मांसाहार आणि विवेकानंद[1]

प्रकरण २ रे

वैष्णव बांधवांबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “त्यांचे देव राम वा कृष्ण मद्यमांस झक्क उडवीत असत – रामायण महाभारतात पुरावे आहेत! सितादेवीने गंगेला मांस, भात आणि हजार कळशा दारू यांचा नवस केला होता.”[2] पुढे एका ठिकाणी विवेकानंद म्हणतात, “कुणी काहीही म्हणो, हे मात्र अगदी निश्चित आहे की मांसाहारी जातीच चिरकाळ योद्धा, विचारप्रवण ठरत आल्या आहेत – शूर, वीर, सखोल चिंतनशील लोक त्यांच्यातच प्रामुख्याने आढळतात. मांसाहारी जातींचे असे म्हणणे आहे की, ज्या काळी यज्ञाच्या धुरानं देश दाटत असे व लोक यज्ञातील बलिदानाचे मांस खात असत त्याच काळी हिंदूंमध्ये चांगल्या चांगल्या डोक्याचे लोक निपजत असत. पालेभाज्या खाऊन बाबाजींची निपज होऊ लागल्यापासून एकही ‘माणूस’ उपजला नाही.”[3]

प्राचीन भारतात हिंदू बांधव गोमांस सेवन करीत असत. मदुरा येथील हिंदू बांधवांनी विवेकानंदांना स्वागतपर मानपत्र अर्पण केले. त्याला दिलेल्या प्रतीउत्तरात विवेकानंद गोमांस सेवनाबद्दल भाष्य करतात. ते म्हणतात, “याच भारतात असा एक काळ होता की, गोमांस खाल्ल्यावाचून ब्राम्हण हा ब्राम्हण राहू शकत नसे; वेदात तुम्हाला आढळेल की जेव्हा एखादा संन्यासी, राजा किंवा थोर पाहुणा घरी येई तेव्हा उत्तम बैल मारण्यात येत असे. नंतर पुढे लोकांच्या लक्षात आले की आपला देश कृषिप्रधान देश आहे, म्हणून उत्तम बैलांची हत्या केल्याने आपल्या वंशाचा समूळ नाश होऊन जाईल. म्हणून ही प्रथा बंद पडली व गोहत्या ही निषिद्ध मानली गेली.”[4] म्हणजेच हिंदू महानुभवांकडून होणारा गोहत्याविरोध धार्मिक आस्था, श्रद्धा यांच्यामुळे नसून परिस्थितीजन्य आर्थिक कारणांमुळे आहे. गोमांस निषिद्धतेसाठी हिंदू बांधवांकडे कसलेही धार्मिक अधिष्ठान नाही. नुकत्याच लागू झालेल्या गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे देशातील गोमांस निर्यात कित्येक पटीने वाढली आहे. गोमांस निर्यातीवर ‘शुद्ध शाकाहारी’ वर्गातील उद्योगपतींचे वर्चस्व आहे.

मदुराई मेलच्या २८ जानेवारी १८९३ च्या अंकात लिहिलेल्या लेखात विवेकानंद म्हणतात, “एकेकाळी ब्राम्हण गोमांस सेवन करीत. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात वासरांचे बळी दिले जात असत.”[5] दुसऱ्या एका ठिकाणी विवेकानंद म्हणतात, “कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु सनातन परंपरांनुसार जो गोमांस भक्षण करीत नाही तो चांगला हिंदू असूच शकत नाही.”[6]

वरील उतारे वाचल्यानंतर जर तुमचे म्हणणे असे आहे की या पुरातन गोष्टी आहेत. आज हिंदू बांधव मांसाहार करीत नाहीत तर आपल्या देशातील वर्णव्यवस्थेकडे जरा लक्षपूर्वक पहा. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र या चार वर्णांची ही व्यवस्था. सर्वाधिक प्रमाण शूद्रांचे, त्या तुलनेत कमी वैश्य, त्याहून कमी क्षत्रिय आणि अत्यल्प ब्राम्हण. शूद्रांचे मुख्य अन्न ते काय? त्यातही अस्पृश्यांचे अन्न काय? मांसाहार! मेलेली जनावरं, गुरढोर ओढत नेणे आणि फस्त करणे हेच शूद्रांचे काम नव्हते काय? याची साक्ष स्वतः आंबेडकरांनी दिली आहे. आजही देशातील अनेक भागांत शूद्रांचे हेच काम आहे. गावकुसाबाहेर राहणारे शुद्र गावातील मेलेली जनावरे ओढत नेतात आणि फस्त करतात. आता क्षत्रीयांबद्दल बोलूयात. क्षत्रिय म्हणजे लढवय्ये! लढण्यासाठी शरीरात बळ हवे. शाकाहार करून कसले बळ निर्माण होणार? म्हणून देशातील क्षत्रिय जातीदेखील मांसाहारी आहेत. मराठे, राजपूत, जाट, शीख, गोरखा इ. सारेच मांसाहारी. म्हणजे देशातील बहुसंख्य जनता ही मांसाहारी आहे.

भारत भ्रमंतीच्या काळात विवेकानंद कोल्हापूरहून बेळगावला आले होते. तेथे ते बेळगावचे प्रसिद्ध वकील भाटे यांच्याकडे उतरले असता एकदा भाटे यांनी त्यांच्याशी मांसाहाराबद्दल चर्चा केली. तेव्हा विवेकानंदांनी त्यांना उत्तर दिले, “अन्न हे पूर्णब्रम्ह. मी परमहंस वर्गातील संन्यासी आहे. शाकाहार, मांसाहार, पक्वान्न, कदान्न असला विचार मी करीत नाही. जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करतो आणि काहीच मिळाले नाही तर उपाशी राहतो.”[7]

बेलूर मठ बांधणीच्या काळात एका शिष्याशी विवेकानंदांची झालेली खालील चर्चा पहा. या चर्चेत विवेकानंदांचा मांसाहाराबद्दलचा दृष्टीकोन स्पष्टपणे दिसतो आहे. त्या चर्चेतील मांसाहाराशी संबंधित संक्षिप्त भाग येथे दिला जात आहे.

शिष्य :- मांसमच्छी खाणे उचित व आवश्यक आहे का?
विवेकानंद :- ते खूप खा बाबा! ते खाऊन जे पाप लागेल ते माझ्या माथी! तुझ्या या देशातल्या लोकांकडे डोळे उघडून तर पहा. त्यांचे चेहरे काळवंडलेले, अंगात साहस उद्यमाच्या नावाने शून्य, पोटाचे नगारे झालेले, हातापायांच्या काड्या, मुलखाचे भित्रे आणि डरपोक असेच आढळून येतील बहुतेक सारे!

शिष्य :- पण धर्माकडे थोडाही कल झाल्यास लोक मांसमच्छी खाणे सोडून देतानाच आढळतात. व्याभिचारापेक्षा मांसमच्छी खाणे अधिक पापाचे असे पुष्कळांचे मत दिसते. या कल्पना आल्या कोठून?
विवेकानंद :- त्या कल्पना कोठून आल्या हे समजून घेऊन तुला काय फायदा? पण या मतामुळे तुमच्या समाजाचा व देशाचा सर्वनाश होत आहे हे तर खरे आहे ना? तुम्ही पूर्व बंगालचे लोक खूप मांसमच्छी खाता, कासवदेखील खाता. पण म्हणूनच शरीरप्रकृतीच्या दृष्टीने तुम्ही पश्चिम बंगालमधील लोकांपेक्षा अधिक चांगले आहात. तुमच्या पूर्व बंगालमधील धनिक वर्गानेदेखील अद्याप रात्री पुऱ्या खाणे सुरु केले नाही म्हणूनच आमच्या इकडच्यासारखा आम्लपित्ताचा अन अपचनाचा उपद्रव तुम्हा लोकांना अजून नाही. मी तर ऐकले आहे की पूर्व बंगालमधील खेड्यापाड्यातील लोकांना आम्लपित्ताचे नाव ऐकूनही अद्याप माहित नाही!

शिष्य :- पण मांसमच्छी यांनी तर रजोगुण वाढतो.
विवेकानंद :- मला तेच तर हवे आहे. आज रजोगुणाचीच आवश्यकता आहे.[8]

विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, “अनेक ब्राम्हण आणि कायस्थ हॉटेलातून मांसमच्छी उडवून येतात अन लागलीच बाहेर येऊन तोंड पुसून समाजाचे नेते म्हणून मिरवतात. त्यांनीच दुसऱ्यांसाठी जातीविषयक आणि खाण्यापिण्याबद्दल नियम केलेले असतात!”[9]

‘भारताला कोणत्या प्रकारचे शिक्षण आवश्यक आहे’ या आपल्या लेखात विवेकानंद मांसाहाराबद्दल आपले मत व्यक्त करतात. ते म्हणतात, “शाकाहारासंबंधी मला असे म्हणायचे आहे की, … जीवहत्या करणे पाप होय यात संशय नाही; तथापि जोपर्यंत शाकाहारी अन्न रासायनिक प्रक्रियांद्वारे मानवी शरीराला यथोचित असे खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहाराखेरीज गत्यंतर नाही. जोवर माणसाला आजच्यासारख्या अवस्थांत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहाराखेरीज उपाय नाही. … अंगमेहनतीची कामे करून जे पोटाला मिळवीत नसतात असा उच्च वर्गाच्या लोकांनी मांस खाऊ नये, परंतु ज्यांना दिवसरात्र काबाडकष्ट करून खाणे लेणे कमवावे लागत असते अशांना जबरदस्तीने शाकाहारी बनविणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमाविण्याचे एक कारण होय. उत्तम पुष्टीकारक अन्नाने काय होऊ शकते याचे जपान हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.”[10]

गोरक्षक आणि विवेकानंद:
२०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत गोरक्षकांनी मोठ्या प्रमाणात हिंस्र स्वरूप धारण केले आहे. त्यांनी देशभरात विविध ठिकाणी जवळपास ७०-७५ निरपराधांचा बळी घेतला आहे. माणूस मारल्याचा विकृत आनंद, आम्ही मुस्लिम मारला म्हणून साजरा केला जात आहे. गोरक्षक नरभक्षक झाले आहेत. एकदा एक गोरक्षक विवेकानंदांना भेटायला आला होता. त्या भेटीचे वर्णन ग्रंथावलीच्या तिसऱ्या खंडाच्या अगदी सुरुवातीला करण्यात आले आहे. त्या भेटीचे वर्णन आणि भेटीत झालेली खालील चर्चा एकदा वाचा.

नरेंद्रबाबू निघून गेल्यावर गोरक्षण मंडळाचा एक प्रचारक स्वामीजींच्या भेटीला आला. पूर्ण जरी नसला तरी त्याचा वेष काहीसा संन्यासासारखा होता. डोक्याला भगव्या रंगाचा फेटा. चेहरा पाहताच तो उत्तर हिंदुस्थानी असल्याची खात्री पटावी. तो आल्याचे कळताच स्वामीजी समोरच्या खोलीत आले. स्वामीजी येताच त्यांना वंदन करून त्याने गाईचे एक चित्र स्वामीजींना दिले. जवळच बसलेल्या माणसाच्या हाती ते चित्र देऊन स्वामीजींनी त्याच्याशी बोलावयास सुरुवात केली.

स्वामीजी :- आपल्या या मंडळाचा उद्देश काय?
प्रचारक :- आम्ही देशातील गाईंची कसायांच्या हातून सुटका करतो. जागोजाग गोशाळा बांधून तेथे रोगी, दुबळ्या आणि कसायांच्या हातून सोडविलेल्या गाईंचे पालन करतो.

स्वामीजी :- फार चांगले काम आहे हे. हा खर्च चालवायला पैशांची काय व्यवस्था करता तुम्ही?
प्रचारक :- आपल्यासारखे उदार लोक दयाबुद्धीने जे काही देतात त्यातूनच हा खर्च आम्ही चालवितो.

स्वामीजी :- आतापावेतो आपल्यापाशी किती पैसा जमला आहे?
प्रचारक :- मारवाडी व्यापारी या कामात सढळ हाताने पैसा ओततात. त्यांनी या कामासाठी बराच पैसा दिलेला आहे.

स्वामीजी :- मध्यभारतात भयंकर दुष्काळ पडला आहे. खुद्द सरकारने नऊ लाख लोक ‘अन्न-अन्न’ करीत मेल्याचे अहवालात जाहीर केले आहे. आपल्या मंडळाने या भुकेलेल्यांना मदत करण्यासाठी काही करण्याचे ठरविले आहे काय?
प्रचारक :- असल्या दुष्काळ-बिष्काळाच्या कामात आम्ही भाग घेत नाही. गोमातेचे रक्षण करण्याच्या हेतूनेच आमचे हे मंडळ स्थापन झाले.

स्वामीजी :- लाखोंच्या संख्येने ‘अन्न-अन्न’ करून आपल्या सारखीच माणसे दुष्काळात मारत असताना, शक्य असूनही त्यांना पोटाला अन्न देऊन मदत करणे तुम्हाला योग्य वाटत नाही काय?
प्रचारक :- नाही. हा दुष्काळ म्हणजे त्यांच्या कर्माचे, पापाचेच फळ होय. जसे करावे तसे भरावे. जसे कर्म तसे फळ.

प्रचारकाचे हे उत्तर एकूण स्वामीजींचे मुखमंडळ अगदी लाल झाले आणि त्यांच्या त्या विशाल डोळ्यातून जणू आग बाहेर पडू लागली. पण संतापाची ती उर्मी आतल्या आत दाबून ते म्हणाले, “ज्या सभा, जी मंडळे माणसासारख्या माणसाकडे सहानुभूतीच्या दृष्टीने पाहत नाहीत, आपलेच बंधूबांधव उपासमारीने तडफडत मारत असल्याचे पाहूनही त्यांचे प्राण वाचविण्यासाठी एक मुठ धन्य न देता पशूपक्ष्यादिकांचे प्राण वाचविण्यासाठी धान्याचे ढीगचे ढीग वाटण्याकरता जे पुढे सरसावतात, त्यांच्याबद्दल मला काडीचीही सहानभूती नाही. अशांच्याकडून समाजाचा काही विशेष फायदा होणे सर्वथा अशक्य होय असे माझे मत आहे. माणूस आपल्या कर्माने मरतो असे म्हणून जर कानावर हात ठेवले तर जगात प्रयत्नाला काही अर्थच राहणार नाही. आणि मग गाईंला वाचविण्याच्या तुमच्या धडपडीला तरी काय अर्थ? आपल्या कर्मांनीच गाई कसायाहाती पडतात आणि मरतात. आम्ही त्यांच्या अंग मोडून काम करण्यालाही अर्थच नाही.”

प्रचारक हे एकूण किंचित हादरलाच. पण स्वतःला सावरून तो म्हणाला, “आपण म्हणता ते तर खरेच. पण शास्त्रात सांगितले आहे की, ‘गाय आपली आई आहे.’ ”

यावर किंचित हसून स्वामीजी म्हणाले, “हो, गाय आपली आई आहे हे तर उघडच दिसते आहे. एरवी असली अलौकिक प्रजा कुणापोटी बरे निपजणार?” स्वामीजींनी मारलेला हा टोमणा त्या प्रचारकाच्या लक्षातच आला नसावा असे दिसले! अधिक चर्चा न करता, स्वामीजींनी या कार्याला काही मदत करावी अशी त्याने विनंती केली.

स्वामीजी :- हे बघा, मी तर हा असा संन्यासी, फकीर. तुम्हाला द्यावयाला माझ्यापाशी कोठून बरे पैसा येणार? आणि यदा कदाचित माझ्या हाती पैसा आलाच तर तो मी आधी माणसांच्या सेवेसाठी खर्च करीन. प्रथम वाचवायला हवा माणूस – आधी त्याला द्यावयाला हवे अन्नदान, विद्यादान, धर्मदान. हे सारे करून जर माझ्या हाती काही शिल्लक राहिले तर मी तुमच्या संस्थेला काही देऊ शकेन.

स्वामीजींचे बोलणे एकूण त्यांना नमस्कार करून तो प्रचारक निघून गेला. तो गेल्यावर स्वामीजी पुढे म्हणतात, “काय पण बोलला! म्हणे की माणूस मरतो आपल्या कर्मांनी, त्याला दया दाखवून काय होणार? देशाचा अधःपात झाल्याचे याच्याइतके दुसरे स्पष्ट प्रमाण नाही. हिंदूधर्मातील तुमचा कर्मवाद कुठल्या अधोगतीला जाऊन पोहोचला आहे हे पाहिले? माणसासारखा माणूस असूनही माणसासाठी ज्याचे हृदय द्रवत नाही, त्याला काय माणूस म्हणायचे?” हे बोलत असताना स्वामीजींचे सारे अंग क्षोभ आणि दुःख यांनी थरारून गेले.[11]

हा संवाद झाला आहे १८९७ साली. बागबाझार कलकत्ता येथील श्री. प्रियनाथ मुखोपाध्याय यांच्या घरी. या संवादाला शरच्चंद्र चक्रवर्ती यांनी शब्दांकित केले आहे. आजच्या गोरक्षकांसाठीदेखील स्वामीजींचा हा संवाद तंतोतंत लागू व्हावा असा आहे. मागील १०० वर्षांत गोरक्षकांच्या मानसिकतेत काडीचाही बदल घडलेला दिसून येत नाही. परंतु आजचे गोरक्षक थोडेसे व्यावहारिक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या गाई जबरदस्ती ‘बेवारस’ म्हणून उचलून आणायच्या; व्यावसायिक भागीदार असलेल्या खाटीकांना गुपचूप विकायच्या; आपल्याच मित्र संघटनांना हाताशी धरून खाटीकांना धमक्या द्यायच्या, लुबाडायचे; आणि शेवटी समाजासमोर धर्मनिष्ठ ‘गोरक्षक’ म्हणून सादर व्हायचे असे काहीसे सत्र देशभरात चालू आहे.

[1] विवेकानंदांबद्दल अधिक माहितीसाठी माझे ‘इस्लामी समतेच्या पथावर – विवेकानंद’ हे पुस्तक अभ्यासावे.
[2] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – १, पृ. ३०५
[3] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – १, पृ. ३०६
[4] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ५, पृ. ९२
[5] Complete Works Of Swami Vivekananda, Vol. 9, Newspaper Reports/Part IIi: Indian Newspaper Reports
[6]  Complete Works Of Swami Vivekananda, Vol. 3, Buddhistic India
[7] दाभोलकर दत्तप्रसाद, शोध विवेकानंदांचा, पृ.२४
[8] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ४, पृ. ११४-११५
[9] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ४, पृ. ११७
[10] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ७, पृ. १७७
[11] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ३, पृ. ६-७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *