प्रकरण ९ – इस्लाम आणि भारताचे भवितव्य

भारताचे भवितव्य या देशातील विविध समाजांच्या एकत्र राहण्यावर अवलंबून आहे. विविधतेने नटलेली आपली एकता आपण टिकवू शकलो, परस्पर सहकार्याची भावना जर वृद्धिंगत झाली, सहिष्णुता जर आपल्या अंगी बाळगली तर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे. या देशाच्या विकासासाठी हिंदू-मुस्लिम समाजाने इतिहासातील चुकांना मूठमाती देऊन एकत्र येणे गरजेचे आहे. इस्लाममध्ये जे काही मानवी समाजासाठी हितकारक आहे त्याचा हिंदूंनी स्वीकार करणे म्हणजे ‘बाटणे’ नव्हे! इस्लामची समतावादी शिकवण स्वीकारण्याची शिफारस स्वामी विवेकानंद उघडपणे करतात.

१० जून १८९८ रोजी नैनिताल येथील आपले मित्र महंमद सरफराज हुसैन यांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, “माझा तर असा अनुभव आहे की, आजवर कोणता धर्म या समतेच्या निकट पोहोचला असेल तर तो केवळ इस्लाम धर्मच होय. त्यामुळे माझी अगदी पूर्णपणे खात्री पटली आहे की, वेदांत मताचे सिद्धांत कितीही सूक्ष्म असले तरी जोपर्येंत इस्लाम धर्मातील प्रत्यक्षात आणलेल्या समतेची त्यांना जोड दिली जात नाही तोपर्यंत ते सर्वसामान्य मानवांच्या दृष्टीने पूर्णपणे निरुपयोगी होत.” [1]

आपल्या स्वप्नातील भारत कसा आहे हे सांगताना स्वामीजी म्हणतात, “आपल्या मायभूमीच्या दृष्टीने विचार करता हिंदूधर्म आणि इस्लाम धर्म यांचा समन्वय अर्थात वेदांतातील एकत्वाचे तत्वज्ञान आणि इस्लाम धर्मामधील प्रत्यक्षातील समता यांचा मिलाफ हेच एकमेव आशास्थान होय. या गोंधळातून आणि झगड्यातून उदयास येणारा वैभवसंपन्न, अजिंक्य, परिपूर्ण असा उद्याचा भारत मला माझ्या मनश्चक्षूसमोर दिसत आहे.  वेदांती मेंदू आणि इस्लामी देह धारण करून भावी भारत उदयास येणार आहे.” [2]

हिंदू समाज हा देशातील बहुसंख्य समाज आहे. हा बहुसंख्य समाज देशाची दिशा निर्धारित करण्यात निर्णायक भूमिका बजावत असतो. हिंदू समाजाने हे ठरविणे फार गरजेचे आहे की ते देशाला कोणत्या दिशेला घेऊन जाऊ इच्छित आहेत? ते देशाला एक सहनशील, सहिष्णू, पुरोगामी, उदारमतवादी राष्ट्र बनवू इच्छित आहेत की एक असहिष्णू, प्रतिगामी आणि रूढीवादी राष्ट्र बनवू इच्छित आहेत? कारण येणारा काळ हा विश्व बंधुत्वाचा असेल. वैश्विक एकतेचा असेल. सहिष्णुतेचा असेल, उदारमतवादाचा असेल, सहजीवनाचा असेल.

मुस्लिम समाज देशातील एक पंचमांश समाज आहे. देशातील प्रत्येक पाचवी व्यक्ती मुस्लिम आहे. देश केवळ दगड, माती, प्रांत आणि संसाधनांचा नसतो. असला तरी या बाबी दुय्यम दर्ज्याच्या असतात. प्रथम दर्जा व्यक्तीला प्राप्त आहे, माणसाला प्राप्त आहे. देश माणसांचा असतो. आपल्यातील प्रत्येक पाचवी व्यक्ती मुस्लिम असताना केवळ भूतकाळातील विकृत रुपात मांडल्या गेलेल्या काही घटनांच्या आधारावर आपल्यातीलच एका समाजाप्रती कमालीची द्वेष भावना बाळगल्याने आपल्या समाजाचा विकास कसा बरे होणार? आपली उन्नती कशी बरे होणार?

एकाच कुटुंबातील काही सदस्य इतर सदस्यांच्या विरोधात उभी ठाकली असतील, त्यांच्याविरोधात षड्यंत्र रचित असतील तर हे वेगळे सांगायला नको की त्या कुटुंबावर विनाश ओढवणार आहे. राष्ट्राच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. देशात अशा शक्ती कार्यरत आहेत की ज्या मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनविण्यासाठी सक्रीय आहेत. त्यांना वाटते की मुस्लिमांनी या देशात राहावे परंतु दुय्यम दर्जा स्वीकारून. आमच्या हाताखालचे जीवन पत्करून. हे म्हणजे आपल्याच शरीराचा एक भाग शस्त्रक्रिया करून निष्क्रिय करण्यासारखे आहे. आपल्याच शरीरातील एक भाग निष्क्रिय केल्याने नुकसान कोणाचे होणार? २० कोटी नागरिकांना ‘दुय्यम दर्जाचे’ नागरिक बनविल्याने नुकसान आपल्याच राष्ट्राचे होणार. क्रयशक्ती आपलीच कमी होणार. उलट २० कोटी विकलांगांना पोसण्याचा अतिरिक्त भार देशाच्या माथी मारला जाईल.

या भयंकर परिस्थितीची जाणीव झालेले अनेक जागरूक नागरिक समाजात वावरत आहेत. जरुरी आहे की त्यांनी राष्ट्रहितासाठी व्यक्त व्हावे. हिंदू-मुस्लिम समुदायांत समन्वय घडविण्याचा प्रयत्न करावा.

 

[1] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ७, पृ. ३८०

[2] स्वामी विवेकानंद ग्रंथावली, भाग – ७, पृ. ३८१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *