मांसाहार करणे पाप किंवा दुष्कर्म आहे, जे त्याच्या मतानुसार धर्ममान्य नाही. प्रेषितांच्या काळातही काही लोकांची हीच द्विधा मनस्थिती होती. अशा लोकांना मार्गदर्शन देताना इस्लामने मांसाहाराचे पाप किंवा दुष्कर्म असण्याचे खंडन केले आहे. इस्लामने मांसाहाराला परवानगी दिली आहे परंतु ते अनिवार्य केलेले नाही. इस्लामची ही परवानगी निसर्गाशी सुसंगत आहे. इस्लामने मांसाहाराला निषिद्ध केले असते किंवा अपसंती दर्शविली असती तर इस्लाम ‘अनैसर्गिक’ धर्म ठरला असता. तसेच तो एकाच भूभागापुरता मर्यादित राहिला असता. इस्लामने मांसाहाराला दिलेल्या परवानगीचा कुरआनात तीन ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे.

हे श्रद्धावंतांनो! आपल्या वचनांशी प्रामाणिक रहा. तुमच्यासाठी पुढे वर्णन केल्या जाणाऱ्या प्राण्यांव्यतिरिक्त (पाळीव) चतुष्पाद वैध आहेत. [2]

            त्यानेच (निर्मात्याने) तुमच्यासाठी पशुधनाची निर्मिती केली. ज्यांच्यापासून तुम्ही वस्त्रे आणि इतर अनेक लाभ प्राप्त करता. काहींचा अन्न म्हणून वापर करता. [3]

            पाळीव प्राण्यांत तुमच्या चिंतनासाठी संकेत आहेत. आम्ही त्यांच्या पोटात जे काही आहे त्यापासून तुम्हाला (आरोग्यदायक) दुध पाजतो; आणि त्यांच्यात तुमच्यासाठी अनेक लाभ आहेत. तुम्ही त्यांना खाता देखील. [4]

वरील एकाही संकेतात मांसाहाराचा आदेश देण्यात आलेला दिसत नाही. मांस खा अन्यतः तुम्ही मुस्लिम नाही, असा आदेश देण्याचा तर प्रश्नच येत नाही. कुर’आनची भूमिका केवळ इतकी आहे की अल्लाहने या सृष्टीतील प्रत्येक वस्तू मानवी लाभासाठी निर्माण केली. पाळीव पशूदेखील त्याच श्रेणीतील आहेत. या पाळीव प्राण्यांपासून मानव अनेक लाभ प्राप्त करू शकतो. अन्न म्हणून प्राण्यांचा वापर हा त्याच लाभाचा एक भाग आहे.

हिंदू धर्म आणि मांसाहार:
अनेक हिंदू बांधवांना हा गैरसमज आहे की हिंदू धर्मात मांसाहाराची परवानगी नाही. म्हणून ते धार्मिक आचरण करताना मांस वर्ज्य समजतात. परंतु सत्य तर हे आहे की हिंदू धर्म ग्रंथात मांसाहाराची परवानगीच नव्हे तर आदेशही देण्यात आलेला आहे. तसेच या धर्मग्रंथात अनेक ऋषी मुनींचा उल्लेख आहे जे मांसाहार करीत. मनुस्मृती हिंदू धर्मग्रंथात विशेष स्थान राखते. मनुस्मृतीत मांसाहारासंबंधी आलेले खालील आदेश पहा.

पितरांच्या मासिक श्राद्धाला पंडित चांगल्याप्रकारे जाणतात. त्यांचा श्राद्धविहित नेहमी उत्तम मांसाने करावे.[5]

हे द्विजातीसाठी निःशेष भक्षाभक्ष्य सांगितले. यानंतर मांस भक्षण आणि त्याग यांचा विधी सांगतो.[6]

मांस खाण्याची इच्छा ब्राम्हणाला झाली तर त्याने यज्ञात प्रोक्षण विधीने शुद्ध करून खावे आणि प्राण रक्षणासाठी खावयाचे असेल तर सामाजिक कायद्यानुसार खावे.[7]

भक्षण योग्य असे भक्षण केल्याने खाणाऱ्याला दोष लागत नाही. कारण परमेश्वरानेच भोजन आणि भोजन करणारे या दोघांना उत्पन्न केले आहे.[8]

यज्ञाच्या निमित्ताने मांस भक्षण करणे देव विधी आहे.[9]

रोजगारासाठी जो पशूंना मारतो त्याला पाप लागत नाही.[10]

मंत्राने ज्याचे संस्कार केलेले नाहीत त्या पशूंना ब्राम्हणाने कधी खाऊ नये आणि शाश्वत वेदाच्या विधीने यज्ञात संस्कारित केलेले भक्षण करावे.[11]

आयुर्देव हा अथर्ववेदाचा भाग आहे. आयुर्वेदाला हिंदू धर्माशी जोडून पाहिले जाते. आयुर्वेदाचे मूळ भारतीय ‘चिकित्साशास्त्र’ असणे कोणीही नाकारू शकत नाही. आयुर्वेदाचा महान विद्वान चरक याने आपल्या ‘चरकसंहिते’मध्ये काही रोगांच्या उपचारासाठी ‘मांसाहार’ करण्याचे सुचविले आले.[12] पद्मभूषण पुरस्कार विजेते भारतीय वैज्ञानिक पी. एम. भार्गव चरकसंहितेचा संदर्भ देऊन राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, “वायू, नासिकादोष, अनियमित ताप, दीर्घकालीन कोरडा खोकला, थकवा, आणि कठोर श्रमामुळे होणा-या तीव्र विकारांसाठी गाईचे मांस उपयुक्त औषधी आहे.” [13]

हिंदू धर्म विद्वान आणि मांसाहार:
प्रा. डी. एन. झा आपल्या ‘द मिथ ऑफ हॉली काऊ’ या ग्रंथात लिहितात, प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेत बीफ हा मुख्य आहार होता. वेद, पुराणासह अनेक संस्कृत ग्रंथांत याचा उल्लेख आहे की प्राचीन काळात गाय कधीच पवित्र मानली गेली नाही.[14] प्रसिद्ध हिंदुत्ववादी इतिहास लेखक आर. सी. मुजुमदार ‘भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या ग्रंथात अनेक हिंदू धर्मग्रंथांचा दाखला देऊन मांसाहाराबद्दल लिहितात, राजा रतीदेव त्याच्या राज्यातील जनतेला पुरविण्यासाठी आणि स्वतःच्या मुद्पाक खाण्यासाठी रोज दोन हजार गायी आणि इतर प्राणी मारीत असे.[15] तसेच विवेकानंदांचे मांसाहारासंबधी विचार काय होते हे जाणून घेणे वाचकांच्या फायद्याचे ठरेल. विवेकानंदांचे विचार पुढील प्रकरणात दिले आहेत.

बौद्ध धर्म आणि मांसाहार:
बौद्ध धर्मात मांसाहाराच्या निषिद्ध असण्याबद्दल कोणताही आदेश नाही. बौद्ध भिक्षुकांसाठी प्राणी हत्या निषिद्ध असली तरीही गृहस्थाने वाढलेले मांस खाणे त्यांच्यासाठी निषिद्ध नाही. एके ठिकाणी भिक्षा घेत असताना बुद्धांना मांस वाढण्यात आले. त्यांनी ते मांस आनंदाने ग्रहण केले. तसेच एकदा देवदत्त नावाच्या एका शिष्याने बुद्धांना विनंती केली की भिक्षुकांना शाकाहाराची सक्ती करावी. बुद्धांनी त्यांची विनंती अमान्य केली.[16] सम्राट अशोकही बुद्ध धर्माच्या स्वीकारानंतरदेखील मांसाहारीच राहिला होता.[17]

[1] https://www.vegsoc.org/definition
[2] कुर’आन, अध्याय ५, माई’दा, संकेत १
[3] कुर’आन, अध्याय १६, नहल, संकेत ५
[4] कुर’आन, अध्याय २३, मोमिनून, संकेत २१
[5] मनुस्मृती, अध्याय ३, मंत्र १२३
[6] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र २५
[7] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र २७
[8] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३०
[9] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३१
[10] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३४
[11] मनुस्मृती, अध्याय ५, मंत्र ३६
[12] चरकसंहिता, पृ. ८६-८७
[13]https://timesofindia.indiatimes.com/india/Ayurveda-prescribes-beef-for-several-disorders-Scientist/articleshow/49743126.cms
[14] झा. डी. एन., मिथ ऑफ हॉली काऊ
[15] मुजुमदार आर. सी., भारतीय इतिहास आणि संस्कृती, खंड २, पृ.५८७
[16] Dhammananda, K. Shiri., What Buddhist Believes, Pg. 215
[17] http://www.thehindu.com/2001/08/14/stories/13140833.html

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *