प्रकरण ६ – इस्लामचा समतावाद

इस्लामने जगाला विशेषतः भारताला दिलेली दुसरी अमूल्य देणगी म्हणजे समतेचे व्यवहारिक आचरण. जन्माच्या आधारावर उच्च-नीच मानल्या जाणाऱ्या समाजात, एखाद्या विशिष्ट जातीजमातीला अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात, कुत्र्याने तोंड घातलेले नव्हे तर शूद्राने हात लावलेले अन्न अपवित्र-विटाळ मानणाऱ्या समाजात खांद्याला खांदा लाऊन उभे राहणे, एकाच ताटात बसून सर्वांनी जेवणे, उपासनाघराचे सार्वजनिक असणे इ. गोष्टी कमालीच्या आकर्षक होत्या. त्यांच्या विचार विश्वात वादळ निर्माण करणाऱ्या होत्या. याची साक्ष राजाराम मोहन रॉयपासून महात्मा जोतीबा फुलेपर्यंत अनेक भारतीय समाजसुधारक देतात. पंडित जवाहरलाल नेहरुंचे यासंदर्भातील भाष्य पहा, “इस्लामचे आगमन भारतासाठी फार महत्वाचे आहे. इस्लामच्या समतावादी दृष्टीकोनाने आणि मुसलमानांच्या व्यवहारिक समतेने हिंदूंवर कमालीचा प्रभाव पाडला. विशेषतः ते लोक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले जे हिंदू समाजात समता आणि सन्मानापासून वंचित राहिले होते.” [1]

इस्लामने व्यवहारिक आचरणात प्रस्थापित केलेल्या समतेबद्दल भाष्य करताना विवेकानंद म्हणतात, “आपल्या मनश्चक्षुसमोर उभे राहतात समतेचे उद्गाते – हजरत महंमद पैगंबर. तुम्ही कदाचित म्हणाल की महंमदांच्या धर्मात चांगले ते काय असणार? पण लक्षात ठेवा, त्यांच्या धर्मात चांगले खचितच आहे. एरवी तो धर्म अजूनही टिकला कसा बरे असता? जे चांगले असते तेच केवळ कालाच्या विनाशक शक्तीवर मात करीत असते; इतर सर्वकाही कालाच्या भक्षस्थानी पडले तरी ते मात्र टिकून राहत असते. जे काही चांगले असते ते सबळ व दृढ असते आणि म्हणून तेच टिकतही असते. अपवित्र माणसाच्या आयुष्याची मर्यादा या जगात तरी अशी केवढी असते? सदाचारी पवित्र माणसाचे आयुर्मान त्यापेक्षा अधिक नसते काय? अलबत असते. कारण, बल असते पवित्रतेतच, सदचारातच. म्हणून महंमदांच्या धर्मात चांगले काहीच नसते, तर तो इतके दिवस तगलाच कसा असता? मुसलमान (इस्लाम) धर्मात कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. महंमद पैगंबर समतेचे आचार्य होते, मानवजातीतील बंधुभावाचे प्रचारक होते, मुसलमानांतील भ्रातृभावाच्या अग्निमंत्राचे दीक्षागुरु होते.

महंमद पैगंबर आपल्या स्वत:च्या जीवनाने असा धडा घालून गेले आहेत की त्यांच्या अनुयायांमध्ये – मुसलमानांमध्ये – संपूर्ण समता आणि बंधुत्व निरंतर नांदावयास हवे; त्यांच्यात जातीचा, मताचा, वर्णाचा व लिंगाचा भेद कदापि शिरकू नये. तुर्कस्तानचा सुलतान आफ्रिकेच्या गुलामांच्या बाजारातून एखादा निग्रो गुलाम विकत घेऊन त्याला साखळदंडाने बांधून तुर्कस्तानात आणील, पण तोच गुलाम जर मुसलमान होईल आणि त्याच्या अंगी जर खरोखर काही वकूब असेल तर फार काय पण तो त्या सुलतानाच्या शहजादीशी शादीदेखील करू शकेल. मुसलमानांतील हा उदारभाव कुणीकडे आणि या तुमच्या अमेरिकेतील लोकांची निग्रो व रेड इंडिअन लोकांशी अमानुष वागणूक कुणीकडे? दोहोंची अमळ तुलना करून बघा! तुमचा एखादा पाद्री यदाकदाचित चुकून जरी आमच्यातील एखाद्या कट्टर हिंदूच्या अन्नाला शिवेल, तर तो आपल्या पुढ्यातील ताटचे ताट बाहेर ओतून आल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. एवढे उच्च, उदात्त तत्वज्ञान उराशी बाळगूनही आम्ही हिंदू लोक प्रत्यक्ष आचरणात, रोजच्या व्यवहारात किती दुबळे ठरतो हे खरोखर लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु अन्यधर्मियांच्या तुलनेने मुसलमान लोक याबाबतीत कितीतरी श्रेष्ठ ठरतात. जातीचा किंवा वर्णाचा विचार न करता सर्वाप्रती समभाव बाळगणे हे मुसलमानांचे उज्ज्वल वैशिष्ठ्य आहे.” [2] भारतात शासन करण्यासाठी आलेला पहिला मोगल शासक बाबर हा गुलामच होता. इस्लामचा स्वीकार करून हा गुलामांचा वंश शासनकर्ता मोगल वंश बनला.

मुहम्मद पैगंबरांनी दिलेला समतेचा संदेश केवळ शाब्दिक नव्हता तर त्याला व्यावहारिक स्वरूप प्राप्त झाले होते. मुस्लिमांनी प्रस्थापित केलीले समता आधुनिक जगाच्या मुल्यांच्या जागी विराजमान झाली. २८ जानेवारी १९०० रोजी कॅलेफोर्निया येथे दिलेल्या ‘सार्वजनीक धर्म प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग’ या व्याख्यानात विवेकानंद ख्रिस्ती पाद्र्यांना सुनावताना म्हणतात, “इस्लाम धर्माचेच उदाहरण घ्या. ख्रिस्ती लोक सर्वांत जास्त द्वेष जर कोणत्या धर्माचा करीत असतील तर तो इस्लाम धर्माचाच. त्यांच्या मते जगात आत्तापर्यंत होऊन गेलेल्या धर्मांमध्ये तोच सर्वात निकृष्ट प्रतीचा धर्म आहे. एखाद्या माणसाने इस्लाम धर्माचा स्वीकार करताच सर्व मुसलमान लोक कोणताही भेदभाव न ठेवता त्याला बंधू मानून आलिंगन देतात. दुसरा कोणताही धर्म तसे करीत नाही. तुमच्या अमेरिकेतील रेड इंडियन लोकांपैकी जर एखाद्याने इस्लाम धर्म स्वीकारला तर तुर्कस्थानच्या सुलतानाला त्याच्याबरोबर अन्नग्रहण करण्यात काहीच हरकत वाटणार नाही. जर तो बुद्धिमान असेल तर कोणतीही मानाची जागा त्याला सहज मिळू शकेल. या अमेरिकेत मला अजूनही असे एकही चर्च वा प्रार्थनामंदिर आढळून आलेले नाही की ज्या ठिकाणी श्वेतवर्णी माणसाबरोबर निग्रो प्रार्थना करू शकतो. या गोष्टीचा विचार करून पहा. इस्लाम धर्म आपल्या सर्व अनुयानांना समान मानतो आणि हेच इस्लाम धर्माचे सर्वोत्कृष्ट असे वैशिष्ट्य आहे.” [3]

इस्लाम समानतेच्या तत्वांबाबत इतका दक्ष आहे की तो या समतेला किंचितही ढळू देण्याची संधी निर्माण होऊ देत नाही. १० एप्रिल १९०० रोजी ‘उपासनेचे प्राथमिक स्वरूप’ या व्याख्यानात स्वामीजी म्हणतात, “जगात इस्लाम धर्मापेक्षा वैधी उपासनेला विरोधी असा धर्म केव्हाही निर्माण झाला नाही. … मुसलमान लोकांना चित्रही चालत नाही, शिल्पही चालत नाही व संगीतही चालत नाही. … कारण त्यांतून वैधी उपासना निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचा काजी (नमाजचे नेतृत्व करणारा इमाम) श्रोत्यांकडे तोंड करून कधीच बसत नाही. त्याने जर तसे केले तर तो इतरांहून वेगळा पडेल. असा वेगळेपणा ते असू देत नाहीत.” [4]

प्रसिद्ध साहित्यिक मुन्शी प्रेमचंद म्हणतात, “समानतेच्या बाबतीत इस्लाम जगांतील इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ ठरतो. ज्या तत्वज्ञानाच्या निर्मितीचे श्रेय आज कार्ल मार्क्स आणि रुसो यांना दिले जाते ते तत्वज्ञान आणि संस्कृती वास्तविकतः अरबस्थानच्या वाळवंटात जन्माला आली. प्रेषित मुहम्मद त्या तत्वज्ञानाचे आणि सभ्यतेचे जनक होते.”[5]

[1] Jawaharlal Nehru, Discovery of India
[2] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ४, पृ. १५९-१६०
[3] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ७, पृ. ९१
[4] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ७, पृ. १३६
[5] साप्ताहिक प्रताप, डिसेंबर १९२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *