प्रकरण ७ – शिवाजी राजांचे मुस्लिम गुरु

भारतीय समाजमनावर मुस्लिम सुफी संतांचा खूप मोठा प्रभाव आहे. आजही दर्ग्यात[1] येणाऱ्या लोकांत मुस्लिमांपेक्षा मुस्लीमेत्तर बांधवांचेच प्रमाण जास्त असते. वर्णवर्चस्ववादी समाज व्यवस्थेत पिचत पडलेल्या उपेक्षितांना मुस्लिम संतांनी प्रेमाचा, दयेचा, करुणेचा आणि सहानभूतीचा इस्लामी संदेश दिला. संतांनी भारतात एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित असणारा धर्म सर्वसामान्यांसाठी खुला केला. कसलाही भेदभाव न पाळता सर्वांना एकाच मानवाची संतान म्हणून संबोधले. याच्याही पुढे जाऊन हे मुस्लिम संत सर्वसामान्य लोकांच्या कामी येऊ लागले. कसलेही धार्मिक भेद न पाळता लोकांना अध्यात्माचे उपदेश करू लागले. यामुळे मोठ्या प्रमाणत भारतीय जनसमुदाय सुफी संतांचे अनुयायी होऊ लागला. त्यांचे शिष्यत्व पत्करू लागला.

शाह शरीफ आणि भोसले घराणे:
असेच एक संत होते नगरचे संत शाह शरीफ. भोसले घराणे या शाह शरीफ सुफी संतांचे अनुयायी होते. शिवाजी राजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्यावर शाह शरीफ यांचा मोठा प्रभाव होता. त्या प्रभावाची कल्पना यावरून येऊ शकते की त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांची नावे संत शाह शरीफ यांच्या नावावर शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली. मालोजीराजे आणि त्यांचे दिवाण कान्हेरेपंत यांचा संबंध मुस्लिम सुफी संत शेख मुहंमद बाबा यांच्याशी देखील आला आल्याचे पुरावे आढळतात. मालोजी राजेंवर शेख मुहंमद बाबांचादेखील मोठा प्रभाव होता. तेच बाबांना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा या ठिकाणी घेऊन आले. तेथे मकरदपूर पेठ हे बाबांचे निवास बनले. इ.स. १५९६ मध्ये मालोजीरावांनी बाबांना एक गुहा बनवून दिली. तेथे ते जप व ध्यान करीत.[2]

शिवाजी राजांवर आई जिजाऊने उच्चप्रतीचे संस्कार केले होते. शिवाजी राजेदेखील आपल्या आजोबाप्रमाणे अनेक मुस्लिम संतांना आपला गुरु मानीत. यात मौनी बाबा, बाबा याकूत, शेख मुहम्मद यांचा उल्लेख करता येतो.

मौनी बाबा:
सह्याद्रीच्या घाटातील पारगाव हे मौनीबाबांचे जन्मस्थळ आहे. साधारणतः हे गाव सद्यस्थितीत कोल्हापूरच्या दक्षिणेस चाळीस मैल अंतरावर आहे. महाराज कोल्हापूरकडे आल्यावर मौनीबाबांचे दर्शन घ्यावे असे त्यांना वाटत होते. कर्नाटकच्या स्वारीवर जाण्यापूर्वी शिवाजी राजे पारगाव येथे मौनी बाबांच्या दर्शनास आले होते. सोबत मोरोपंत पिंगळे होते. पारंपारिक पद्धतीने शिवाजी राजांनी मौनीबाबांच्या तोंडात साखर टाकली. मौनीबाबांनी तोंडातील उच्छिष्ट डोक्यावर ठेवला, हा लाभ मानून शिवाजी राजे दक्षिण विजयास निघाले व पुढे मोठे यश संपादन केले. वास्तविकतः मौनीबाबा मौन धारण करून बसत असावेत.[3]

संत बाबा याकूत:
बाबा याकूत हे रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोटच्या खाडीशी असलेल्या केळशी या गावाचे. शिवाजी राजे नियमितपणे बाबा याकूत यांच्या दर्सगाह येथे हजेरी लावीत. महत्वाच्या कामासाठी जाताना बाबांचा सल्ला घेत. काशिनाथ आठल्येकृत ‘महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र’ या ग्रंथात पान क्र. २१९ वर महाराजांनी गुरुस्थानी मानलेल्या सत्पुरुषांची यादी दिली आहे. त्यात बाबा याकूत केळशीकर असे नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर बाबा याकूत या मुसलमान अवलीयास आपला गुरु केले असे पृ.२२५ वर नमूद केले आहे.[4]

बाबा याकुतची शिकवण होती, प्रत्येक धर्माचे व जातीचे लोक एकाच तळ्यातील पाणी पितात. मुसलमान त्यास ‘पानी’ म्हणतात, हिंदू त्यास ‘पाणी’ म्हणतात, पंडित त्यास ‘जल’ म्हणतात तर कानडी त्यास ‘नीर’ म्हणतात; पण त्याचा फायदा सर्वांना सारखाच वाटतो. त्याचप्रमाणे परमेश्वरास कोणी ‘अल्लाह’, कोणी ‘ईश्वर’, कोणी ‘भगवान’ अश्या निरनिराळ्या नावांनी संबोधतात; पण प्रत्यक्षात तो एकच आहे.[5] बाबांची ही शिकवण इस्लामचा केंद्रबिंदू आहे. इस्लामच्या साऱ्या शिकवणी याच एकेश्वरवादाची प्रदक्षिणा करीत असतात. मुस्लिम सुफी संतांनी हाच एकेश्वरवाद भारतीय समाजासमोर मांडला, ज्याने प्रभावित होऊन आमच्या पूर्वजांनी इस्लामचा स्वीकार केला.

बाबा याकूत यांचे हिजरी १०९३ च्या शाबान महिन्याच्या सहा तारखेस केळशी येथे निधन झाले. हिजरी सन १०९३ म्हणजे इ.स. १६८१ होय. म्हणजेच शिवाजी राजांच्या मृत्युच्या एका वर्षानंतर बाबांचे निधन झाले. शिवाजी राजांनी सुरु केलेल्या पण अपूर्ण दर्ग्यात त्यांचे विधीपूर्वक दफन करण्यात आले. बाबांच्या दर्ग्यासाठी शिवाजी राजांनी उंटबर केळशी गावातील ६५३ एकर जमीन आज्ञापत्राने इनाम दिली होती. शिवाजी राजांनी दर्ग्याचे बांधकाम आपल्या हातात घेतले, परंतु १६८० मध्ये आकस्मिक निधन झाल्याने काम पूर्णत्वास पोहोचले नाही. संभाजी राजांनी दर्ग्याचे बांधकाम घुमटापर्यंत नेले परंतु त्यांच्या हयातीतही हे काम पूर्णत्वास पोहचू शकले नाही. बाबा याकूत यांचा दर्गा केळशी येथे आजही पाहायला मिळतो. या दर्ग्यावर आजही अनेक शिवप्रेमी आपली हजेरी लावत असतात. हिंदू-मुस्लिम एकतेची ही सांस्कृतिक केंद्रे भारतभर विखुरली आहेत. ही ऐतिहासिक केंद्रे असून ‘भक्ती केंद्रे’ किंवा देवस्थळ नाहीत हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

[1] दर्सगाह हा मूळ शब्द असून दर्गाह हा त्याचा अपभ्रंश आहे. दर्सगाह म्हणजे प्रबोधन केंद्र.
[2] वानखेडे, कृ. गो. हमारे मुस्लीम संत कवी, भारत सरकार, पृ.८७
[3] डॉ. यु.एस.सावंत, छत्रपती शिवाजी महाराज व मुस्लिम संत, पृ. १०,११
[4] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. २६
[5] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ८५

One thought on “प्रकरण ७ – शिवाजी राजांचे मुस्लिम गुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *