प्रकरण ५ – ज्ञान, विज्ञान आणि इस्लाम

१९४७ साली आपला देश ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झाला परंतु ते स्वातंत्र्य केवळ बाह्य स्वातंत्र्य होते असे वाटते. आज आपला देश ब्रिटीशांचा नव्हे तर साऱ्या पाश्चात्य राष्ट्रांचा मानसिक गुलाम आहे. पाश्चात्यांच्या संदर्भाशिवाय आपल्याकडे सुधारणावादी, परिवर्तनवादी, पुरोगामी, उदारमतवादी विचार जणू मांडलेच जाऊ शकत नाहीत. पाश्चात्य सांगतील ते सत्य, ते दाखवितील तीच पूर्व दिशा या अविर्भावात आपण त्यांच्याकडे पाहत असतो. पाश्चात्य सभ्यता अंगीकारणे म्हणजे कोण प्रगती करणे म्हणावे! असा आपल्या समाजाचा समज झाला आहे. परंतु या पाश्चात्य राष्ट्रांचा इतिहास काय आहे? आज ते जेथे आहेत तेथे कसे पोहोचले? हे जाणून घेण्याचे प्रयत्न मात्र आपल्याकडील विचारवंत करीत नाहीत.

मानवजातीच्या उन्नतीस हातभार लावण्याच्या बाबतीत ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मांची परस्पर तुलना हे परिशिष्ठ स्वामी विवेकानंद ग्रंथावलीच्या पहिल्या भागाच्या शेवटी लावण्यात आलेले आहे. ते परिशिष्ठ मी आहे तसे येथे देत आहे. या परिशिष्टात विवेकानंदांनी मानवजातीच्या विकासातील मुस्लिमांचे योगदान अधोरेखित केले आहे.

“युरोपियन लोक जिची इतकी बढाई करतात त्या ‘सभ्यतेच्या उन्नती’चा (Progress of Civilization) अर्थ काय आहे? तिचा अर्थ आहे – अनुचित साधनांना उचित ठरवून आपला मतलब साधने – कसेही आणि काहीही करून आपला उद्देश सिद्धिस नेणे. यालाच म्हणतात – to make the end justify the means – कार्यभाग साधला म्हणजे झाले, मग ती कसल्याही का उपायांनी साधेना, त्या उपायांना भलेच मानणे. कुणी नुसती चोरी, लबाडी केली किंवा बरोबरच्या भुकेल्या मुसलमान पहारेकऱ्यांनी घासभर अन्न चोरलं म्हणून स्टेनलेचे चाबकाने त्यांना फोडून काढणे आणि फाशी देणे या साऱ्याला ही ‘सभ्यतेची उन्नती’ उचित ठरवून त्यांचे समर्थन करते. जिथे म्हणजे युरोपियन गेले आहेत तिथल्या मूळ रहिवाशांचा पार फन्ना उडाला आहे. याला कारण ‘दूर व्हा, मी येथे येऊ इच्छितो’ ही सुप्रसिद्ध युरोपियन नीती. या ‘सभ्यतेच्या उन्नतीनुसार’ ही नीती उचित ठरते, समर्थनीय ठरते! या ‘सभ्यतेच्या उन्नतीनुसार’ लंडनमध्ये व्यभिचार आणि Paris मध्ये बायकापोरांना असहाय अवस्थेत सोडून टाकून पळणे आणि आत्महत्या करणे ‘अमळ चूक’ ठरते, गुन्हा नव्हे.

आता इस्लामच्या पहिल्या तीन शतकांतील त्या (इस्लामी) सभ्यतेच्या द्रुत विस्ताराशी ख्रिस्तीधर्माच्या पहिल्या तीन शतकांची तुलना करून बघा. आपल्या पहिल्या तीन शतकांत ख्रिस्तीधर्म जगाला पुरता माहीतदेखील होऊ शकला नव्हता; आणि Constantine ने तलवारीच्या जोरावर आपल्या राज्यात त्याला प्रवेश दिला, तेव्हापासून ख्रिस्ती धर्माने अध्यात्मिक वा भौतिक सभ्यतेच्या प्रसाराला कधी आणि कोणते बरे साहाय्य केले आहे? पृथ्वी स्थिर नसून ती फिरते आहे, हे पहिल्यांदा सिद्ध करणाऱ्या युरोपीय विद्वानाला ख्रिस्तीधर्माने काय बक्षीस दिले? ख्रिस्तीधर्माने शास्त्रज्ञाचे कधी बरे स्वागत केले आहे, स्वीकार केला आहे? ख्रिस्ती संघाचे लिखाण दिवाणी वा फौजदारी कायद्यांच्या, शिल्पकलेच्या किंवा व्यापारउदीमाच्या गरजा पुरवू शकते? Profane (धर्मव्यतिरिक्त इतर विषयावरील) लिखाणाच्या प्रचाराला ‘चर्च’ अजूनदेखील अनुमती देत नाही. आज ज्याचा (आधुनिक) विद्येत आणि विज्ञानात प्रवेश झाला आहे त्याला खरोखर प्रामाणिक ख्रिस्ती असणे शक्य आहे? ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ जे New Testament आहे, त्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही विज्ञानाची अथवा कलेची प्रशंसा नाही. परंतु असे एकही विज्ञान वा अशी एकही कला नाही की प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कुरआनात अथवा हदीसमध्ये जिला ठिकठिकाणी अनुमोदन नि प्रोत्साहन देण्यात आलेले नाही. व्होल्टेअर, डार्विन, बुक्नेर अशाच साऱ्या श्रेष्ठ विचारवंत व्यक्तींना वर्तमान काळीही ख्रिस्ती धर्माकडून धिक्कार आणि सनातनी ख्रिस्त्यांकडून शिव्याशाप लाभत आहेत. उलट या साऱ्या लोकांविषयी इस्लामचे असे मत आहे की, हे सगळे आस्तिक आहेत, फक्त यांचा पैगंबरावर विश्वास नाही, इतकेच. या दोन धर्मांपैकी कोण उन्नतीला सहाय्यक ठरला आहे आणि कोण उन्नतीला बाधक ठरला आहे याचा नीट तलास लावल्यास आढळून येईल की, इस्लाम जिथे गेला तिथल्या मूळ रहिवाशांचे त्याने रक्षण केले आहे – तिथे त्या जाती अजूनही अस्तित्वात आहेत, त्यांची भाषा, त्यांचे जातीत्व अजूनही टिकून आहे.” भारतातील ८०% मुस्लीमेत्तर समाज याची जिवंत साक्ष नाही का?

विवेकानंद पुढे म्हणतात, “घडले आहे का ख्रिस्तीधर्माकडून असे काही कुठेतरी? स्पेनमधले अरब, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील आदिवासी आज कुठे आहेत? ख्रिस्ती लोक युरोपीय ज्यूंची आज काय दशा करीत आहेत? एक दान करण्याची प्रथा वगळली तर युरोपात अशी आणखीन कोणतीही पद्धत नाही की जी बायबलशी जुळेल, जी बायबलविरोधी नसेल. युरोपात जी काही उन्नती झाली आहे, ती सारी ख्रिस्ती धर्माला विरोध करून – ख्रिस्तीधर्माविरुद्ध बंड करून. आज जर युरोपात ख्रिस्तीधर्माला ती पूर्वीची सत्ता असती तर ‘पाश्चर’ आणि ‘कोक’सारखे वैज्ञानिक जिवंत जाळले गेले असते आणि डार्विनसारख्यांना सुळी देण्यात आले असते. आधुनिक युरोपात ख्रिस्ती धर्म आणि सभ्यता या दोन अगदी विभिन्न गोष्टी आहेत. आपला जुना वैरी जो ख्रिस्तीधर्म, त्याचा धुव्वा उडविण्यासाठी आणि पाद्र्यांचा नायनाट करून त्यांच्या कबज्यांतून शैक्षणिक आणि धर्माथ संस्था हिसकावून घेण्यासाठी (युरोपीय) सभ्यतेने कंबर कसली आहे. अज्ञानात पिचणारा बहुजन समाज नसता तर ख्रिस्ती धर्माचे आजचे आपले किळसवाणे जिणे क्षणभर टिकवून धरू शकला नसता, त्याचा अगदी समूळ नाश झाला असता; कारण शहरातील गरीब समाज आजही ख्रिस्ती धर्माचा सख्खा शत्रू आहे! करा आता याच्याशी इस्लामची तुलना. मुसलमान देशांतील समस्त प्रथा-पद्धती इस्लामी धर्मावर उभारलेल्या आहेत, तेथील धर्मगुरूंना राज्यातील अधिकाऱ्यांकडून खूप सन्मान मिळतो आणि इतर धर्मांचे गुरुही तिथे सन्मानित होतात. [1]

न्यायशास्त्र, वैद्यकशास्त्र, चिकित्साशास्त्र, विज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रात मुस्लिमांनी केलेले संशोधन जगाला मार्गदर्शक ठरले. इस्लामच्या उदयाने जगात ज्ञान आणि चिंतनाचा प्रसार आणि प्रचार झाला. मुस्लिमांनी सलग ११ शतके जगाचे नेतृत्व केले. सातव्या शतकापासून थेट सतराव्या शतकापर्यंत ज्ञान, विज्ञान आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रावर मुस्लिमांचे वर्चस्व होते. इब्न हैसमने (इ.स.९६५ ते १०३९) अवकाशशास्त्रावर संशोधन केले. इब्न सीनाने (इ.स. ९८० ते १०३७) मुस्लिम तत्ववेत्त्यांना एक नवी उंची प्राप्त करून दिली. अल ख्वारीज्मीने (इ.स. ७९५ ते ८४७) अंकगणित आणि त्रिकोणमितीचा पाया रचला. इमाम राजी यांनी (इ.स. ८६५ ते ९२५) वैद्यकशास्त्रात असे स्थान प्राप्त केले की अनेक वैद्यकीय शोध त्यांच्या नावावर आहेत. अबुल कासीम झहरावी यांनी (इ.स. ९३६ ते १०१३) शल्यचिकित्सेचा आद्यग्रंथ लिहिला. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना शल्यचिकित्सेचा पितामह ठरविले गेले. जाबीर इब्न हय्यान यांनी (इ.स. ७२१ ते ८१५) रसायनशास्त्रावर बहुमूल्य काम केले. त्यांनी ३००० पेक्षा जास्त शोध निबंध लिहिले. अबू फाराबी यांनी (इ.स. ८७२ ते ९५०) तत्वज्ञान, तर्कशास्त्र, समाजशास्त्र, नीतिशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, दर्शनशास्त्र आणि राजनीतिशास्त्र इ. क्षेत्रात भरीव कामगिरी केली. इब्ने रुशद यांनी (इ.स. ११२६ ते ११९८) विविध विषयांवर ७८ पेक्षा जास्त ग्रंथ लिहिले. अल इद्रिसी (इ.स. ११०० ते ११६६) जगातील एक थोर भूगोल तज्ञ म्हणून नावारूपास आले. इमाम गजाली, इमाम रुमी, इब्न बैतार, इब्न हिशाम आणि इब्न तैमियासारख्या शेकडो मुस्लिम तत्ववेत्ते, विद्वान आणि पंडितांनी सलग अकरा शतके जगाला ज्ञानाचा प्रकाश दिला.

यावर भाष्य करताना रॉबर्ट ब्रीफ्फाल्ट म्हणतो, “आमच्या विज्ञानावर अरबांचे उपकार केवळ त्यांच्या आश्चर्यजनक शोध आणि क्रांतिकारक सिद्धांत आणि परिकल्पनांपुरते मर्यादित नाहीत, तर विज्ञानावर अरब सभ्यतेचे याहून फार मोठे असे उपकार आहेत आणि ते म्हणजे स्वतः विज्ञानाचे अस्तित्व.[2]

इब्न खल्दूनने (इ.स.१३३२ ते १४०४) इतिहास आणि समाजशास्त्रावर केलेल्या संशोधनातून कार्ल मार्क्ससारखा विद्वान जन्माला आला. अल-बैरुनीने (९३७ ते १०५०) जगभर भ्रमंती करून आपली प्रवासवर्णने जगाला दिली. यामुळे जगाला विविध भागांचा इतिहास मिळाला. त्यांचा ‘किताब अल हिंद’ भारतीय इतिहासात महत्वाचा ग्रंथ मानला जातो. भारतात इतिहासलेखनाच्या कार्याला मुस्लिमांच्या आगमनामुळे चालना मिळाली. या संदर्भात भाष्य करताना आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, “फारशी भाषेत भारताचा बराचसा इतिहास लिहिलेला आहे. तुम्ही एखादा मुसलमान मित्र गाठून त्याला त्याचे भाषांतर करावयास सांगा.”[3]

[1] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – १, पृ. ३४५-४६
[2] Briffault Robert, The Making Of Humanity
[3] दाभोलकर, शोध विवेकानंदांचा, पृ.८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *