प्रकरण ८ – शिवाजी राजांचे मुस्लिम सोबती

मनुची या इटालियन प्रवाशाच्या पुस्तकात मीर मुहम्मद या चित्रकाराने काढलेले चित्र आहे. हे चित्र १६६५ च्या आसपास काढलेले चित्र असून हे चित्र शिवाजी राजांचे एकमेव अस्सल चित्र म्हणून ओळखले जाते.[1] मीर मुहम्मद हा औरंजेबाचा पुत्र शाह आलम याचा चित्रकार होता. त्यांने काढलेले चित्र आजही परीसच्या संग्रहालयात उपलब्ध आहे. मीर मुहम्मद याने जर शिवाजी राजांची प्रतिमा आपल्या कुंचल्याने साकारली नसती तर कदाचित आपल्याला शिवाजी राजे कसे दिसत होते, हे कधीच कळाले नसते. या चित्रात शिवाजी राजांसोबत ३१ सैनिक दिसतात. त्यापैकी २० सैनिकांची दाढी आणि वेशभूषा मुस्लिम सदृश्य आहे. वरून हे सैनिक कदाचित मुस्लीम असावेत असा अंदाज बांधता येतो. तसेच शिवचरित्रात अनेक मुस्लिम सोबतींचा उल्लेख आढळतो.

घोडदळातील मुस्लिम सैनिक:
सैन्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे घोडदळ. उत्तम प्रतीचे घोडे खरेदी करणे, त्यांची निगा राखणे आणि घोड्यांना प्रशिक्षण देणे; यासाठी महाराजांचे स्वतंत्र खाते होते. गनिमी काव्याची सारी भिस्त या घोडदळावरच! यावरून अंदाज येऊ शकतो हे खाते किती महत्वाचे होते. या घोडदळाचा प्रमुख मोहम्मद सैस हा एक मुसलमान व्यक्ती होता.[2] तेच मुसलमान ज्यांच्या देशप्रेमावर आज शंका घेतली जात आहे. तेच मुसलमान ज्यांच्या विरोधाचे राजकारण म्हणजे हमखास सत्ताप्राप्ती! तेच मुसलमान जे लांडे म्हणून हिणविले जात आहेत.

घोडदळाला प्रशिक्षित करण्याची जबाबदारी याच मुसलमानांच्या पुत्र मोहम्मद सैसकडे होती. मोहम्मद सैसने संभाजी राजाला घोडस्वारीचे प्रशिक्षण देऊन घोडस्वारीत तरबेज केले होते. याच मोहम्मद सैसमुळे मराठ्यांचे घोडे स्वराज्य स्थापनेकरीता दौडू शकले. घोडदळासारख्या अतिमहत्वाच्या स्थळी एका मुस्लिमाची नेमणूक करणे यावरून हे अगदी स्पष्ट होते की मुस्लिम शिवाजी राजांचे अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक होते.

शिवाजी महाराजांच्या घोडदळात एक लक्ष पाच हजार घोडेस्वार होते. त्यापैकी ६०,००० घोडेस्वार मुस्लिम असल्याचे जॉन फ्लायर आपल्या टिपणीत सांगतात. तसेच घोडदळात बहुतेक मुस्लिम आणि पायदळात हिंदू असून त्यांच्याजवळ बंदुका असत, असा उल्लेख श्री. शेजवलकर पृ. ५०६ वर करतात. त्याचबरोबर इतिहासकारांनी हे देखील नोंदवून ठेवले आहे की स्वराज्यात घोडेस्वारात मुस्लिमांना अधिक प्राधान्य मिळत होते.[3]

आजही असे कित्येक मोहम्मद सैस मुस्लिम समाजात आहेत, जे मानवतेच्या कल्याणासाठी सर्वकाही अर्पण करू शकतात. भारतरत्न ए. पी. जे. अब्दुल कलाम हे त्यातीलच एक! गरज आहे केवळ शिवाजी राजांच्या पारखी नजरेची.

मुस्लिम शिलेदार:
सभासद बखरीत ७६ पानावर शिवाजी राजांच्या अशाच एका मुसलमान शिलेदाराचा उल्लेख आहे. त्याचे नाव शमाखान. राजवाड्यांच्या ‘मराठ्यांच्या इतिहासाचे साधने’ या ग्रंथाच्या खंड १७ मधील पान १७ वर नूरखान बेग याचा ‘शिवाजीचा सरनोबत’ म्हणून उल्लेख आहे.[4] सरनोबत म्हणजे सैन्यप्रमुख. हा शिवाजी राजांचा पहिला सरनोबत. त्याने मोठमोठे पराक्रम गाजविल्याचा उल्लेख आहे. याचा कालावधी १६५७ ते १६५९ असा होता.[5] परंतु सरनोबत म्हणेज कोण? हे जाणल्याशिवाय आपल्याला या जबाबदारीचे महत्व कळणारच नाही. चला पाहूयात, शिवाजी राजांचा सरनोबत नूरखान बेग नेमके काय होता?

१ घोड्यास        –           १ बारगीर
२५ बारगीरांस    –           १ धारकरी हवालदार
५ हवालदारांस –           १ जुमला
१० जुमाल्यास   –           १ हजारी
५ हजारीस        –           १ पंचहजारी

पंचहजारी सरनोबताच्या हुकुमात, शिलेदाराकडे सुभे वेगळाले, तेही सरनोबताच्या आज्ञेत. पागा व शिलेदार सरनोबताच्या आज्ञेत वर्तावे. संपूर्ण लष्कराचे सर्वोच्च अधिकाराचे स्थान हे सरनोबताचे आहे. स्वराज्याचे अतिशय महत्वाचे असलेले सरनोबताचे हे स्थान एक मुसलमानाकडे शिवाजी राजांनी दिले होते. कदाचित हे विधान असत्य वाटेल; परंतु हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. नूरखान बेग १६५७ ला मराठ्यांचा सरनोबत होता, असा उल्लेख शिवकालीन पत्रसार संग्रह, खंड १, पृ,१५७ मध्ये येतो. तसेच वि. का. राजवाडेसुद्धा ‘मराठा इतिहासाची साधने, खंड १७’ मध्ये पृ. १७, लेख १० मध्ये हेच सांगतात. नूरखान संदर्भात श्री. शेजवलकर एक अव्वल पुरावा आपल्या या ग्रंथात पृ.३१५ वर देतात.[6]

मुस्लिम सरदार:
सिद्दी हिलाल हा असाच आणखी एक मुसलमान सरदार शिवाजी राजांच्या पदरी चाकरीला होता. रुस्तुमजमा व फाजलखान यांचा शिवाजीने रायबागेजवळ पराभव केला. त्यावेळी सिद्दी हिलाल शिवाजी राजांच्या बाजूने लढला. त्याचप्रमाणे १६६० मध्ये सिद्दी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळीसुद्धा हिलाल आणि त्याच्या पुत्र वाहवाह नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्दी हिलालचा पुत्र जखमी व कैदी झाला.[7] इ.स. १६७२ मध्ये मोगलांच्या घोडदळाची चार पथके स्वराज्य सेवेत सामील करून घेण्यासाठी सिद्दी हिलालने मोठे प्रयत्न केले होते. बहलोलखानशी १६७३ मध्ये उमराणीजवळ लढून त्याने त्याला शरण येण्यासाठी भाग पाडले. सिद्दी वाहवाह हा सिद्दी हिलालचा पराक्रमी मुलगा. १६६०च्या पन्हाळ्याच्या वेढ्यात सिद्दी जौहरवर तुटून पडला व मोठा पराक्रम गाजवला.[8]

आरमारातील मुस्लिम सैनिक:
शिवाजी राजांच्या आरमाराबद्दल भाष्य करताना एस. टी. दास म्हणतात, शिवाजीच्या वेळी आरमाराचे वरिष्ठ अधिकारी आणि सागरी किल्ल्याचे प्रमुख हे सर्व मुस्लिम होते.[9] शिवाजी राजांच्या आरमाराचे प्रमुख तसेच तोफची मुसलमान होते. पानसरे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या दूरदृष्टीच उदाहरण म्हणून त्यांनी केलेली आरमारची उभारणी सांगण्यात येते आणि ते बरोबरच आहे. कोकणपट्टीच्या विस्तृत भूभागाला समुद्राचे सानिध्य आहे. या सर्व भागाच्या रक्षणासाठी आरमार आवश्यक होते. ते शिवाजीने उभारले. अशा महत्वाच्या विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुसलमान सरदार होता. त्याचे नाव दौलतखान. दर्यासारंग दौलतखान. [10]

पानसरे येथे दर्यासारंग आणि दौलत खान हे एकच असल्याचे सांगतात. परंतु सुरेंद्रनाथ सेन दर्यासारंग आणि दौलतखान या दोघांचा स्वतंत्र उल्लेख करतात. दर्यासारंगच्या हाताखाली १६० गलबते होती. तो स्वराज्याचा पहिला आरमारप्रमुख.[11] दर्यासारंग आणि दौलतखान यांच्या कर्तुत्वाबद्दल भाष्य करताना सेन म्हणतात, “शिवाजी राजांचे आरमार पूर्णत: मुस्लिम अधिकारी दर्यासारंग आणि दौलतखान यांच्या आदेशाखाली देण्यात आले होते.”[12]

या मर्द मराठी मुस्लिमांनी मिळून इंग्रजांना अरबी समुद्राचे पाणी पाजले आणि स्वराज्याच्या नौदलाचा दबदबा निर्माण केला. या नौदल प्रमुखांनी इंग्रजांच्या ‘रिव्हेंज’सह बारा अजस्त्र जहाजांना समुद्राचा तळ दाखवून इंग्रजांच्या काळजाचे पाणी-पाणी केले. इंग्रजांचे ‘डोव्हर’ नावाचे जहाज जिंकून त्यावर स्वराज्याचे निशाण अभिमानाने फडकाविले.[13] याव्यतिरिक्त इब्राहीम खान, सुलतान खान, दाऊद खानसारखे नावाजलेले एकापेक्षा एक श्रेष्ठ नौदल प्रमुख मुस्लिम समाजाने शिवाजी राजांना दिले.

असाच उल्लेख पाश्चात्य इतिहासकार ग्रांट डफदेखील करतो. शिवाजी महाराजांचा पोर्तुगीज समकालीन इतिहासकार कोस्मा डा गार्दा देखील याचा उल्लेख करतो. महादेव गोविंद रानडे देखील आपल्या ग्रंथात याचा उल्लेख करतात.[14] दौलतखानच्या भीतीने धास्तावलेला एक इंग्रज प्रमुख लिहितो, “शिवाजीचा आरमारी सेनापती दौलतखान काही गुराबा व आठ-दहा शिबाडे ताडवे घेऊन येत आहे असे कळले तरी त्याचे आरमार येताना दिसताच शिडे उभारून एकदम बंदरात जावे.[15] आरमारातील तोफखान्यात तोफा डागणारे गोलंदाज हे मुस्लिम असत, असा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केल्याचे शिवचरित्रात आढळते.[16]

जेव्हा हिंदूंसाठी समुद्रप्रवास निषिद्ध होता तेव्हा समुद्राच्या छातीवर उभे राहून स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या जिवाचीही पर्वा न करणारे मुसलमानच होते; ज्यांना आज दहशतवादी आणि देशद्रोही सारखी दुषणे लावली जात आहेत. आलमगीर औरंगजेबांच्या विरुद्ध लढताना राजा शिवाजींनी खासगीतही मुस्लिमांच्या प्रामाणिकतेवर संशय घेतल्याचा एकही पुरावा सापडत नाही. परंतु आज कोण्या एक दहशतवाद्यामुळे समस्त मुस्लिम समाजाला संशयाचा दृष्टीने पाहिले जात आहे, यापेक्षा अन्यायाची गोष्ट दुसरी कोणती नसेल.

तोफखान्यातील मुस्लिम सैनिक:
जेव्हा स्वराज्याचा व्याप वाढू लागला, तेव्हा गडकोटावर तोफा पेरल्या जाऊ लागल्या. त्यावेळी शिवाजी राजांनी आपला तोफखाना ज्याच्या ताब्यात दिला ते इब्राहीम खान मुसलमानच होते.[17] अनेक अजिंक्य डोंगरी किल्ले जिंकताना इब्राहीम खानच्या तोफखान्याची खूप मदत झाली. तो सुमारे २०० तोफांचा तोफखाना सदैव स्वराज्याच्या लढाईसाठी तयार ठेवी.[18] शिवाय शिवाजी राजांच्या सर्वच तोफखान्यांचे तोफा डागणारे गोलंदाज हे मुस्लिम असत.[19] तोफखाना म्हणजे राजा लष्कराचे सामर्थ्यस्थळ. युद्धात हा तोफखानाच निर्णायक भूमिका बजावत असे. कारण तोफा म्हणजे त्या काळचे सर्वात प्रगत असे हत्यार. किल्ल्यांच्या लढाईत त्यांचे महत्व फार मोठे. अशा महत्वाच्या स्थळी शिवाजी राजांनी मुस्लिमांची वर्णी लावली होती. पानिपत १७६१ च्या लढ्यातदेखील मराठ्यांचा तोफखाना प्रमुख इब्राहीम खान गारदी नावाचा एक मुसलमानच होता! सदाशिव पेशवेचे प्राण वाचविताना त्यास वीरगती प्राप्त झाली.

प्रशासकीय सेवेत मुस्लिम:
शिवाजी राजांनी मुस्लिम समाजाला केवळ लष्करातच सहभागी केले असे नाही तर अत्यंत महत्वाची प्रशासकीय पदे देखील देऊ केली. शिवाजी राजांनी अभूतपूर्व असा विश्वास मुस्लिम समाजावर टाकला आणि मुस्लिम समाजाने तो विश्वास सार्थ करून दाखविला. शिवाजी राजांच्या सैन्यात जितके स्वकीय मुस्लिम होते तितकेच किंवा संख्येने अधिक परकीय मुस्लिमदेखील होते. सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहिम, सिद्दी वाहवाह हे सर्व परकीय मुस्लिम, यमनहून आलेले. स्वराज्यातील एकही मुस्लिम मावळा असा नाही ज्याने शिवाजींशी विश्वासघात केला असावा.

शिवाजी राजांचे प्रशासन:
पानसरे लिहितात, शिवाजीच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकाऱ्यांनी शिवाजीशी सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठविला. तेव्हा शिवाजीने उलट काजी हैदर यांस मोगलांकडे पाठवले. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुसलमान. त्या काळातील समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान अशी असती तर असे घडले नसते. [20]

शिवाजी राजांनी मुस्लिमांना केवळ लष्करातच सहभागी केले असे नाही तर प्रशासनात देखील सहभागी करून घेतले. स्वराज्याचा सर्व गुप्तव्यवहार आणि परराष्ट्र विषयक कारभार सांभाळण्याची विश्वसनीय कामगिरी अरबी व फारसी भाषेत निष्णांत असणाऱ्या मौलाना काजी हैदर या मुस्लिम धर्मगुरुवर सोपविण्यात आली. शिवाजी राजांची राजमुद्रादेखील त्यांच्याच स्वाधीन करण्यात आली. ही काही साधारण बाब नव्हे! गुप्तव्यवहार आणि परराष्ट्रविषयक खाते म्हणजे स्वराज्याची सर्व शक्तीस्थळे आणि मर्मस्थळे याची इत्यंभूत माहिती असणारे खाते. इतक्या महत्वाच्या खाती एक मुस्लिम मौलानाच्या हाती देण्याचे काम राजांनी करून दाखविले. याचे गांभीर्य एक सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित व्यक्तीच समजू शकतो. मुस्लिम व्यक्ती, तीही धर्मपरायण; अशी मुस्लिम व्यक्ती विश्वासघात करणारच नाही याचा किती भयंकर विश्वास शिवाजी राजांना! हा विश्वास सार्थच ठरला.

राजांच्या विश्वासाचे चीज करणाऱ्या मौलाना काजी हैदरवर राजांनी आणखीन एक महत्वाची जबाबदारी सोपविली. ती म्हणजे स्वराज्याचा सर न्यायाधीश होण्याची! होय, स्वराज्याचा पहिला सरन्यायाधीश होण्याचा मान एका मुस्लिम व्यक्तीस मिळाला, ही मराठी मुस्लिमांसाठी गर्वाचीच बाब आहे.

शिवाजी राजांची सुरक्षा:
स्वराज्यासाठी काम करणारा एकही मुस्लिम कधी बेईमान झाला नाही. म्हणून राजांच्या विश्वासाला सर्वात जास्त हाच समाज पात्र ठरला. महाराजांचे ३१ पैकी २० अंगरक्षक मुस्लिम होते म्हणजेच ६४.५ टक्के![21] गोविंद पानसरे लिहितात, शिवाजीच्या खास अंगरक्षकात व खासगी नोकरात अत्यंत विश्वासू म्हणून मदारी म्हेतर याचा समावेश होता. आगऱ्याहून सुटकेच्या नाट्यमय प्रसंगात या विश्वासू मुसलमान साथीदाराने शिवाजीराजांना काय म्हणून साथ दिली? शिवाजी मुस्लिमद्वेष्टा असता तर असे घडले असते काय?[22]

सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम आणि फराश मदरशहा (मदारी) तर सावलीप्रमाणे राजांच्या सोबत असायचे. मदारी मेहतरच्या मृत्यूसमयी धाय मोकलून रडणारा शिवाजी राजा रायगडाने याची देही याची डोळा पहिला आहे. अफजलखान भेटीच्या वेळी राजांच्या सोबत असणारा विश्वासू मावळा म्हणजे सिद्दी इब्राहीम. राजांच्या अत्यंत महत्वाच्या गाठीभेटी, चर्चात सिद्दी इब्राहिमचा सहभाग असायचा.

पन्हाळगडाच्या वेढ्यात सिद्दी हिलालने आपल्या पुत्रासह शिवाजी राजाच्या रक्षणार्थ प्राणाची बाजी लावली. राज्याभिषेकाला स्वकीयांकडूनच विरोध होत असताना मौलाना काजी हैदर, नूरखान बेग, सिद्दी इब्राहीम, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह, मदार फराशहा (मदारी), खान मियाना, दर्या सारंग, दौलत खान, दाउद खान, हुसेन खान मियाना, सुलतान खान, सिद्दी अंबर वहाब, सिद्दी मिस्त्री आणि मोहम्मद सैससारख्या स्वकीय आणि परकीय मुस्लिमांनी राजांना साथ दिली. शिवाजी ‘राजे’ व्हाहेत हेच स्वप्न उराशी बाळगूनच त्यांनी प्रामाणिकपणे शिवाजी राजांकडे चाकरी केली. वेळप्रसंगी आपले रक्त सांडून स्वराज्याचे पीक घेतले. आजही असे असंख्य मुस्लिम मानवतेसाठी आपल्या जीवाचे बलिदान देत आहेत, देऊ शकतात आणि भविष्यातही देतील. गरज आहे केवळ शिवाजी राजांच्या दृष्टीकोनाची…….!

[1] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२६
[2] प्रा. नामदेवराव जाधव, शिवराय, पृ.३२
[3] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ४८
[4] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.२९
[5] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२४
[6] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ४७
[7] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.२९
[8] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२४
[9] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ५८
[10] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.२९
[11] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ. २५
[12] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ५८
[13] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ. २५
[14] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ५८
[15] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ६२
[16] प्रेम हनवते, शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक, पृ. ६३
[17] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.२८
[18] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.२४
[19] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ. २५
[20] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ.२९
[21] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ. २६
[22] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता, पृ.२९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *