लव्ह जिहाद

सामाजिक तेढ निर्माण करून धर्मांध राजकारण करू पाहणाऱ्या स्वार्थी राजकारणी आणि धर्मांध विचारसरणींच्या कुवैचारिक व्याभिचारातून जन्माला आलेले अनौरस अपत्य म्हणजे ‘लव्ह जिहाद’. लव्ह म्हणजे प्रेम तर जिहाद म्हणजे संघर्ष. प्रेमात संघर्ष तर असतोच! परंतु प्रेमाच्या नावावर जो कथित जिहाद केला जात असल्याचा अपप्रचार केला जात आहे यात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

लव्ह जिहादचा इतिहास:
देशात सर्वप्रथम प्रमोद मुतालिक या धर्मांध माथेफिरूने ‘लव्ह जिहाद’बद्दल अपप्रचार सुरु केला. त्यापूर्वी ‘लव्ह जिहाद’ संकल्पना अस्तित्वात नव्हती. प्रमोद मुतालिकची ‘श्री राम सेना’ या अपप्रचारामुळे दक्षिण भारतात अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. २००९ मध्ये कर्नाटक CID ने ‘लव्ह जिहाद’ संदर्भात आपला तपास सुरु केला. तपासाअंती असा निष्कर्ष देण्यात आला कि ‘लव्ह जिहाद’ अस्तित्वात असल्याचा कसलाही पुरावा नाही. पुढे २०१० मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार Jacob Punnoose, DIG कर्नाटक आणि IG कर्नाटक यांनी एक तपासमोहीम राबविली. तपासाअंती त्यांनी कोर्टात अहवाल सादर केला कि ‘लव्ह जिहाद’ अर्थातच हिंदू मुलींचे धर्मपरीवर्तन करण्यासाठी मुस्लिम  व्यक्ती किंवा संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या संघटीत कृत्याच्या अस्तित्वात असण्याची तिळमात्रही शक्यता नाही.[1] २०१० मध्ये कर्नाटक सरकारने कोर्टात अहवाल सादर केला की ‘लव्ह जिहाद’ च्या अस्तित्वात असण्याचा कसलाही पुरावा नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने याअनुसार आपला निर्णय दिला.[2] २०१२ मध्ये केरळ पोलीसांनी तपासाअंती केरळ उच्च न्यायालयात अहवाल सादर केला कि ‘लव्ह जिहाद’ एक निराधार संकल्पना आहे, ज्याला सत्याचा कसलाही आधार नाही. ज्याच्या आधारावर केरळ उच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’ एक निराधार संकल्पना असल्याचा निकाल दिला.[3] २०१४ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयात अहवाल सादर करून ‘लव्ह जिहाद’च्या अस्तित्वास नाकारले. अलाहाबाद हायकोर्टने ‘लव्ह जिहाद’ शब्दाच्या वापरास थांबविण्याचा निर्णय दिला, कारण हा शब्द एका विशिष्ट जनसमूहाच्या विरोधात जनभावना भडकाविण्याचे काम करतो.[4]

येथे ही गोष्टदेखील वाचकांच्या निदर्शनास आणून द्यावीसी वाटते कि ‘लव्ह जिहाद’च्या अपप्रचाराचा वापर मुजफ्फरनगर येथील नरसंहारात हिंदू जनसमूहाला चेथविण्यासाठी करण्यात आला होता. भारतात सहसा दंगे भडकाविण्यासाठी हे प्रभावी शस्त्र सिद्ध होत आहे कि हिंदुच्या मुलींना मुस्लिम समाजाचे मुलं फूस लावीत आहे किंवा छेडीत आहेत.

लव्ह जिहाद आणि धर्मांध राजकारण:
बहुजन समाजाला वास्तविक मुद्द्यापासून विचलित करण्यासाठी आणि आपल्या सत्तेचे घुबाळ मजबूत करण्यासाठी काही स्वार्थी सत्ताधारी आणि धर्मांधांनी केलेली राजकीय उपज म्हणजे ‘लव्ह जिहाद’. जनसामन्यांच्या मुलींनी आपल्या मर्जीने आंतरधर्मीय विवाह केल्यास याला ‘लव्ह जिहाद’चे नाव दिले जाते. परंतु जेव्हा यांच्याच मुली मुस्लिम  तरुणांशी विवाह करतात तेव्हा याची वाच्यता कोठेच केली जात नाही. आंतरधर्मीय विवाह भारतात मध्ययुगीन कालखंडापासून प्रचलित आहेत.

स्त्रीला गुलाम समजण्याची मानसिकता:
खरे पाहता ‘लव्ह जिहाद’च्या अपप्रचारामागे स्त्रीला गुलाम समजण्याची मानसिकता कार्यरत आहे. स्त्री आमच्या समाजाची प्रतिष्ठा आहे; ती जेव्हा इतर समजात जाते तेव्हा आमचा धर्म बुडतो किंवा आमची संस्कृतीचा ऱ्हास होतो, यासारखी मानसिकता येथे कार्यरत असते. मुलींना फूस लावून पळविले जात आहे वगैरे अपप्रचार करणारे काय मुलींना इतके बावळट समजतात की त्यांना आपला जीवनसाथी निवडण्याची देखील अक्कल नसावी? त्यांना हे देखील समजू नये की काय योग्य आहे नि काय अयोग्य? मुलींनी त्यांच्या जीवनाचा निर्णय आमच्या मताला अनुसरूनच घ्यावा अशी मानसिकता येथे दिसत नाही का? मुलींना काहीच कळत नाही, आम्ही त्यांना दाखवू काय योग्य की काय अयोग्य असाच याचा अर्थ नाही का?

मध्ययुगीन कालखंड आणि आंतरधर्मीय विवाह:
सम्राट अलाउद्दीन खिलजी यांनी गुजरातच्या राजकन्या कमलादेवी यांच्याशी विवाह केला होता.[5] खिजर खान याने गुजरातची दुसरी राजकन्या दावलदेवी यांच्याशी विवाह केला होता.[6] भारताचे आणखी एक सम्राट गयासुद्दिन तुग्लक यांची आई जाट समाजाची होती.[7] मुहम्मद बिन तुग्लक यांनी हिंदूशी विवाह केला.[8] लोदी साम्राज्याचा संस्थापक बहलोल लोदी याने सोनार समाजातील महिलेशी विवाह केला होता.[9] मुगल सम्राट अकबर याने कच्छचा राजा बिहारीमल यांची पुत्री जोधाबाईशी विवाह केला. आणखी ४ राजपूत मुलींशी अकबराने विवाह करावा असा आग्रह तिने धरला.[10] अकबर पुत्र जहांगीर यांची पत्नी राजा भगवानदास यांची कन्या होती. जहांगीर पुत्र शहाजहानचा जन्म याच राजपूत आईच्या पोटी झाला होता.[11] सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहान यांच्या विवाहात असणाऱ्या एकूण राजपूत कन्यांची संख्या १७ सागितली जाते.

राजकीय आंतरधर्मीय विवाह:
पाकिस्तानचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष झुल्फिकार अली भुट्टो यांचा जन्म एका दलित महिलेच्या पोटी झाला होता. देशाचे माजी उपराष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा विवाह पुष्पाशी झाला होता.

धर्माचे राजकारणी आणि आंतरधर्मीय विवाह:

मुख्तार अब्बास नक्वी विश्व हिंदू परिषदेचे सर्वेसर्वा अशोक सिंघल यांचे जावई आहेत. शहनवाज हुसैन आणि रेणू शर्मा यांनी प्रेमविवाह केला आहे. मुरली मनोहर जोशी यांचा जावई मुस्लिम  आहे. भाजपचे लोहपुरूष अडवाणी यांचा जावई मुस्लिम  आहे. बाळासाहेब ठाकरे यांची नात नेहा ठाकरे-गुप्ते गुजराती उद्योजक मन्नान या मुस्लिम  तरुणाशी विवाहबद्ध झालीे आहे. ‘लव्ह जिहाद’ बद्दल बेंबीच्या देठापासून गरळ ओकणाऱ्या सुब्रमन्यम स्वामी यांच्या मुलीने, सुहासिनीने नदीम हैदर या मुस्लिम  तरुणाशी अरेंज प्रेम विवाह केला आहे.[12]

Bollywood आणि आंतरधर्मीय विवाह:
अमीर खान याची पहिली पत्नी रीना दत्त होती तर किरण राव त्याची दुसरी पत्नी आहे. सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस मुस्लिम होती.शाहरुख खानने आपली मैत्रीण गौरी हिच्याशी प्रेम विवाह केला. हृतिक रोशन यांची पत्नी सुझेन खान होती. शर्मिला टागोरने भारतीय क्रिकेटर मन्सूरअली खान यांच्याशी विवाह केला. सुनील शेट्टीने माना कादरी हिच्याशी प्रेमविवाह केला. सैफअली खानने करीना कपूरशी विवाह केला. मनोज वाजपेयी यांची पत्नी शबाना रझा आहे. अरबाज खानने मलाईका अरोराशी विवाह केला. तर शर्मिला टागोर पतौडीचे नवाब मंसूरअली खान यांच्याशी विवाहबद्ध झाली. संजय दत्तने दिलनवाझ शेखशी विवाह केला. विवाहानंतर दिलनावाझ मान्यता झाली. प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याने त्याची मैत्रीण सुतपा सिकदर हिच्याशी विवाह केला. मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद यांनी रीना दास यांच्याशी विवाह केला. किशोर कुमारने मुमताज बेगमशी विवाह केला होता. डायरेक्टर कबीर खानने मिनी माथुरशी विवाह केला. प्रसिद्ध पाश्चात्य मुस्लिम साहित्यिक महेमूद मामदानी यांनी डायरेक्टर मीरा नायर हिच्याशी विवाह केला. डायरेक्टर इम्तियाझ अली यांनी त्यांची मैत्रीण प्रीती हिच्याशी विवाह केला. मुघल-ए-आझम चे डायरेक्टर के असिफ यांनी सितारा देवी या नृतकीशी विवाह केला होता.

आंतरधर्मीय विवाह आणि इस्लाम:
आंतरधर्मीय विवाह हा सामान्य बहुजनांना भडकविण्याचे प्रभावी हत्यार म्हणून वापरले जात आहे. कोणत्याही काळात आंतरधर्मीय विवाह समाजात वितुष्ट निर्माण करण्याचेच साधन राहिला आहे. म्हणून इस्लामने मुस्लिम  पुरुषांना यापासून दूर राहण्यास प्रोत्साहित केले आहे. मुस्लिम  तरुणांना मी जाहीर आवाहन करतो कि राष्ट्रहितासाठी त्यांनी अशा गोष्टीपासून स्वतःस दूर ठेवावे, यातच राष्ट्राचे आणि सर्व समाजाचे हित आहे. जेणेकरून धर्मांध आणि स्वार्थी राजकारण्यांना राजकारण करण्याची संधी भेटू नये.

हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुस्लिमांची एक स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. ते मुस्लिम मुलांना महागड्या गाड्या, मोबाईल, कपडे आणि भरपूर पैसे देतात, ज्याचा वापर हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी केला जातो. हिंदू मुली या आमिषांना बळी पडतात आणि मुस्लिम तरुणांशी विवाह करतात. ज्या विवाहासाठी त्यांचे धर्मांतर केले जाते, असा एकूण अपप्रचार लव्ह जिहादबद्दल केला जातो. विचार करण्याची गोष्ट आहे की यामध्ये मुस्लिम तरुण धूर्त, कपटी सिद्ध होवो किंवा न होवो, हिंदू तरुणी मात्र बिनडोक, बालिश, गाडी-पैसा-मोबाईल यांना हपापलेल्या सिद्ध होतात. ज्या केवळ थोड्याश्या पैशासाठी आपला धर्म विसरून आपली संस्कृती बुडवायला निघतात. तसेच या इतक्या बिनडोक, बुद्धिहीन असतात की आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याची पात्रताही त्यांच्या अंगी नसते. जेणेकरून धर्मरक्षकांना त्यांच्या मागे ‘निर्णायका’च्या भूमिकेत उभे राहावे लागते. आता हिंदू मुली अशा असतात की नाही हे ‘लव्ह जिहाद’ च्या काल्पनिक संकल्पनेवर विश्वास ठेवणाऱ्यांनीच सांगावे.

© Mujahid Shaikh

(टीप – जर तुम्हाला सदरील लेख उपयुक्त वाटत असेल तर हा लेख तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या संस्थेच्या नावाने प्रकाशित करू शकता. सदरील लेखात लाभदायक फेरबदल करण्याची, मूळ मजकूर बदलण्याची खुली परवानगी लेखकातर्फे देण्यात येत आहे. हा लेख आहे तसा किंवा तुम्हाला अपेक्षित असलेल्या बदलांसह छापून समाज जागृतीच्या कार्यात आपला सहभाग नोंदवा.)

[1] https://www.deccanherald.com/content/35486/kerala-police-have-no-proof.html
[2] http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/lsquoNo-love-jihad-movement-in-State/article16024518.ece
[3] https://web.archive.org/web/20131211064437/http://gulftoday.ae/portal/9af0ebf3-d10f-4592-bd7e-9a0dc0d37bc6.aspx
[4] http://indianexpress.com/article/india/india-others/no-existence-of-love-jihad-in-up-govt-tells-high-court/
[5] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.१३१
[6] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.१३८
[7] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.१६६
[8] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ. २०१
[9] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.२०९
[10] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.७४
[11] महाजन, व्ही. डी., मध्यकालीन भारत, पृ.७४
[12] सय्यद हमीद मोहसीन, गैरसमजांचे निराकरण, पृ. ३२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *