प्रकरण ९ – काल्पनिक कथा

जमातवादी इतिहासकारांनी शिवाजी राजांच्या विश्वासू मुस्लिम सैनिकांचे पुरावे नष्ट केले परंतु चलाखी करून काही खोट्या घटना शिवचरित्रात घुसडल्या. वास्तववादी इतिहासलेखन करताना कधीकधी काही रंजक कथांचा आधार घेतला जातो. काही काल्पनिक कथाही त्यात सामील केल्या जातात. जातीय किंवा धार्मिक अभिनिवेश त्यामागे कार्यरत असतो. शिवचरित्राचे लेखन करताना काही आधुनिक इतिहासकारांनी रंजक लेखनासाठी काल्पनिक कथांचा आधार घेतल्याचे आढळते. याद्वारे ते आपला अभिनिवेश जपत असतात. आपण दोन काल्पनिक कथांबद्दल येथे चर्चा करूयात.

कल्याणच्या सुभेदाराची सुन:
कल्याणच्या सुभेदाराकडचे ७०० पठाण सुभेदाराची चाकरी सोडून शिवाजी राजांकडे आले. त्यांच्या येण्यासाठी एक काल्पनिक घटना कारणीभूत ठरविली जाते. ती घटना अशी.

आबाजी सोनदेवने कल्याण काबीज केले. कल्याणचा सुभेदार सर्व खजिन्यासह विजापुरला पळून गेला. जाताना मात्र आपले कुटुंब मागे सोडून गेला. कारण त्याला माहित होते की शिवाजी राजा कुटुंबावर हात घालणार नाही. आबाजीने कल्याणच्या सुभेदाराची सुन पाहिली. तिचे सौंदर्य पाहून आबाजी मोहित झाला. असली सुंदर स्त्री महाराजांना नजर करायला हवी असे त्याला वाटले. म्हणून तो या सुनेला घेऊन महाराजांकडे हाजीर झाला. महाराजांनी सुनेचे सौदर्य पाहून उदगार काढले, ‘आमच्या आईसाहेबही तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर!’ काहींचा अपवाद जवळपास सर्वच आधुनिक इतिहासकारांनी या घटनेला शिवचरित्रात नोंदविले आहे. सर्वसामान्य जनतेत देखील ही कथा मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. परंतु या कथेमुळे शिवचरित्राला जो धक्का पोहोचतो, तिथपर्यंत कोणाची नजर गेल्याचे दिसत नाही.

पाहिली गोष्ट तर अशी आहे की ही घटना काल्पनिक असून याच्या समर्थनार्थ एकही पुरावा भेटत नाही. कल्याणच्या सुभेदाराला मुलगाच नव्हता तर त्याला सुन आली कोठून? आणि समजा सुन असली तरी सुभेदार कुटुंबाला सोडून पळेल का? आणि समजा पळाला तरी मग महाराजांच्या नैतिक बैठकीचे काय? शिवाजी राजे हे चारित्र्य संपन्न राजे होते हे शत्रूने देखील मान्य केले आहे. शिवाजी राजांचे शत्रू जेव्हा त्यांच्या चारित्र्याची ग्वाही देतात तेव्हा मावळ्यांनाच शिवाजी राजांचे चरित्र कळले नाही असे समजायचे का? युद्धप्रसंगी परस्त्रीला हात लावता कामा नये हा आदेश दिला होता ना महाराजांनी? स्त्रियांशी गैर जबाबदार वर्तन करण्यांना महाराजांनी जी शिक्षा सुनावली ती आपण मागे पहिलीच आहे. मग महाराजांनी दिलेला स्त्रीविषयक आदेश मावळ्यांनी धुडकावून लावला, राजाज्ञा मोडून काढली असे मानायचे काय? जर या कृत्याला आबाजी सोनदेवचे वयैक्तिक कृत्य म्हणत असाल तर त्याची अशी हिम्मत तरी झाली कशी की त्याने महाराजांना एक स्त्री नजराणा म्हणून पेश करण्याचे धाडस करावे?

चला गृहीत धरू की आबाजी सोनदेवाची घटना वास्तविक आहे नि ती इतिहासात घडली होती. कल्याणचा सुभेदार आपल्या नसलेल्या मुलाच्या बायकोला, आपल्या सुनेला मागे ठेऊन पळाला होता. आबाजी सोनदेवने तिला पाहिले. तिच्यावर मोहित होऊन तो तिला राजांना नजर करण्यास हजरही झाला. आता एक मुद्दा अजूनही अनुत्तरीत राहतो. तो म्हणजे राजांनी दिलेल्या प्रतिक्रियेचा! असे म्हंटले जाते की राजांनी सुनेचे सौदर्य पाहून उदगार काढले, ‘आमच्या आईसाहेबही तुमच्या इतक्या सुंदर असत्या तर!’ यावर भाष्य करताना श्रीमंत कोकाटे म्हणतात, कोणताही विवेकी पुत्र स्वतःच्या आईच्या सौदर्याची तुलना इतर स्त्रीशी करणार नाही. स्वतःची आई कुरूप असो अथवा सुंदर असो प्रत्येकाला स्वतःच्या आईबद्दल नितांत आदर असतो.[1] श्रीमंत कोकाटंचा आक्षेप तर्कशुद्ध आहे. असे कसे शक्य आहे की शिवाजी राजांनी आपल्या जन्मदात्या आईबद्दल अशी अविवेकी प्रतिक्रिया एका सामान्य मुस्लिम स्त्रीला पाहून दिली असेल? एक सामान्य मुस्लिम स्त्री शिवाजी राजांना इतकी मोहित करून गेली की त्यांना आपल्या आईच्या सौंदर्यावर खिन्न होऊन बोलावे लागले?

शिवाजी राजे अजिबात असे म्हणू शकत नाहीत. वरील घटना केवळ शिवाजी राजांच्याच नव्हे तर आई जिजाऊच्यादेखील बदनामीसाठी कोणीतरी अत्यंत धूर्तपणे शिवचरित्रात सामील केली आहे.

झीनतुन्निसा:
शिवचरित्रात आधुनिक इतिहासकारांनी घुसडलेली दुसरी काल्पनिक कथा म्हणजे औरंगजेब पुत्री झीनतुन्निसाची कथा! औरंगजेबाने संभाजी राजांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली, तेव्हा संभाजी राजांनी तुझी मुलगी मला दिलीस तर इस्लाम स्वीकारतो असे उत्तर दिले, याचे वर्णन बरेच तिखटमीठ लाऊन केले जाते. इतिहासाचे गाढे अभ्यासक वा. सी. बेंद्रे यांनी सर्वप्रथम या मुद्याचे ऐतिहासिक पुराव्यानिशी खंडन केले आहे. मराठी बखरीतील मजकुराबाबत बेंद्रे लिहितात, “मराठी बखरकारांनी संभाजीच्या मृत्यूबद्दलची माहीती दिली नाही. तो कोठे झाला याचाही त्यांना पत्ता नाही. तेथे त्यांनी निर्माण केलेल्या संवादांना कसली किंमत द्यायची?” औरंगजेबाच्या मुलीशी लग्न करण्याच्या संभाजीराजांच्या कथित म्हणण्याविषयी ते लिहितात, “औरंगजेबास एकंदर पाच मुली होत्या, त्यापैकी तिसरी बदरुन्निसा ९ एप्रिल १६७० रोजी वारली. चौथी झेबतुन्निसा व पाचवी मेहरुन्निसा यांची लग्ने झाली होती. पाहिली जैबुन्निसा ही १६३८ मध्ये जन्मली आणि १७०२ मध्ये मेली. ती अकबराच्या प्रकरणात गोवल्याने तिला दक्षिणेस यावयास मिळालेच नाही. राहता राहिली दुसरी मुलगी झीनतुन्निसा हिचा जन्म ५ अक्टोबर १६४३ चा. संभाजीस मारले त्यावेळी ही ४६ वर्षाची म्हणजे संभाजीपेक्षा १३-१४ वर्षांनी मोठी. लग्नासंबंधीचे तिचे वय उलटून गेले होते. इतकेच नव्हे तर तिच्या धाकट्या तीन बहिणींची लग्ने झाली तरी तिने लग्न न करण्याचा निग्रह पाळला होता.”[2] यावरून झीनतुन्निसाचा संभाजी महाराजांशी जोडला जाणारा संबंध पूर्णतः निराधार आणि खोटारडा असल्याचे सिद्ध होते. तसेच झीनतुन्निसाचा शिवाजी राजांशी जोडला जाणारा संबंधही पूर्णपणे खोटा आणि निराधार आहे.

[1] श्रीमंत कोकाटे, शिवरायांचे खरे शत्रू कोण, पृ. ९३
[2] चंद्रशेखर शिखरे, प्रतिइतिहास, पृ.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *