कुर्बानीचे महत्व

प्रकरण ४ थे

कुर्बानीबाबत कुरआनच्या अध्याय हजमध्ये सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले आहे.[1] मानवाच्या आपल्या पालनकर्त्याप्रती असलेल्या भावनांना व्यक्त करण्याच्या धर्माने विहित केलेल्या पद्धती म्हणजे ‘उपासना’. कुर्बानी एक उपासना पद्धती आहे. नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामी उपासना पद्धती आहेत. कुर्बानी हज उपासनेचा एक भाग आहे. हजला जाऊ न शकलेल्या व्यक्तीसाठी कुर्बानीला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. उपासना त्याच प्रकारे करणे गरजेचे आहे ज्या प्रकारे त्या धर्मशास्त्रात विहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये कसलाही बदल केला जाऊ शकत नाही. नमाज अदा करण्याचा उद्देश अल्लाहची जवळीक साधता येणे हा आहे. याचा अर्थ असा नाही कि अल्लाहशी जवळीक साधण्याचा हाच एकमात्र मार्ग आहे. अल्लाहशी जवळीक साधण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. परंतु अल्लाहने नमाजला प्रतीकात्मक स्वरुपात निर्धारित केले आहे. नमाज अदा करून अल्लाहशी जवळीक साधण्याचे इतर मार्गही चोखाळले जाऊ शकतात. परंतु नमाजला इतर कोणत्याही कृत्याशी बदलले जाऊ शकत नाही. याचप्रकारे रोजा आपल्या इच्छा अल्लाहला समर्पित करण्याचा मार्ग आहे. इतरही अनेक मार्गांनी आपल्या इच्छा अल्लाहला समर्पित केल्या जाऊ शकतात. परंतु इच्छा समर्पित करण्यासाठी रोजा ऐवजी एखादा नवीन मार्ग चोखाळला जाऊ शकत नाही. इतर मार्ग चोखाळताना रोजा टाळता येत नाही किंवा त्याला इतर कर्माशी बदलता येत नाही. अगदी असेच जकात, हज आणि कुर्बानीबाबत आहे. कुर्बानी अल्लाहने निर्धारित केलेली उपासना पद्धती आहे, ज्याचा उल्लेख इतर उपासनांप्रमाणेच करण्यात आला आहे.

“तुझ्या पालनकर्त्यासाठी नमाज पढ आणि कुर्बानी कर.” [2]

“सांगून टाका! माझी नमाज, माझी कुर्बानी, माझं जीवन, माझं मरण केवळ जगाच्या पोशिंद्या अल्लाहसाठीच आहे.” [3]

कुरआनच्या वरील संकेतांमध्ये कुर्बानीचा उल्लेख नमाज या सर्वोच्च उपासनेसह करण्यात आला आहे. जगातील प्रत्येक जनसमुदायासाठी अल्लाहतर्फे बलिदानाचे प्रतीक म्हणून कुर्बानीच निर्धारित करण्यात आली होती. ज्याचा उल्लेख कुर’आनमध्ये अशाप्रकारे करण्यात आला आहे. “आम्ही समस्त जनसमुहांसाठी प्रतीकात्मक कुर्बानी निर्धारित केली आहे. आम्ही प्रदान केलेल्या खाण्यायोग्य चतुष्पाद प्राण्यांपैकी कुर्बानी देताना अल्लाहचे स्मरण करावे. आणि (लक्षात ठेवा) तुमचा पूजनीय एकमात्र पूजनीय आहे, तेव्हा तुम्ही त्यालाच समर्पित व्हा. विनम्रतापूर्वक वागणाऱ्यांना शुभवार्ता द्या.” [4]

वरील आयती संदर्भात भाष्य करताना कुरआनचे भाष्यकार शम्स पीरजादा म्हणतात, एका अल्लाहला मान्य करणे आणि स्वतःला त्याच्या समोर पूर्णतः समर्पित करणे आणि स्वतःला अत्यंत विनयशील बनविणे हा कुर्बानीचा मूळ आत्मा आहे. जनावराला जमिनीवर पडण्याचा अर्थ स्वतःला अल्लाहसमोर पाडणे आहे.[5]

कुर्बानी समर्पणभावनेचा परमोच्च बिंदू आहे. प्रतीकात्मक चिन्ह आहे. कुर्बानी एक साक्ष आहे या गोष्टीची कि आम्ही सत्यासाठी आमची स्वतःची कुर्बानी देण्यास संकोच करणार नाही. स्वतःला सर्वाधिक प्रिय असणारी वस्तू सत्यासाठी कुर्बान करणे हा एक सामान्य नियम आहे जो प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला आयुष्यभर लागू आहे. माणसाला आपल्या प्राणाहून प्रिय काय बरे असू शकते? प्रेषित इब्राहीम यांनी आयुष्यभर सत्याच्या प्रचारासाठी आपल्या प्राणाची बाजी पावली. परीक्षा स्वरूप त्यांना आपल्या एकुलत्या मुलाची कुर्बानी करण्याचा आदेश देण्यात आला. स्वतःच्या प्राणाहून प्रिय पोटचा गोळाच असू शकतो. बलिदानाच्या मानसिक तयारीची प्रतीकात्मक ग्वाही म्हणजे कुर्बानी.

कुर्बानी एक प्रतीकात्मक उत्सव आहे. त्यामागे बलिदानाची भावना जागृत करण्याचा उच्च हेतू आणि उद्देश कार्यरत आहे. या प्रतीकांचा आदर केल्याने, त्यांचे अनुकरण केल्याने उद्देशाप्रती असलेली भावना जिवंत राहते. स्वातंत्र्य दिनी सलामी देताना कोण म्हणेल की हा झेंडा तर एक सामान्य कापडाचा एक शिवलेला तुकडा आहे. निःसंशय तो कापडाचा एक तुकडाच आहे परंतु जेव्हा तो तिरंगा बनतो तेव्हा तो देशप्रेमाचं प्रतीक असतो. बलिदानाची एक गाथा त्यामागे असते. तो कोट्यावधी भारतीयांना आपल्या उद्देशाप्रती जागृत करतो. अगदी हेच कुर्बानीच्या बाबतीत आहे. कुरआन याचा उल्लेख करताना म्हणतो,

कुर्बान केल्या जाणाऱ्या उंटांना आम्ही अल्लाहच्या प्रतीकांपैकी निर्धारित केले आहे. त्यामध्ये तुमचं हित आहे. कुर्बानीसाठी त्यांना रांगेत उभं करून अल्लाहचं नाव उच्चारा. ते आपल्या कुशीवर खाली पडल्यानंतर त्यातून तुम्हीही खा; मागणाऱ्यांना आणि गरजवंतांनाही द्या. अशा प्रकारे आम्ही प्राण्यांना तुमच्या अधीन केले जेणेकरून तुम्ही कृतज्ञ असावं.” [6]

कुर्बानी जशी धर्मशास्त्रात विहित आहे तशीच केली जाईल. पैसे दान करून किंवा रक्तदान करून कुर्बानी केली जाऊ शकत नाही. कुर्बानीची उपासना रक्तदान केल्याने होत असेल तर मग नमाज अदा करायची गरज तरी काय? दिवसभर उपाशी राहून रोजा तरी कशासाठी धरायचा? त्यांचाही बदल शोधला जाऊ शकतो ना? आणि जेव्हा ते बदल शोधले जातील तेव्हा त्या बदलेल्या उपासना पद्धती इस्लामी उपासना पद्धती असणार नाहीत. त्या उपासना पद्धतींचा प्रेषित, प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांच्या ऐवजी दुसराच कोणीतरी असेल. कारण प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांनी दिलेली उपासना पद्धती तर तीच आहे जिचा उल्लेख वरील परिच्छेदात केला गेला आहे.

तसेच या उपासनांच्या बाबतीत अतिरेकही होता कामा नये. काळाच्या प्रवाहात वाहताना समुह आपले उद्देश हरवून बसतात आणि प्रतीकांनाच उद्देश समजण्याची चूक करतात. म्हणून या बाबतीत अतिरेक होऊ नये म्हणून कुरआन दक्षता घेतो. राष्ट्रध्वज देशप्रेमाचं प्रतिक निर्विवाद आहे परंतु देशप्रेमाचा पुरावा कधीच नाही. ध्वजाच्या लांबीवरून कोणाचे देशप्रेम मोजता येत नाही. अगदी तसेच कुर्बानीवरून कोणाची धर्म निष्ठा मोजता येत नाही. कुर्बानी धर्म निष्ठेचा पुरावा कधीच असू शकत नाही. कुर्बानीच्या बाबतीत मुस्लिम समुदायाने अतिरेक करू नये म्हणून कुरआन बजावून सांगतो,

(पण हे लक्षात असू द्या) अल्लाहपर्यंत त्यांचे मांस पोहोचते ना त्यांचे रक्त; पोहोचते मात्र तुमची निष्ठा.” [7]

कुर्बानीचे मांस किंवा रक्त अल्लाहपर्यंत अजिबात पोहोचत नाही. अल्लाहला केवळ तुमची निष्ठेची परीक्षा घेणे अभिप्रेत आहे. कुर्बानी परीक्षा आहे, पुरावा नाही. परंतु वरील भाष्य चार अनिवार्य उपासना नमाज, रोजा, जकात आणि हज यांच्याबाबतीत लागू होणार नाही. [8] कुरआनच्या वरील वचनांचा चुकीचा अर्थ लावून कोणी कुर्बानीच्या प्रतीकाला नष्ट करू नये, अल्लाहला पशूची कुर्बानी अभिप्रेत नाही, अल्लाहला तर केवळ समर्पण भाव अपेक्षित आहे; असे कोणी म्हणू नये म्हणून कुरआन बजावून सांगतो की,

जो अल्लाहच्या प्रतीकांचा आदर करतो, त्याद्वारे तो (अल्लाहप्रति) असलेला त्याच्या मनातील भाव व्यक्त करतो.” [9]

वरील आयती संदर्भात भाष्य करताना कुरआनचे भाष्यकार शम्स पीरजादा म्हणतात, प्रतीकं केवळ आदरास पात्र अशा परंपरा नाहीत तर त्यांचा संबंध ईशपरायणता आणि धर्मपरायणतेशी आहे. या प्रतीकांमुळे अल्लाहच्या महानतेची धारणा मनात उत्पन्न होते आणि ही धारणा ईशपरायणता आणि धर्मपरायणता निर्माण करते.[10] जाणीवपूर्वक या प्रतीकांना नाकारणाऱ्याबद्दल किंवा यांचा आदर न करणाऱ्याबद्दल भाष्य करताना मौलाना मौदुदी म्हणतात, एकतर तो अल्लाहच्या अस्तित्वालाच मान्य करीत नाही किंवा त्याने अल्लाहच्या विरोधातच उघड बंड थोपटले आहे.[11] प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) यांनी कुर्बानीचे गांभीर्य स्पष्ट करताना उपदेश केला, “जो सामर्थ्य असूनही उद्देशपूर्वक कुर्बानी करीत नाही त्याने आमच्या ईदगाहपासून दूर राहावे.”[12]

म्हणजे प्रतीकांना उद्देश समजून अतिरेक करू नका आणि प्रतीकं केवळ प्रतीकं आहेत म्हणून त्यांना कमीही लेखू नका. प्रतीकांचे संरक्षण आणि संवर्धन झाले पाहिजे. ते तुमच्या सामाजिक अस्तित्वाचा आधार आहेत. ते संपले तर तुमचे सामाजिक अस्तित्व संपुष्टात येईल. आणि हे कदापि विसरू नका,

जे अल्लाहशी एकनिष्ठ आहेत अल्लाह त्यांचं संरक्षण करतो. कृतघ्न आणि बंडखोर अल्लाहला आवडत नाहीत.” [13]

यानंतर आपण कुर्बानीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांची उत्तरे काय आहेत हे पाहूयात.

[1] ज्याचा उल्लेख याच प्रकरणात पुढे सविस्तर येणार आहे.
[2] कुर’आन, अध्याय १०८, कौसर, संकेत २
[3] कुर’आन, अध्याय ६, अन’आम, संकेत १६२
[4] कुर’आन, अध्याय २२, हज, संकेत ३४
[5] शम्स पीरजादा, दावतुल कुरआन, भाग २, पृ. ११३३
[6] कुर’आन, अध्याय २२, हज, संकेत ३६
[7] कुर’आन, अध्याय २२, हज, संकेत ३७
[8] याबाबतीत येथे चर्चा करणे अप्रस्तुत ठरेल आणि विषय भरकटेल, म्हणून सविस्तर चर्चा टाळली आहे. याबाबतीत अधिक माहिती माझ्या ‘इस्लामचे आधारस्तंभ’ या पुस्तकात भेटेल.
[9] कुर’आन, अध्याय २२, हज, संकेत ३२
[10] शम्स पीरजादा, दावतुल कुरआन, भाग २, पृ. ११३३
[11] मौलाना मौदुदी, तफहीम उल कुरआन, भाग ३, पृ. २२४
[12] अलबानी, सहीह अल जामेअ, हदीस ६४९०
[13] कुर’आन, अध्याय २२, हज, संकेत ३८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *