मांसाहारींचे प्रश्न

प्रकरण ५ वे

मागील प्रकारणात आपण मांसाहारावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांची उत्तरे पाहिली आहेत. हे आक्षेप शाकाहार समर्थकांकडून घेतले जातात. आता या प्रकरणामध्ये आपण इतर मांसाहारींतर्फे मुस्लिम समाजावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांची उत्तरे पाहूयात.

1) मुस्लिमांची जबीहा पद्धती अमानवीय आणि क्रूर का आहे?

मुस्लिम लोक अतिशय अमानुष पद्धतीने प्राण्यांचा जीव घेतात असा एक आक्षेप घेतला जातो. प्राणी हत्येची इस्लामी पद्धती शास्त्रोक्त पद्धत असून त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. मुस्लिम विद्वानांनी जबीहा पद्धतीवर सविस्तर चर्चा केली आहे. मुस्लिम समाज जबीहा पद्धतीने प्राप्त ‘हलाल’ मांसच खातो. मांस जबीहा पद्धतीने प्राप्त केलेले नसेल तर ‘हलाल’ मानले जात नाही. असे मांस खाण्यास निषिद्ध असते. मांस हलाल असण्यासाठी जबीहाच्या खालील अटींची पूर्तता करने अनिवार्य आहे.

 • मांस अल्लाहचे नाव घेऊन प्राप्त करावे
 • म्हणजे मांस प्राप्तीसाठी सर्वप्रथम अल्लाहचे नाव घेऊन जबीहा करण्यास सुरुवात करावी. अल्लाहचे नाव घेतले नाही तर मांस खाण्याची परवानगी नाही.
 • धारदार शस्त्राचा वापर करावा
 • मांस प्राप्तीसाठी वापरण्यात येणारे हत्यार धारदार असावे. जेणेकरून प्राण्याचा जबीहा करताना विलंब होऊ नये, वेदना होऊ नयेत.
 • Vessel of The Neck कापावी
 • जबीहा करताना केवळ गळ्याकडील रक्तवाहिका कापाव्यात. जेणेकरून रक्त शरीरातून बाहेर वाहून जाईल. रक्तवाहिका कापताना याची दक्षता घ्यावी की जनावराच्या Spinal Cord ला धक्काही लागता कामा नये. कारण Spinal Cord तुटल्यास तत्काळ मृत्यू होऊन सारे रक्त शरीरातच गोठले जाते.
 • शरीरातील सारे रक्त वाहू द्यावे
 • रक्त किटाणू, जीवाणू आणि विषाणूसाठी एक उत्कृष्ट माध्यम आहे. म्हणून रक्ताचे सेवन इस्लाममध्ये निषिद्ध करण्यात आले आहे. यासाठी सारे रक्त शरीराबाहेर वाहून जाणे गरजेचे आहे.

जबीहा पद्धतीचा फायदा असा होतो की प्राप्त केलेले मांस जास्त काळ ताजे राहते. रक्त वाहून गेल्याने रोग संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होतो. मेंदूला रक्त पुरवठा करणारी वाहिनी कापली गेल्याने मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो. यामुळे जनावराला वेदना होत नाहीत. जनावराचे तडफडने वेदनेमुळे नसून रक्ताच्या वाहण्याचे शरीरात होणाऱ्या आकुंचन-प्रसरणामुळे असते.

2) मुस्लिम डुकराचे मांस का खात नाहीत?

जगात डुकराचे मांस खाणाऱ्यांची संख्या चांगलीच आहे. परंतु ही संख्या मागील १० वर्षात लक्षणीय प्रमाणात घटली आहे. National Geographic च्या २०११ च्या अहवालानुसार मागील १० वर्षात एकट्या भारतात डुकराच्या माणसाचे सेवन करणाऱ्याच्या संख्येत २९ टक्के घट झाली आहे.[1] डुकराचे मांस इस्लाममध्ये निषिद्ध मानले गेले आहे. डुकराच्या मांसाच्या निषिद्धतेचे आदेश कुरआनमध्ये चार विविध ठिकाणी देण्यात आले आहेत. त्यापैकी दोन उल्लेख असे आहेत,

            तुमच्यासाठी निषिद्ध करण्यात आले आहेत मृत प्राणी, रक्त, डुकराचे मांस आणि ते मांस जे अल्लाहशिवाय इतरांच्या नावाने कापण्यात आले असेल. आणि तेदेखील जे गुदमरून किंवा मार लागून किंवा उंच स्थानावरून खाली पडून किंवा धडक लागून मेले असेल किंवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल….[2]

            निःसंशय अल्लाहने निषिद्ध केले तुमच्यासाठी मृत प्राणी, रक्त, डुकराचे मांस आणि ते मांस जे अल्लाहशिवाय इतरांच्या नावाने कापण्यात आले असेल.[3]

याचप्रकारचे आदेश सुराह अन’आमच्या १४५ व्या संकेतामध्ये आणि सुराह नहलच्या ११५ व्या संकेतामध्ये देण्यात आले आहेत. त्यावेळी याचे कारण काय असावे हे समजले नव्हते. आता मात्र लोकांना याची दुष्परिणामे चांगलीच माहित झाली आहेत. डुकराच्या मांसाचे दुष्परिणाम आपण येथे संक्षिप्तरित्या पाहणार आहोत.

 • सर्व प्राण्यांमध्ये युरीक Acid असते, जे मूत्रपिंडाद्वारे शोषले जाऊन लघवीद्वारे शरीराबाहेर फेकले जाते. डुकराच्या शरीराची रचनाच अशी आहे कि ते केवळ २ टक्के युरीक Acid शोषु शकते. उरलेले ९८ टक्के युरीक Acid त्याच्या शरीरातच राहते. या अतिरिक्त युरीक Acid डुकराचे मांस सेवन करणाऱ्यांत संधीवाताच्या रोगाचे प्रमाण जास्त असते.
 • मागील दशकांत झालेल्या संशोधनाने हे सिद्ध केले आहे कि कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणाऱ्या विविध गोष्टींपैकी एक डुकराचे मांस देखील आहे. [4]
 • डुकराची शरीररचना अशी आहे कि त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी साठविली जाते. किंबहुना डुकराचे मांस जगातील सर्वाधिक चरबीयुक्त मांस आहे. ज्याच्या सेवनामुळे हृदयरोग आणि मानसिक ताण या रोगांचा धोका मोठ्या प्रमाणात उद्भवतो.
 • डुकर या प्राण्याला या सृष्टीवरचा नैसर्गिक सफाई कर्मचारी म्हणून निर्माण केले गेले आहे. घाण आणि दुर्गंधीयुक्त जागेत डुकराचे वास्तव्य असते. मलमूत्र आणि विष्ठा हे डुकराचे आवडते अन्न आहे. डुकराला अतिशय स्वच्छ आणि नीटनेटक्या वातावरणात जरी वाढविले तर तो आपल्या सोबतच्या प्राण्याची तरी विष्ठा खातो नाही तर स्वतःची तरी खातो. यामुळे तो जगातील जवळपास सर्वच मानवी समूहांत नावडता प्राणी मानला गेला आहे.
 • डुकर सर्व प्राण्यांत सर्वात जास्त निर्लज्ज असा प्राणी आहे. इतर प्राण्यांतील नर-मादी संबंध आणि डुकरातील नर-मादी संबंध यात खूप मोठी तफावत आहे. डुकर आपल्या मादीशी सहवास करताना अनेकांच्या साथीने सहवास करतो. नर डुकर जन्म देणाऱ्या मादीशीही सहवास करतो. या गोष्टी मानवी सभ्य समाजासाठी अत्यंत किळसवण्या आहेत.

वरील उल्लेखित कारणांमुळे मुस्लिम डुकराच्या मांसाचे सेवन करीत नाहीत.

3) मुस्लिम केवळ मुस्लिम खाटीकाकडचेच मटन का खातात?

इस्लाम मांसाहाराची परवानगी केवळ या अटीवर देतो की ते मांस जबीहा पद्धतीने प्राप्त केलेले मांस असावे. मांस जबीहा पद्धतीने प्राप्त केलेले नसेल तर असे मांस खाण्याची परवानगी मुस्लिमांना नाही. जबीहा पद्धतींचा वापर करून मांस उपलब्ध करून देणारा यहुदी आणि ख्रिस्ती जरी असला तरी त्याच्याकडचे मांस मुस्लिमांसाठी वैध आहे. तसेच मुस्लिम खाटीकाकडे जबीहा पद्धतीने मांस उपलब्ध करून दिले जात नसेल तर त्यांच्याकडचे मांस खाण्याची परवानगी नाही. मांस प्राप्त करताना त्याच्या प्राप्त करण्याची पद्धत महत्वाची आहे, खाटीकाचा धर्म नव्हे![5]

[1] https://www.nationalgeographic.com/what-the-world-eats/
[2] कुरआन, सुराह ०५, मायदा, संकेत ०३
[3] कुरआन, सुराह ०२, बकरा, संकेत १७३
[4] https://draxe.com/why-you-should-avoid-pork/
[5] या प्रकारच्या अनेक भ्रमांचे निरसन करण्यासाठी माझे ‘भ्रम, दोष आणि वास्तव’ हे पुस्तकं वाचावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *