प्रकरण १४ – स्त्रीला दिलेला वारसा हक्क

स्त्री हक्कांसाठी लढलेल्या कित्येक समाजसुधारकांनी इस्लामला स्त्रीमुक्तीचा प्रणेता म्हटले आहे. राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतीबा फुले आणि स्वामी विवेकानंदांसारख्या समाजसुधारकांचा यामध्ये समावेश आहे. आज इस्लामवर स्त्रीवर अत्याचार करणारा धर्म, स्त्रीला गुलाम करणारा धर्म, स्त्रीला न्याय आणि समानतेची वागणूक न देणारा धर्म यासारखे आरोप केले जातात. आरोप करणाऱ्यांनी एकदा जगाचा इतिहास अभ्यासावा आणि सत्य काय आहे ते पाहावे अशी आमची विनंती आहे. इतिहासाचे प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे अध्ययन केल्यास त्यांना हे मान्य करावेच लागेल की जगात स्त्री स्वातंत्र्याचा संदेश देणारा पहिला धर्म केवळ इस्लामच होता आणि आजही आहे.

इस्लाम आणि महिलांचे व्यक्तिगत अधिकार:
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. महिला अधिकारांच्या बाबतीत चर्चा करताना प्रामाणिक अभ्यासक निर्विवाद मान्य करतात की विवाह, तलाक आणि वारसाहक्काबद्दल इस्लामचे आदेश क्रांतिकारी आदेश ठरले आहेत. जगात स्त्रीला विवाह, तलाक आणि वारसाहक्काचे अधिकार सर्वप्रथम इस्लामने दिले. इस्लामने जे अधिकार दिले आहेत ते आजदेखील सर्वोत्कृष्ट आहेत. या अधिकारांच्या प्राप्तीसाठी जगातील इतर सभ्यतांना, अगदी युरोपलादेखील कित्येक शतके वाट पहावी लागली आहे. विवाहाप्रसंगी वधु पित्याला देण्यात येणाऱ्या रकमेला इस्लामने स्त्रीला देण्याचा आदेश दिला आणि मेहर तिचा हक्क ठरविला. इस्लामने विवाहाला बंधन म्हणून नाकारले आणि करार म्हणून मान्यता दिली, ज्यामध्ये स्त्रीला समान अधिकार देण्यात आले. महिलांना वारसा हक्क देण्यात आले जे पूर्वी केवळ पुरुषांपुरते मर्यादित होते.

हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक Annemarie Schimmel म्हणतात, “तुलनात्मक दृष्टीने पाहिले असता असे दिसते की इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत.” Schimmel (1992) p.65 उदा. युरोपीय कायद्यानुसार सधन स्त्रीचा विवाह झाल्यास पतीलाही तिच्या संपत्तीत वाटा मिळतो. तर इस्लामी कायद्यानुसार महिलेच्या संपत्तीत पुरुषाला कोणत्याही परिस्थितीत वाटेकरू होता येणार नाही. तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी केवळ पुरुषावर टाकण्यात आलेली आहे, कोणत्याही परिस्थितीत ही जबाबदारी स्त्रीवर टाकता येणार नाही. स्त्री कमाविती आणि सधन असली तरीही! Dr. Badawi, Jamal A. (September 1971), “The Status of Women in Islam”, Al-Ittihad Journal of Islamic Studies

इस्लाम आणि वारसाहक्क:
इस्लामनुसार मुस्लीम व्यक्ती मरताच त्याच्या संपत्तीचे विघटन सुरू होते. त्याच्या संपत्तीत पती-पत्नी, आई-वडील, भाऊ-बहिण, मुलगा-मुलगी इतकेच काय तर वेळप्रसंगी आजी-आजोबा यांना देखील वाटा दिला गेला आहे. जेणेकरून एका व्यक्तीने आयुष्यभर संचय केलेली संपत्ती एका ठिकाणी स्थिर राहू नये, ती समाजातील विविध घटकांत प्रवाहित व्हावी. इस्लामने आजपासून १४०० वर्षांपूर्वी स्त्रियांना वारसाहक्क दिला. जो जगातील कोणत्याच धर्म व्यवस्थेने आणि समाजाने दिला नव्हता. इस्लामनुसार स्त्रीला आपल्या पित्याच्या, आपल्या पतीच्या आणि आपल्या मुलाच्या संपत्तीत वाटा मिळतो. हा वाटा किती असावा? कसा असावा? कोणत्या प्रमाणात असावा याचे ज्ञान मुस्लीम कायदेविषयक पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल.

आर्थिक जबाबदारीतून ती पूर्णपणे मुक्त:
इस्लाम स्त्रीला स्वत:ची संपत्ती बाळगण्याचा हक्क देतो. इस्लाम स्त्रीवर कोणाचीही आर्थिक जबाबदारी टाकत नसल्याने हा हक्क जगातील सर्वोत्तम हक्क सिद्ध होतो. कुटुंबाच्या भरण-पोषणाची जबाबदारी कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाची आहे. तो पुरुष पिता, पती किंवा पुत्र यापैकी कोणीही असू शकतो. इस्लाम स्त्रीवर आर्थिक भार टाकत नाही. यामुळे ती कमविण्यास बाध्य नाही. परंतु जर तिची इच्छा असेल तर ती आपल्या इच्छेप्रमाणे नोकरी करू शकते. नोकरीतून प्राप्त होणारी मिळकत ही सर्वस्वी तिचीच असेल. तिच्या पित्याला, पतीला किंवा पुत्राला कोणत्याही परिस्थितीत या मिळकतीवर अधिकार गाजविता येणार नाही. परंतु तिच्या मृत्युनंतर तिच्या संपत्तीचे विघटनदेखील त्याच नियमाने होईल ज्या नियमाने पुरुषाच्या संपत्तीचे विघटन करण्यात येते. म्हणजेच तिच्या संपत्तीत तिच्या आई-वडिलांना, पतीला, मुला-बाळांना अधिकार असतील.

वारसाहक्क आणि युरोप:
स्त्रियांना वारसाहक्क सर्वप्रथम युरोपने दिला असे आपल्याकडे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु हे वास्तवास अनुसरून नाही. जागतिक इतिहासाचा थोडा जरी अभ्यास असला तर यातील फोलपणा क्षणार्धात उघड होतो. युरोपमध्ये १८ व्या शतकात स्त्रीला विविध हक्क देण्याच्या मागण्या सुरु झाल्या. १९ व्या शतकात वारसाहक्क देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. परंतु या हक्कांच्या संपूर्ण प्राप्तीसाठी तिला २० व्या शतकाच्या पहाटेपर्यंत वाट पहावी लागली. तसेच २० व्या शतकातच तिला संपत्ती बाळगण्याचा अधिकार मिळाला.

भारत आणि वारसाहक्क:
भारतात समाजमान्यतेनुसार स्त्रीला कसलाही वारसाहक्क नव्हता. पैतृक संपत्तीचा वारस केवळ पुत्र होता. हिंदू धर्मात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने संपत्तीच्या वितरणाचा प्रश्नच येत नव्हता. वडिलांच्या मृत्युनंतर संपत्ती मोठ्या मुलाकडे जात असे. भारतीय समाजावर हा इस्लामचा प्रभाव होता की जेव्हा मुस्लिमांच्या संपत्तीचे विघटन होऊन ती सर्वांमध्ये वितरीत होऊ लागली तशी इतर समाजातही संपत्तीच्या वितरणाची मागणी होऊ लागली. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १९५६ मध्ये हिंदू वारसा हक्क कायदा निर्माण करण्यात आला. मागील ६० वर्षात या कायद्यात बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. इतक्या सुधारणा होऊनही हा कायदा मुस्लीम कायद्याची बरोबरी करण्यास असमर्थ ठरलेला आहे. भविष्यात यात कितीही सुधारणा झाल्या तरी याचे अंतिम सुधारित स्वरूप इस्लामी कायदाच असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *