इस्लामी सणांचे स्वरूप

प्रकरण २ रे

संघटीकरणाच्या उद्देशाने जगभरात विविध ठिकाणी विविध सण साजरे केले जातात. काही सण सांस्कृतिक असतात, काही राष्ट्रीय असतात तर काही धार्मिक असतात. इस्लामने मुस्लिमांसाठी केवळ दोनच धार्मिक सण निर्धारित केले आहेत. ‘ईद उल फित्र’ आणि ‘ईद उल अझहा’. भारतीय उपखंडात ईद-उल-फित्र ‘रमजान ईद’ तर ईद-उल-अझहा ‘बकरी ईद’ या नावाने ओळखली जाते. या व्यतिरिक्त कोणताच सण मुस्लिमांचा धार्मिक सण नाही. इतर सण इस्लामी मुलतत्वांच्या विरोधी नसतील तर सांस्कृतिक किंवा प्रादेशिक सण म्हणून साजरे केले जाऊ शकतात आणि साजरे केले जातातदेखील.

ईदम्हणजे आनंदोत्सव:
‘ईद’ शब्दाचा पारिभाषिक अर्थ ‘आनंदाचा क्षण’ असा आहे. मूळ शब्द ‘औदा’ पासून ईद बनतो. औदा म्हणजे वारंवार येणे, फिरून येणे. ईद दरवर्षी साजरा केली जाते, दरवर्षी ती फिरून येते म्हणून तिला ईद म्हणतात. इस्लामने मुस्लिम समुदायासाठी वर्षातून केवळ २ धार्मिक सण निर्धारित केले आहे. हे सण मुस्लिम समुदायासाठी वैश्विक सण आहेत. इस्लामी दृष्टीकोन प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला या सणांत सामील करून घेण्यासाठी आग्रही आहे. आपण पाहू शकतो की दोन्ही सण १०० टक्के समाजाभिमुख आहेत. ईद-उल-फित्रच्या वेळी प्रत्येक मुस्लिम व्यक्तीवर नमाजपूर्वी फित्रा (अन्नधान्य दान) अदा करणे अनिवार्य आहे, तर ईद-उल-अझहाच्या वेळी बलिदानाच्या भावनेने कुर्बान केलेल्या पशूचे मांस दान करणे प्रोत्साहित कर्म आहे.

ईदचे स्वरूप:
‘ईद उल फित्र’ चांद्र कालगणनेनुसार १० महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. ९ वा महिना रमजान. रमजानचे महिनाभराचे उपवास ठेऊन १० वा महिना शव्वालच्या पहिल्या दिवशी अल्लाहप्रती कृतज्ञतेच्या भावनेने रमजान ईद साजरा केली जाते. या दिवशी मुस्लिम लोक नवीन कपडे परिधान करतात, ईदगाह[1] मैदानावर जाऊन सकाळची नमाज अदा करतात आणि आपल्या नातेवाईकांच्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेतात. एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात. गोड पदार्थ बनवून खातात आणि पाहुण्यांना, मित्रांना आमंत्रित करून खाऊ घालतात.

‘ईद उल अझहा’ चांद्र कालगणनेनुसार १२ व्या महिन्याच्या १० व्या दिवशी साजरी केली जाते. १२ वा महिना जिलहिज्जा. हा हज यात्रेचा महिना. आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या मुस्लिम व्यक्तीवर आयुष्यात एकवेळेस हज करणे अनिवार्य आहे. अनिवार्य हज अदा करण्यासाठी दरवर्षी लाखो मुस्लिम मक्केला जातात. कुर्बानी करणे हा हजचा एक भाग आहे. हाजी[2] लोक १० तारखेला कुर्बानी करतात. तेव्हा जगभरातील मुस्लिम लोकदेखील कुर्बानी करतात. हीच ईद उल अझहा.

‘ईद उल अझहा’च्या कुर्बानीसाठी जनावर खरेदी केले जाते. वाढत्या शहरीकरणामुळे जागेची समस्या निर्माण झाली आहे. जनावर घरी आणता येत नाही म्हणून ते सवलतीनुसार मदरसा, मैदान किंवा कसाबाकडे ठेवले जाते. ‘ईद’च्या दिवशी जगभरातील मुस्लिम नवे कपडे परिधान करून ईदगाहला जातात, नमाज अदा करतात. नमाज नंतर कुर्बानीगाह[3] ला जाऊन आपला प्राणी कुर्बान करतात. कुर्बान केलेल्या प्राणाच्या मांसाचे तीन समान भाग करून एक भाग घरी आणला जातो. दुसरा भाग नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना भेट म्हणून दिला जातो. तर तिसरा भाग समाजातील उपेक्षितांना, वंचितांना ईदची भेट म्हणून दिला जातो.

बकरी ईद नामकरण?
‘ईद उल अझहा’चे नामकरण बकरी ईद कसे झाले, याबाबतीत दोन मतप्रवाह आहेत. पहिला असा कि बकरी ईद हा बकर ईदचा अपभ्रंश असावा. बकर म्हणजे गाय. पूर्वी भारतीय उपखंडात गायींची कुर्बानी केली जायची म्हणून बकर ईद असा शब्द प्रयोग प्रचलित झाला. त्याचेच पुढे बकरी ईद असे अपभ्रंश झाले. दुसरे मत असे आहे कि बहादूर शहा जफर या मुगल बादशाहने गाय कापण्यास बंदी घातली[4] म्हणून भारतात प्रामुख्याने बकऱ्याची कुर्बानी करण्याची प्रथा पडली. आपल्या हिंदू बांधवांचे मन दुखावले जाऊ नये म्हणून मुस्लीम समाजाने ‘बकरी ईद’ हा शब्दप्रयोग सुरु केला. कालांतराने भारतीय उपखंडामध्ये या उत्सवाचे नाव ‘बकरी ईद’ असेच प्रचलित झाले. ब्रिटिशांनी कत्तलखाने सुरु केले तेव्हा गाय-बैल पुन्हा कापले जाऊ लागले. आज गाय-बैलवर बंदी आल्याने मुस्लिम समाज कुर्बानीसाठी पुन्हा बकऱ्याकडे वळाला आहे.

इस्लामी अर्थातच मुस्लिमांच्या धार्मिक सणांची तोंडओळख झाल्यानंतर आता आपण कुर्बानीची चर्चा करूयात. कुर्बानीची सुरुवात कशी झाली? का झाली? कोणत्या परिस्थितीत झाली? कुर्बानीचा उद्देश काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पुढील प्रकरणांत पाहणार आहोत.

[1] ईदची नमाज मस्जिदमध्ये अदा न करता मैदानात अदा करायची असते. त्या मैदानास ईदगाह असे म्हणतात. आज वाढत्या शहरीकरणाच्या समस्येमुळे ईदची नमाज नाईलाजास्तव मस्जिदमध्येच अदा केली जाते. एखादे खेळाचे मैदान, शासकीय जमीन केवळ नमाजसाठी भाड्याने घेऊन नमाज अदा केली जाऊ शकते. ज्यामुळे मूळ धर्मपरंपरेचे देखील पालन होऊ शकते.
[2] हज करणाऱ्या व्यक्तीला हाजी म्हंटले जाते. हाजी ही काही पदवी किंवा मान-सन्मान वाढविणारे पद नाही.
[3] जेथे जनावर कुर्बान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली असते त्या स्थळाला कुर्बानगाह म्हणतात.
[4] https://www.quora.com/When-did-the-Mughals-prohibit-cow-slaughter-in-the-empire

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *