सणांचे समाज जीवनातील स्थान

प्रकरण १ ले

सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाली तेव्हापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीच कोणताच सण साजरा न करणारा एकही समुदाय जगात नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने, एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे या सर्व गोष्टींतून समाजाचे संघटीकरण घडते. एकमेकांपासून दूर राहणारे लोक जवळ येतात. परस्पर संबंध दृढ करण्याची संधी यामुळे उपलब्ध होते. सणांना दरवर्षी एका निश्चित तारखेला साजरे केल्याजाण्यामागे हाच उद्देश कार्यरत असतो. जेणेकरून वारंवारच्या आयोजनाने समाज मनावर काही विशिष्ठ उद्देश आणि भावना बिंबविता याव्यात.

समाजाला सण-उत्सवांची नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज संघटीत राहू शकत नाही. विखुरला जातो. म्हणूनच आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात सण-उत्सवांच्या प्रती सामाजिक ओढ आणखीन तीव्र झाली आहे. नवनवीन सण-उत्सव निर्माण केले जात आहेत, आयात केले जात आहेत, साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांचे वार्षिक समारंभ असोत की व्यावसायिक फर्मचा वर्षपूर्ती सोहळा असो, Whatsapp ग्रुपचा वाढदिवस असो की आणखीन काही असो! हे सारे काही त्याच मुलभूत मानवी स्वभावाचे प्रतिनिधित्व करतात, जो स्वभाव मागणी करतो की आम्हाला संघटीत राहण्यासाठी एका ‘सोहळ्याची’ गरज आहे. जेथे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातील ताण-तणाव विसरून समान भावनेने, समान उद्देशाने, समान पद्धतीने एकत्र यावे; जेणेकरून एकमेकांशी जोडले जावे.

जगातील सणांचा बारकाईने अभ्यास केल्यास हे दिसून येते की याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. काही सणांमागे एखाद्या घटनेची पार्श्वभूमी असते तर काहींच्या मागे एखादी व्यक्ती उभी असते. उदा. दिवाळीमागे रामाच्या विजयी मोहिमेच्या आगमनाची पार्श्वभूमी आहे. तर २५ डिसेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमसमागे येशुंच्या जन्मदिनाची पार्श्वभूमी आहे. सणांचे प्रकार असतात तसे त्यांना साजरे करण्याचेही प्रकार असतात. काही सण निव्वळ आनंदोत्सव असतात तर काही सण स्मरणोत्सव असतात, ज्यात इतिहासातील त्याग आणि बलिदानांचे स्मरण केले जाते. सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून त्या सणांचा उद्देश आणि त्याद्वारे निर्माण केली जाणारी भावना यांचा अंदाज घेता येतो. पद्धती आणि भावना जितकी उच्च असेल तितका त्याचा उद्देश उच्च असतो.

उदाहरणादाखल आपण आपल्या राष्ट्रीय सणांबाबत बोलूयात. येथे धार्मिक सणांबद्दल चर्चा करता येऊ शकते परंतु मी जाणीवपूर्वक राष्ट्रीय सणांचा उल्लेख करीत आहे. कारण आपल्या उदात्त हेतू आणि उद्देशामुळे हे सण अतुलनीय ठरतात. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन दिवस भारताच्या अभिमानी नागरिकांसाठी केवळ राष्ट्रीय सण नाहीत तर एक नवचेतना, नवप्रेरणा देणारे स्त्रोत आहेत. या दोन सणांच्या आयोजनावर सरकार कोट्यावधी रुपये खर्च करते. हे सण १२५ कोटी भारतीयांमध्ये एक नवचेतना निर्माण करतात, स्फूर्ती निर्माण करतात. विविध साधनांचा वापर करून देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविले जाते. देशासाठी त्याग आणि बलिदान केलेल्यांचा आणि त्यांच्या कार्याचा या दिवशी गौरव केला जातो. ज्याच्या परिणाम स्वरुपात शेकडो नव्हे हजारो नागरिक “आम्हाला देशासाठी काही करायचे आहे, आम्हाला समाजासाठी जगायचे आहे” असा संकल्प करतात. यामुळे अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळते. १२५ कोटी नागरिकांमध्ये ‘आम्ही भारतीय आहोत’ ही जाणीव निर्माण होते. ते आपल्या साऱ्या वेदना, दु:ख, हाल-अपेष्टा विसरून जातात. एकमेकांशी सहकार्याने वागायला हवे, प्रेमाने वागायला हवे; याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. यावेळेस चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. लहानग्यांना देशप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. १२५ कोटींना आपण ‘भारतीय’ असल्याची जाणीव होऊन त्यांनी ‘भारतीय’ या नात्याने जगावे, हा उद्देश या सणांच्या आयोजनामागे कार्यरत असतो.[1]

जगभरातील सण-उत्सव अशाच उद्देशाने साजरे केले जातात. त्यांच्यामागे असाच हेतू कार्यरत असतो. काही ठिकाणी हा हेतू प्रादेशिक, सांस्कृतिक, जाती-जमातीच्या किंवा वंशाच्या अस्मितेशी जुळलेला असतो, तर काही ठिकाणी व्यापक असतो. मर्यादित उद्देश असणारे सण-उत्सव प्रादेशिक सण-उत्सव म्हणून मर्यादित राहतात. ते कधीही व्यापक रूप धारण करू शकत नाहीत. एका प्रदेशात साजरे केले जाणारे उत्सव दुसऱ्या प्रदेशात साजरे केले जात नाहीत. धर्म एक असूनही प्रांत बदलले तर उत्सव बदलतात. इतकेच काय तर एक उत्सव एकाच भागातील काही लोकांसाठी आनंदोत्सव असतो; कारण तो त्यांच्या विजयाचा उत्सव असतो. तर काही लोकांसाठी अपमानजनक असतो; कारण तो त्यांच्या पराभवाचा दिवस असतो. भारतीय उपखंडातील सणांकडे पाहिल्यास अशाप्रकारची अनेक उदाहरणे दिसून येतील.

अखिल मानवजातीला संघटीत करण्यासाठी अखिल मानवजातीचा व्यापक सण-उत्सव असणे गरजेचे आहे. ज्याद्वारे मानवजातीला संघटीत केले जाऊ शकते. अशा सण-उत्सावांच्या मागे प्रादेशिक, प्रांतीय, जातीय, वंशीय अस्मिता नव्हे तर मानवजातीला एकत्र करू शकणारा प्रेरक असणे गरजेचे आहे. अशा उत्सवाची पार्श्वभूमी एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती तर असावी परंतु ती जात, वर्ण, वंश यांच्या बंधनातून मुक्त असावी. ती घटना किंवा व्यक्ती मान्य करण्यासाठी कोणत्याही भूभागात कोणत्याही समूहाला कसलाही अडथळा निर्माण होऊ नये. जर अशी एखादी घटना किंवा अशी एखादी व्यक्ती असेल तर तिच्याशी संबंधित सण-उत्सव संपूर्ण जगाचा सोहळा बनू शकतो. ज्याच्या माध्यमातून जगभरातील लोकांना संघटीत केले जाऊ शकते. एकत्र केले जाऊ शकते.

वरील निकषांना ध्यानात ठेऊन जेव्हा आपण इस्लामी सणांकडे पाहतो तेव्हा असे दिसते कि इस्लामने जगाला दिलेले दोन्ही सण याच प्रकारात मोडतात. ते अखिल मानवजातीचे वैश्विक सण सिद्ध होऊ शकतात. इस्लामी सणांच्या मागे कोणतीही जातीय, प्रादेशिक, प्रांतीय, वर्णीय, वंशीय अस्मिता नव्हे तर एक उदात्त विचारसरणी, एक उच्च हेतू कार्यरत असतो. म्हणूनच जगभरात जेथे कोठे इस्लामचे आगमन झाले तेथील जनतेने इस्लामी सणांना आपले सण म्हणून सहजतेने स्वीकारले. त्यांचा प्रदेश, त्यांचा वर्ण, त्यांचा वंश कोणताही असो; ते इस्लामी सणांसाठी अडथळा ठरले नाहीत. अरब असोत की युरोपीय असोत, भारतीय असोत की मंगोल असोत, तुर्क असोत की इजिप्ती असोत, मलाई असोत की आफ्रिकी असोत साऱ्यांनाच या सणांनी एकाच धाग्याने बांधण्याचे काम केले. एकत्रित केले, संघटीत केले. एकच समान भावना, समान उद्देश सर्वांना देण्याचे काम केले.

आज कुर्बानीवर घेतले जाणारे आक्षेप अतिशय व्यापक अर्थाने असून कुर्बानीच्या मूळ उद्देशावर आघात करणारे आहेत. मुस्लिम समाजाने या आक्षेपांना सहजतेने घेऊ नये.

[1] देशातील कायदे, नागरिकांचे अधिकार आणि अल्पसंख्यांक समुदायाचे हक्क या गोष्टींवर राष्ट्रप्रेमाची जाणीव तयार होते, हा राज्यशास्त्राचा सिद्धांत येथे लागू होत नाही. कारण देशाची बहुसंख्य जनता या बाबींशी परिचित नसते. त्यांच्यासाठी तर काही ठराविक प्रतिकंच देशप्रेमाची भावना आणि जाणीव निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. राष्ट्रगीत, प्रार्थना, राष्ट्रीय सण किंवा राष्ट्रध्वज सारखी प्रतिकं सर्वसामान्यांसाठी जास्त महत्वाची असतात. उदा. सेनेत भरती होणाऱ्या अनेकांचे म्हणणे असते कि त्यांची बालपणापासूनच देशाची सेवा करण्याची इच्छा होती. अर्थातच ही बालपणातील इच्छा देशातील कायदे, नागरिकांचे अधिकार आणि अल्पसंख्यांक समुदायाचे हक्क यामुळे निर्माण होत नाही. तसेच देशाहितासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या अनेकांना प्रोत्साहित करणारी प्रेरक ही प्रतिकंच असतात. म्हणून ही प्रतिकंच सर्वसामान्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करतात आणि त्यास बळकटीही देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *