प्रकरण ५ – इस्लामी तत्वांशी साधर्म्य

शिवाजी राजांनी दिलेले अनेक आदेश भारतीय परिप्रेक्षात पूर्णतः नवीन आहेत. अगदीच स्पष्टपणे बोलायचं तर शिवाजी राजांचे हे निर्णय मुस्लिम शासकांच्या निर्णयाशी साधर्म्य राखणारे आहेत. मुस्लिम न्यायव्यवस्थेमध्ये स्त्रीशी निगडीत गुन्ह्याला कठोरतम शिक्षा सुनावली जात असे. बलात्कारसारख्या गुन्ह्यांना तर अक्षम्य अपराधांच्या यादीत टाकून देहदंड सुनावला जात असे. शिवाजी राजांनी याच शिक्षा आपल्या राज्यात लागू केल्या. ‘दाही दिशांतूनी उदात्त विचार येऊ दे’ या तत्वाचा पुरस्कार करून शिवाजी राजांनी मुस्लिमांच्या परिणामी इस्लामच्या अनेक तत्वांचा स्वीकार केलेला दिसतो.

शिवाजी राजांची करप्रणाली:
राज्य आणि जनता यांतील संबंध आणि करार यांच्याशी संबंधित ‘कर प्रणालीवर’ जगभरात आजवर अनेक संशोधने झाली आहेत. साम्राज्यवादी व्यवस्थेत जनतेची पिळवणूक करणारी करप्रणाली जनतेवर लादण्यात आली हे सर्वांना माहीत आहे. इस्लाम जगातील एकमेव अशी समाजव्यवस्था आहे जिने या करप्रणालीत अमुलाग्र बदल घडवून आणले आणि जगातील आदर्श अशी करप्रणाली विकसीत केली. शासन जनतेकडून २.५% ते जास्तीत जास्त २०% रक्कम कर स्वरुपात वसूल करू शकते, हे मुस्लिम कायदेपंडितांनी जगात सर्वप्रथम मांडले. त्यातही उत्पादन कर, व्यावसायिक कर आणि बचत कर अशी विभागणी करून भिन्न प्रकारची करमर्यादा निश्चित केली.

मुस्लिम कायदेपंडितांनी जगाला ‘जकात’ च्या संकल्पनेशी परिचित केले. आज आपल्या देशात लागू असलेली महसूल व्यवस्था ही मुस्लिम कायदेपंडितांचीच देणगी आहे. शिवाजी राजांनी मुस्लिमांची ही जकात व्यवस्था स्वीकारली होती. २४ ऑगस्ट १६७७ शिवाजी महाराजांनी डच कंपनीला एक कौलनामा दिला. त्यात म्हंटले आहे, “जिंजी प्रांताच्या परिसरात डच कंपनीला व्यापार करण्यास परवानगी देण्यात येत आहे. डचांना कड्डलोर येथे मालावर अडीच टक्के जकात भरावी लागेल.”[1]

येथे ‘जकात’ हा शब्दही मुळचा अरबी भाषेतील! त्यातही जकातचे २.५% प्रमाण मुस्लिम न्यायशास्त्रातील सामान्य दर. आजही भारतात अनेक ठिकाणी जकात नाके पाहिले जाऊ शकतात. मुळातच या आधुनिक करप्रणालीचा जनक मुस्लिम समाज असल्याने त्यांनी दिलेल्या संज्ञा आजही वापरात आणल्या जातात. परंतु हेदेखील ध्यानी असू द्यावे की मुस्लिम कर प्रणालीनुसार शासन प्रजेकडून जास्तीत जास्त २० % कर घेऊ शकते. यापेक्षा एक छदामही जास्त घेण्याचा शासनाला न्याय्य अधिकार राहत नाही.[2]

इतर बाबतीत साधर्म्य :
शिवाजी राजांनी केवळ गुन्हेगारी कायदे आणि करप्रणालीतच मुस्लिम तत्वांचे अनुकरण केले असे नाही तर त्यांनी अनेक लष्करी आदेशही दिले ज्यांवर मुस्लिम तत्वांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. युद्धप्रसंगी केवळ शस्त्र हातात घेऊन लढणाऱ्याशीच लढावे, कोण्या स्त्री, अपंग, वृद्ध, संन्यासी आणि बालक यांवर हात उगारू नये. शेतीची नासधूस करून नये. फळझाडे, वृक्ष यांना आगी लाऊ नये. आर्थिक केंद्रे ऊध्वस्त करू नये. सांस्कृतिक धरोहरला हात लावता कामा नये. अतिरेक करून नये इ. नियमांवर आधारित युद्धसंहिता १४०० वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांच्या करवी जगाला देण्यात आली. मुस्लिमांनी या संहितेवर आचरण करीत एक आदर्श जगासमोर सादर केला. या संहितेची अनेक तत्वे शिवाजी महाराजांनी आदेश स्वरुपात आपल्या मावळ्यांना सांगितल्याचे दाखले सापडतात.

तसेच सुफी संतांच्या भारतातील वास्तव्याने हिंदू-मुस्लिम या दोन्ही धर्मीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. हिंदू पुरुषांनी मुस्लिम पुरुषांचा झब्बे व तंग तुमानी हा पोशाख वापरणे इत्यादी अनेक गोष्टीमधून ही सांस्कृतिक देवाणघेवाण दिसून येते. या गोष्टी शिवाजी राजांच्या पूर्वीपासून घडत आल्या होत्या. शिवाजी राजांचा पोशाख व राहणीमान यातूनही हा सांस्कृतिक प्रभाव जाणवतो. अशी सांस्कृतिक आदानप्रदान होणे ही गोष्ट नैसर्गिकच आहे.[3] शिवाजी महाराजांचा पोशाख हा तत्कालीन हिंदू जहागीरदार, मनसबदार आणि राजे यांच्यापेक्षा भिन्न होता. तो मुस्लिमांच्या पोशाखाशी साधर्म्य दाखविणारा पोशाख होता. तसेच शिवाजी राजे मुस्लिमांप्रमाणे डोक्यावर कापडी मुकुट परिधान करीत. पूर्वीचा पारंपारिक रत्नजडीत धातुयुक्त मुकुट त्यांनी नाकारला होता हे तर स्पष्ट आहे. चंद्रशेखर शिखरे यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, शिवाजी महाराजांनी इस्लामी धर्म-संस्कृती आत्मसात करून स्वराज्याची स्थापना केली. मराठ्यांनी इस्लामी धर्म-संस्कृती आत्मसात केली म्हणून त्यांचे स्वतंत्र राज्य उभे राहू शकले. मराठे कोणत्याही प्रकारच्या इस्लामगंडापासून मुक्त राहिले.[4]

[1] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ. २१
[2] करप्रणाली बद्दल अधिक माहितीसाठी माझे ‘जकात – मुस्लिमांची करप्रणाली’ या पुस्तकाचा अभ्यास करावा.
[3] शिखरे चंद्रशेखर, प्रतिइतिहास, पृ.४५
[4] शिखरे चंद्रशेखर, प्रतिइतिहास, पृ.४६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *