शाकाहारी तत्वज्ञानाची चिकित्सा

प्रकरण ३ रे

जगभरात मांसाहाराला होणारा विरोध हा अहिंसेच्या तत्वज्ञानाच्या अतिरेकामुळे केला जातो. शास्त्रशुद्ध पद्धतीने तर्कसंगत चर्चा करून आपला मुद्दा मांडणारे खूपच कमी असतात. कारण तर्कसुसंगत चर्चा करताना मांसाहार सर्वथा वर्ज्यच करावा लागेल अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही. शास्त्रशुद्ध चर्चा करताना जास्तीत जास्त इतकेच म्हंटले जाऊ शकते कि मासांहाराच्या अतिरेकाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु आहाराचा संतुलित वापर असेल तर विपरीत परिणाम होणार नाही. वापर असंतुलित असेल तर विपरीत परिणाम होणारच. मग तो आहार शाकाहार असो कि मांसाहार.

या प्रकरणात अहिंसेच्या तत्वज्ञानाची चिकित्सा करूयात. अहिंसेचे तत्व ऐकायला खूप सुंदर आणि आनंददायक वाटते. कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी एका निरपराध प्राण्याचा बळी घेणे पराकोटीचा स्वार्थ आहे. ईत्यादी. जगात असे अनेक तत्व मांडण्यात आले आहेत जे ऐकायला खूप चांगले वाटतात. परंतु त्या तत्वांना प्रत्यक्ष आचरणात आणणे शक्य नसते. किंवा त्यांच्यावर आचरण करण्याचा प्रयत्न केल्यास मानवजीवन विस्कळीत होऊ शकते. म्हणून अशा प्रकारच्या तत्वांना जगाने कधीच स्वीकारले नाही. किंबहुना ती तत्व इतकी कमकुवत आहेत कि जगाने त्यांच्या स्वीकार करावा इतके सामर्थ्य आणि प्रभाव त्यांच्यात नाहीच. अशा तत्वांना त्यांच्या मांडणाऱ्या समवेतच या जगातून ‘मुक्ती’ मिळाली. काही तत्वांना जगातील मुठभर लोकांनी स्वीकारले देखील, परंतु ते तत्व कधीच जगातील प्रमुख तत्वांची जागा घेऊ शकले नाही. आहाराच्या बाबतीत अहिंसा अशा तत्वांपैकी एक आहे.

अहिंसेच्या तत्वाची तात्विक चिकित्सा:
आहाराच्या बाबतीत अहिंसेचे तत्व समस्त मानवजातीसाठी नाहीच. ते जास्तीत जास्त एका विशिष्ट गटासाठी, प्रांतासाठी, भूभागासाठी किंवा राष्ट्रासाठीच असू शकते. या तत्वाला अनेक मर्यादा आहे. या मर्यादांमुळे हे तत्व कधीच वैश्विक तत्वाची जागा घेऊ शकत नाही. समस्त विश्वाच्या कल्याणासाठी एखाद्या तत्वज्ञानीने हे तत्व मांडले आहे असे गृहीत धरायला कसलाच आधार नाही. अहिंसेचे तत्व मांडणाऱ्याचे म्हणणे असे आहे कि आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या मुक्या प्राण्याचा बळी का म्हणून घ्यायचा? प्राणीहत्या त्यांच्या दृष्टीने अक्षम्य पाप आहे. प्राण्यांत जरी आत्मा नसला तरी जीव असतो, म्हणून जीवधारीची हत्या करू नये असा या त्यांचा युक्तिवाद असतो. आजपासून काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा हे तत्व मांडण्यात आले तेव्हा ते सामान्यजणांना अत्यंत आकर्षक वाटले असेल. कारण जीवधारी प्राण्यांच्या हत्येच्या तुलनेत निर्जीव ‘वनस्पती’ खाणे कधीही चांगले आहे, असे अनुयायांना त्याकाळी वाटले असेल. परंतु वैज्ञानिक प्रगतीच्या काळात या विचारांसाठी कसलाच आधार नाही. मनुष्य आणि प्राण्यांप्रमाणे वनस्पतीदेखील सजीव असतात हे मागील काही शतकात एक प्रस्थापित सत्य म्हणून समाजातर्फे स्वीकारले गेले आहे. वनस्पतींना भावना आणि जाणीवा असतात, हेदेखील सप्रमाण सिद्ध करण्यात आलेले आहे. म्हणून प्राणी आणि वनस्पती दोन्ही ‘सजीव’ याच गटात मोडतात. म्हणून तुम्ही प्राणीहत्या करून खा किंवा वनस्पती खा… कोणत्याही परिस्थितीत तुम्ही ‘सजीव’च खात असता हे मात्र निश्चित आहे.

अहिंसेचे तत्व मांडणाऱ्याची भूमिका केवळ इतकीच नव्हती कि तुम्ही प्राणीहत्या करू नका. त्यांची भूमिका हीदेखील होती कि तुम्ही स्वतःहून वनस्पतींनादेखील त्रास देऊ नका. जे फळ आपोआप गळून पडेल तेच खा. स्वतःच्या हाताने फळ तोडू नका, असाही उपदेश त्यांच्यातर्फे करण्यात आला होता. परंतु जेव्हा त्यांना स्वतःला हे जाणवले कि हे आदेश मानवजातीसाठी त्रासदायक ठरतील तेव्हा त्यांनी यामध्ये काही प्रमाण शिथिलता आणली. आपल्या अनुयायींचे दोन वर्ग केले. एका वर्गात तत्वांचा प्रचार करणारे तर दुसऱ्या वर्गात सामान्य गृहस्थी जीवन व्यतीत करणारे अनुयायी. अर्थातच पहिल्या वर्गातील अनुयायी दुसऱ्या वर्गातील अनुयायांपेक्षा श्रेष्ठ आणि वरच्या दर्ज्याचे! गृहस्थींना फळ, वनस्पती तोडून खाण्याची परवानगी देण्यात आली. पहिल्या वर्गातील अनुयायींना या पापातून मुक्त करण्यात आले. म्हणजे त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी फळे तोडण्याचे आणि वनस्पती उपटण्याचे पाप करण्याची जबाबदारी ग्रहस्थांच्या खांद्यावर टाकण्यात आली.

म्हणजे या तत्वज्ञानाच्या दृष्टीने शाकाहारदेखील एक पापच आहे. मांसाहारापेक्षा काही कमी दर्जाचा असेल परंतु आहे तर एक पापच! या तत्वज्ञानाचा उगम जगाला मानवच्या ‘शिक्षेची’ किंवा ‘दंडाची’ जागा समजणाऱ्या मानसिकतेतून झाला आहे. या दंडातून आणि शिक्षेतून ‘मुक्ती’ प्राप्त करण्यासाठी स्वतःला पिडा आणि यातना देऊन आपल्या पापांचे प्रायश्चित केले जाते आणि मुक्ती प्राप्त केली जाते. म्हणजे शाकाहाराचे समर्थन करताना किंवा मांसाहाराचा विरोध करताना प्राण्यांबद्दल ‘भूतदया’ नसते तर आपल्या पापांचे प्रायश्चित करून या जगातून ‘मुक्ती’ प्राप्त करण्याची भावना मुलप्रेरक असते, हे समजून घेणे गरजेचे आहे.

अहिंसेच्या तत्वाची व्यावहारिक चिकित्सा:
या तत्वाला व्यवहारात आचरणात आणायचा विचार करून पहा. कल्पना करून बघा कि जगातील ७५० कोटी लोकांना शाकाहाराचे धडे द्यायचे आहेत. उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वांना शाकाहारी करता येणे शक्य आहे काय? सुरुवात उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासूनच करूयात. त्या दोन ध्रुवांच्या जवळच्या राष्ट्रांची कल्पना करा. जिथे वर्षाचे ३६५ दिवस सारी जमीन बर्फाने अच्छादलेली असते. सोबत अशा भूभागांची देखील कल्पना करा जेथे दूरवर पसरलेले वाळवंट असतात. अनेक भूभागांत गवताची मोठमोठाली मैदाने असतात. अशा भूभागांत शेती केलीच जाऊ शकत नाही. अशा भूभागांतील लोकांनी या तत्वावर कशाप्रकारे आचरण करावे? याचे उत्तर शाकाहार समर्थकांकडून असे दिले जाऊ शकते कि शेती करण्याऱ्या राष्ट्रांनी तिकडे फळे आणि पालेभाज्यांची निर्यात करावी. तर येथे पहिला मुद्दा असा कि आयात निर्यातीची व्यवस्था आज जितकी विकसित आहे तितकी हजारो वर्षांपूर्वी तर नव्हती. म्हणजे जेव्हा अहिंसेचे तत्व मांडले गेले तेव्हा ते या प्रदेशातील लोकांसाठी काहीच कामाचे नव्हते. यातून अहिंसेच्या तत्वाची मर्यादा आणखीन अधोरेखित होते. आणि दुसरा मुद्दा असा कि फळ आणि पालेभाज्या निर्यात केल्याने त्या भागात शाकाहार उपलब्ध तर केला जाऊ शकतो परंतु तो परवडणारा नसतो. त्याच्या तुलनेत निसर्गाने उपलब्ध करून दिलेले स्थानिक मांसाहारी पर्याय त्यांच्यासाठी कित्येक पट स्वस्त ठरतात. तिसरा मुद्दा असा कि जगात कधीच ७५० कोटी लोकांच्या अन्नाची गरज भागविली जाईल इतके अन्न-धन्य पिकविले जाऊ शकत नाही. पर्यावरण आणि हवामानाच्या परिणामामुळे शेती अनेकदा प्रभावित होत असते. दुष्काळ, पूर आणि इतर तत्सम नैसर्गिक आपत्तींमुळे शेती क्षेत्र अस्थिर होते. ताटात रोज लागनाऱ्या पालेभाज्या अत्यंत महाग होतात. अशा अनिश्चिततेच्या परिस्थितीत शाकाहार कधीच मानवाचा एकमात्र आहार ठरू शकत नाही.

दैनंदिन जीवनात मांसाहाराचा वापर:
पोलीस आणि सैन्य दलांत ट्रेनिंग कालावधीत दररोज अंडी आणि मांस खाण्यास दिले जातात. अंडी, मांस आणि चिकन हा तर सैन्याचा नित्याहार आहे. विविध खेळांशी निगीडीत खेळाडूंना शरीरसौष्ठव प्राप्त करण्यासाठी मांसाहार केल्याशिवाय पर्याय नसतोच. इतकेच कशाला तर मांसाहाराचा अनेक रोगांवर उपचार म्हणून आयुर्वेदाचा महान विद्वान चरक याच्याकडूनदेखील स्वीकार केला गेला आहे. या सर्व गोष्टी शाकाहारी तत्वज्ञानाच्या मर्यादा अधोरेखित करण्यासाठी पुरेश्या आहेत.

मांसाहाराच्या विरोधाचा अर्थ:
अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी अन्न सर्वात महत्वाची गरज आहे. अन्नाशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. अन्नाद्वारे त्याच्या शरीराची झीज भरून काढली जाते, त्याच्या शरीराचे पोषण होते. त्याची शक्ती टिकून राहते. निरोगी, सदृढ समाजासाठी लोकांचे शरीर निरोगी, सदृढ असणे गरजेचे आहे. मानवी शरीराला परिपूर्ण अन्नाची गरज आहे, ज्यातून त्याला कार्बोहायड्रेट, चरबी, प्रोटीन आणि विटामिन प्राप्त व्हावेत.

कार्बोहायड्रेट (कार्बयुक्त पदार्थ) शरीराला ग्लुकोज देतात. त्यातून शरीराला ऊर्जा मिळते. प्रोटीन (प्रथिने) मधून शरीराला Amino Acids मिळतात. शरीरातील पेशीं आणि स्नायू बनविणे आणि त्यांना मजबूत करण्याचे काम प्रोटीन करते. चरबीतून Fatty Acids मिळतात. ते शरीरातील विविध अवयवात जसे त्वचेखाली, यकृतामध्ये आणि आतड्यांच्या आजूबाजूला भविष्यातील आवश्यकतेनुसार वापरण्यासाठी राखून ठेवले जातात. वरील जीवनावश्यक घटक वनस्पतींमध्ये विखुरलेले आढळतात. दुध, तूप, बदाम, वनस्पती तेल आणि इतर मेवे हे चरबीयुक्त पदार्थ आहेत. साखर, गहू, सत्तू, भात आणि फळांमधून मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट प्राप्त होतात.

मांसदेखील पौष्टिक आणि प्रथिनयुक्त खाद्य आहे. मांस एक परिपूर्ण प्रथिनयुक्त खाद्य आहे. ज्यात आठही अत्यावश्यक Amino Acids आढळतात; जे मानवी शरीरात तयार होत नाहीत तर खाद्यान्नाद्वारे त्यांची पूर्तता करावी लागते. मांसात लोह, विटामिन बी-१ आणि नियासिन देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. काही अत्यावश्यक असणारे Amino Acids  हे फक्त मांसातच आढळतात. वाढत्या वयात जर प्रोटीन मिळाले नाही तर मांसपेशी आणि हाडांची वाढ कमजोर होते. यासाठी मांसाहार महत्वाचा आहे.

श्रीमंत लोक ड्राय फ्रुट खातात कारण त्यांना ते परवडते. गरीबांकडे पैसा नसतो तर त्यांनी खाऊच नये का? खाल्ले पाहिजे. मग त्यासाठी पैसा कोठून आणायचा? अशा लोकांसाठी कमी पैशात धष्टपुष्ट शरीरयष्टी प्राप्त करून देण्यात ‘मांस’ जीवनदायी ठरते. १४० रुपये प्रती किलोने विकत घेतलेलं मांस गरीब व्यक्ती दोन-चार दिवस खाते. कोणताही शाकाहार १४० रुपयांना दोन-तीन दिवसाच्या पोटभर जेवणाची व्यवस्था करू शकत नाही. मांसाहाराकडे पाहताना या दृष्टीकोनातून देखील पाहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *