कुर्बानीबाबत इस्लामी दृष्टीकोन

प्रकरण ६ वे

एक गैरसमज असा आहे की इस्लाममध्ये प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर कुर्बानी अनिवार्य आहे. कुर्बानीच्या अनिवार्यतेबाबत कोणताही आदेश इस्लामी साहित्यात आढळून येत नाही. इस्लामनुसार कर्मांची ५ भागात विभागणी करण्यात आली आहे. कर्मांचे ५ प्रकार खालीलप्रमाणे आहेत.

1। फर्ज म्हणजे अनिवार्य
2। मुस्तहब म्हणजे प्रोत्साहित
3। मुबाह म्हणजे परवानगीकृत
4। मकरुह म्हणजे तिरस्कृत
5। हराम म्हणजे निषिद्ध

कुर्बानी वरीलपैकी दुसऱ्या प्रकारात मोडते. इमाम मालिक, इमाम शाफई आणि इमाम अहमद (अल्लाह कृपा करो सर्वांवर) या महान मुस्लिम धर्मशास्त्रींनी आणि बहुसंख्य मुस्लिम कायदेपंडितांनी कुर्बानीच्या अनिवार्यातेला नाकारले आहे.[1] हदीसग्रंथ विद्वानांचे यावर एकमत आहे की कुर्बानी अनिवार्य नाही. इमाम बुखारी यांनी आपल्या सहीहमध्ये ‘कुर्बानी सुन्नत असल्याचे वर्णन’ या शीर्षकाखाली कुर्बानी प्रोत्साहित कर्म असल्याची चर्चा केली आहे.[2] तसेच इमाम तीर्मिजी यांनीदेखील ‘कुर्बानी सुन्नत असल्याचे पुरावे’ या शीर्षकाखाली कुर्बानी प्रोत्साहित कर्म असल्याचे पुरावे संकलित केले आहेत. पुराव्यांच्या अंती ते लिहितात, विद्वानांच्या दृष्टीत कुर्बानी अनिवार्य नाही. प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांची सुन्नत (प्रोत्साहित कर्म) आहे.[3]

कुर्बानी अनिवार्य आहे असे जरी गृहीत धरले तरी इस्लामचे कोणतेही कर्म सरसकट अनिवार्य नसते. उदा. नमाज अनिवार्य आहे परंतु एका निर्धारित वयानंतर नमाज अनिवार्य होते. अनिवार्य झाली तरी दिवसाचे २४ तास नमाज अदा करणे किंवा रात्रभर नमाज अदा करणे निषिद्ध कर्म आहे.[4] नमाज निर्धारित वेळेवरच अदा केली पाहिजे. वेळेच्या मर्यादांचे भान न ठेवता नमाज अदा केली जात असेल तर हा अतिरेक इस्लाम खपवून घेत नाही. रोजा अनिवार्य आहे परंतु वर्षभराचे ३६५ दिवसांसाठी नाही. वर्षातून केवळ एकदा निर्धारित करण्यात आलेल्या रमजान या महिन्याचेच रोजे अनिवार्य आहेत. अनिवार्य झाले तरी समस्त मुस्लिम समुदायावर अनिवार्य झाले आहेत असाही भाग नाही. आजारी, बाळंतीण, वृद्ध, मासिक धर्म आलेली स्त्री, प्रवासी, गर्भवती आणि बालक यांच्यावर रोजे अनिवार्य नाहीत.[5] जकात अनिवार्य आहे परंतु एका ठराविक आर्थिक स्थैर्य प्राप्तीनंतर जकात अनिवार्य आहे. प्रत्येक कमावित्या व्यक्तीसाठी जकात अनिवार्य नसते.

कुर्बानीचेही अगदी असेच आहे. बहुसंख्य मुस्लिम विद्वानांनुसार कुर्बानी अनिवार्य नाही. अनिवार्य नाही याचा अर्थ असा नाही कि कधीच कुर्बानी केली नाही तरी चालते. कुर्बानी अनिवार्य नसून प्रोत्साहित कर्म आहे. काहीच कारण नसताना कुर्बानी केली जात नसेल किंवा कुर्बानीला विरोध केला जात असेल तर हा इस्लामी प्रतीकांप्रती निष्ठा नसल्याचा पुरावा आहे. कुर्बानी अनिवार्य नाही तरीही महत्वाची का आहे हे समजण्यासाठी एक उदाहरण पहा. राष्ट्रगीताचा आदर करण्यासाठी उठून उभे राहणे अनिवार्य नाही.[6] परंतु याचा अर्थ असा तर होऊ शकत नाही कि या आधारावर एखादी व्यक्तीने राष्ट्रगीतासाठी उठून उभे राहण्याला किंवा राष्ट्रध्वजाला सलामी देण्यालाच विरोध करीत सुटावे.

जे विद्वान कुर्बानीला अनिवार्य मानतात ते मान्य करतात कि कुर्बानी प्रत्येक व्यक्तीवर अनिवार्य नसून केवळ कुर्बानीसाठी आर्थिकदृष्ट्या पात्र असलेल्या कुटुंब प्रमुखावरच अनिवार्य आहे. त्याने केलेली कुर्बानी त्याच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. कुर्बानीच्या बाबतीत अतिरेक होऊ नये म्हणून कुर्बानीच्या बाबतीत इस्लामी दृष्टीकोनातून या सूचना केल्या जाऊ शकतात.

कुर्बानीसाठी पशू पाळण्याचा प्रयत्न करावा
आपल्याला सर्वाधिक प्रिय असलेल्या वस्तू किंवा व्यक्तिचे सत्यासाठी त्याग किंवा बलिदान करणे म्हणेज कुर्बानी होय. त्यामुळे कुर्बानीचा पशुही शक्यतो आपल्या घरी काही दिवस आधी आणून आपल्या हाताने त्यास खाऊ-पिऊ घालावे. जेणेकरून त्याची काळजी घेण्याने त्याबद्दल आपणांस प्रेम आणि ओढ वाटू लागते. अशा पशुची जेव्हा आपण कुर्बानी देतो त्यावेळी आपल्या भावना जागृत झाल्याशिवाय राहत नाहीत. ही खऱ्या अर्थाने कुर्बानी असते. केवळ आर्थिक परिस्थिती आहे किंवा देखावा करायचा आहे म्हणून कुर्बानी करण्याचे टाळावे. पशु घरी आणून पाळलेच पाहिजे असा काही दंडक नाही.

कुर्बानीच्या बाबतीत अतिरेक करू नये
कुर्बानी प्रत्येक व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीत अनिवार्य आहेच, असे नसल्यामुळे कुर्बानीच्या संदर्भात अतिरेक करू नये. एखाद्या वेळेस कुर्बानी करावी, तर एखाद्या वेळेस केवळ अनिवार्य नसल्याच्या कारणाने कुर्बानी करू नये. जागतिक मुस्लिमांचे आदर्श असलेल्या चार आदर्श खलिफांपैकी पहिले आणि दुसरे खलिफा अबू बकर आणि उमर कुर्बानीबाबतीत अनियमितता राखायचे.[7] या संदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता लोकांनी कुर्बानीबाबतीत अतिरेक करू नये म्हणून आम्ही असे करतो, असे ते म्हणायचे. तसेच विनाकारण कुर्बानी न करून किंवा कुर्बानीला विरोध करून नकारात्मक भूमिकेचा अतिरेकही करू नये.

कुटुंबातर्फे एकच कुर्बानी करावी
अनेकदा असे होते कि एकत्र कुटुंबपद्धतीच्या प्रभावामुळे सर्व भावंडं एकत्र राहत असतात. अशा वेळेस देखील कुटुंबातर्फे केवळ कुटुंबप्रमुखानेच कुर्बानी करण्याचा आदेश असल्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यातर्फे स्वतंत्र कुर्बानी करू नये. कुटुंबातर्फे एकच कुर्बानी पुरेशी आहे. प्रेषितांचे अनुयायी अबू अय्युब अन्सारी याची साक्ष देतात की प्रेषितांच्या काळात कुटुंबातर्फे केवळ एकच कुर्बानी केली जायची.[8] धर्माच्या बाबतीत आचरणात प्रेषितांचे सोबती सर्वोत्तम होते. म्हणून त्यांनी दाखविलेला आचरणाचा मार्ग अनुसरावा.

गाय-बैलाची कुर्बानी करू नये.
देशातील बहुतांश राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असल्याने गाय-बैलाची कुर्बानी करू नये. याद राखा तुमच्या चुकांचे खापर इस्लामच्या डोक्यावर फोडले जाते आणि इस्लामला बदनाम करण्याची आयती संधी विरोधकांना मिळते. तसेच निरर्थक धार्मिक वाद निर्माण होतात. म्हणून गाय-बैलाची कुर्बानी न करता आर्थिक ऐपत असेल तरच बकऱ्याची कुर्बानी करावी. अन्यथा कुर्बानी करू नये.

कुर्बानी करण्याची आर्थिक ऐपत असेल तरच कुर्बानी करावी.
काही लोकांना पाहिले गेले आहे की ते कर्ज वगैरे काढून कुर्बानी करण्याचा प्रयत्न करताना आढळतात. कुर्बानी करताना कर्जाच्या फंद्यात पडू नये. इस्लामला आपल्या अनुयायांवर असहनीय भार घालणे अभिप्रेत नाही. आपली आर्थिक ऐपत असेल तरच कुर्बानी करावी अन्यथा करू नये. पुढच्या वर्षी आर्थिक ऐपत कुर्बानीयोग्य झाल्यास कुर्बानी केली जाऊ शकते.

कुर्बानीला विनाकारण विरोध करू नये
स्वतःला उगीचच सुधारणावादी दाखविण्याचा नादात कुर्बानीला विरोध करून मुस्लिम प्रतीकांना नष्ट करून नये. एखाद्या प्रसंगी इस्लामी प्रतीकांचे हेतू आपल्या बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे असू शकतात. इस्लाम तुम्हाला कोणतेही सत्कर्म करण्यापासून रोखत नाही, म्हणून तुम्हाला योग्य वाटतील ते सत्कर्म तुम्ही करू शकता. परंतु कोणताही सत्कर्म उपासना पद्धतींचा आणि धार्मिक रीतींचा बदल होऊ शकत नाही.

कुर्बानीचे मांस आपल्या मुस्लिमेत्तर बांधवांना द्यावे
इस्लामी सण समाजाभिमुख आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या आनंदोत्सवात सामील करून घेण्याबद्दल इस्लाम आग्रही आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा ८० टक्के भाग मुस्लिमेत्तर आहे. समाजातील २० टक्के भाग आनंदोत्सव साजरा करीत असताना ८० समाज दुरून उभे राहून केवळ पाहत असतो. यामुळे तो या सणाबाबत उदासीन बनत जातो. आपण रमजान ईदमध्ये तर आपल्या बांधवांना सामील केले आहे. परंतु बकरी ईदपासून ते आजदेखील दूरच आहेत. म्हणून मुस्लिम समुदायासाठी गरजेचे आहे की त्यांनी आपली चूक मान्य करून आपल्या मुस्लिमेत्तर बांधवांना बकरी ईदमध्ये सामील करून घ्यावे. कुर्बानी करून झाल्यानंतर मांसाचे वितरण करीत असताना एक भाग आपल्या मुस्लिमेत्तर मित्रमंडळींना द्यावा. जेणेकरून ते ईदमध्ये सहभागी होतील. कुर्बानीचा उद्देश, त्यामागची भावना आणि पद्धती समजून घेण्याची संधी त्यांना उपलब्ध होईल.

[1] इमाम शौकानी, फिकहुल हदीस, भाग २, पृ. ४७४
[2] बुखारी, सहीह, भाग ४, बाब १, हदीस ५५४५
[3] इमाम तीर्मिजी, सुनन, भाग २, हदीस १५०६
[4] बुखारी यांनी नोंदिविलेल्या एका दीर्घ हदीसच्या आधारावर.
[5] कुरआन, अध्याय ०२, बकरा १८३-१८७ आणि बुखारी, सहीह, खंड ०१, किताबुस सियाम
[6]https://indianexpress.com/article/india/jehovahs-witnesses-sect-after-historic-sc-national-anthem-win-kerala-siblings-emmanuel-went-to-school-for-a-day-4409478/
[7] इमाम शौकानी, फिकहुल हदीस, भाग २, पृ. ४७५
[8] इमाम शौकानी, फिकहूल हदीस, भाग २,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *