प्रकरण १२ – हुंडा नव्हे मेहर

हुंडा भारतीय समाजातील मान्यताप्राप्त प्रथा आहे, याचे कारण हुंड्याला धार्मिक आधार लाभलेला आहे. रामायण महाभारतात देवी देवतांच्या विवाह प्रसंगी भरमसाठ हुंडा दिल्याच्या नोंदी धर्म ग्रंथात आढळतात. राम आणि सीता यांच्या विवाह प्रसंगी रामाला देण्यात आलेला हुंडा, तसेच महाभारतात उल्लेखित हुंड्याचा प्रभाव समाजातील उच्च वर्गावर मोठ्या प्रमाणात असल्याने हुंडाप्रथा एक धार्मिक अनुष्ठान म्हणून मान्यताप्राप्त प्रथा आहे. तसेच आम्ही किती हुंडा घेतला किंवा दिला याच्या बाता आजही आत्मप्रौढीने सांगितल्या जातात.

हुंड्यासाठी लग्न:
हुंडा म्हणजे लग्नासाठीची अट अशी समजूत झाल्याने कित्येक लग्न केवळ हुंड्यासाठीच होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पंजाब राज्यात मागील दोन दशकांपासून परदेशी जाण्याची एक ओढ तरुणांमध्ये आहे. परदेश जाण्यासाठी लागणारा खर्च पेलण्याची लायकी नसलेल्या युवकांकडे विवाहाची नामी संधी हाती असते. ते केवळ हुंड्यासाठी लग्न करतात आणि पत्नीला वाऱ्यावर सोडून परदेशात जाऊन स्थायिक होतात. अशा एक नव्हे तर हजारो घटना समोर आल्या आहेत.

पंजाबचे माजी केंद्रीय मंत्री, बलवंत सिंग अहलुवालिया यांच्यानुसार २००१-२०११ दरम्यान एकट्या पंजाब राज्यामध्ये अशा प्रकारच्या ३० हजार घटना घडल्या आहेत. म्हणजेच वर्षाला ३ हजार घटना याप्रमाणे रोज दहा घटना पंजाबमध्ये घडल्या आहेत. जेथे विवाह केवळ हुंडा प्राप्तीसाठी केला गेला आणि विवाहानंतर पत्नीला आपल्या घरी सोडून पतीदेव जे उडाले ते कायमचेच.

हुंड्यासाठी छळ:
NCRB च्या रिपोर्टनुसार भारतात १९९८ मध्ये ७१४६ हुंडाबळीच्या घटना घडल्या. हे प्रमाण वाढून २००८ मध्ये ८१७२ झाले. तर केवळ २०११ मध्ये ८३३१ महिलांचा बळी हुंड्यासाठी घेतला गेला. देशात दर तासाला एका विवाहितेची हुंड्यासाठी हत्या केली जाते, हे वास्तव आता शासकीय स्तरावर मान्य करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाच्या रेणुका चौधरी म्हणतात, “भारतात ७० टक्के महिला कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी ठरतात”. BBC नुसार भारतात २०१३ मध्ये महिलांविरोधी ३,०९,५४६ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी १,१८,८६६ गुन्हे कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित होते. NFHS नुसार कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असणाऱ्या ८५ टक्के महिला कधी आपल्यावर होणाऱ्या अन्यायविरोधात तोंडच उघडत नाहीत. एकूण गुन्हाच्या केवळ १ टक्के गुन्ह्यांचीच नोंद पोलीस दफ्तरी होते. देशात दरवर्षी हजारो महिला या हिंसाचाराला बळी ठरून मृत्यूला कवटाळतात. या मृत्यूंना सरकार दप्तरी ‘हुंडाबळी’च्या रकाण्यात टाकले जाते. २०१२ मध्ये राष्ट्रभरात हुंडाबळीचे १८,२३३ गुन्हे नोंदविले गेले आहेत.

हुंड्यासाठी कर्ज:
ग्रामीण भागात बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या एकूण कर्जांपैकी ८० टक्के कर्ज लग्नासाठी घेतले जाते. तसेच हुंड्यासाठी एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेतले असल्यास काही वर्षात त्याने आत्महत्याच करावी असे जणू समीकरणच बनले आहे. यामुळे मुलींकडे पळून जाऊन लग्न करण्याशिवाय कसलाच पर्याय उरलेला नाही. तसेच कित्येक मुली योग्य वेळी लग्न न झाल्याने वाममार्गाला लागल्याचे निदर्शनास येत आहे.

महाराष्ट्रात मराठा समाजात हुंडा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे. आम्ही इतका हुंडा दिला किंवा आम्ही इतका हुंडा घेतला या सारख्या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात. परिणामतः मुलींची संख्या हानिकारकरित्या घटली आहे. लग्नासाठी मुली नसल्याची चिंता आज त्यांना मोठ्या प्रमाणावर सतावत आहे.

हुंडाबंदी कायदा आणि समाज:
भारतीय समाजात हुंडाबंदी विरोधात सर्वप्रथम मुस्लीम समाजाने सामाजिक चळवळ उभी केली. इस्लाम हुंड्याची नव्हे तर मेहरची (मुलाने मुलीला द्यावयाची रक्कम) शिकवण देतो. म्हणून मुलीला तिचा धार्मिक हक्क मिळवून देण्यासाठी मुस्लीम समाजाने हुंडा विरोधी चळवळ उभी केली. यामुळे देशातील अनेक भागांत मुस्लीम समाजातून हुंडाप्रथा जवळपास हद्दपार झाली आहे.

कायदा आणि समाज:
हुंड्याला प्रतिबंध घालण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ तयार केला गेला आहे. परंतु कायद्याने समाज सुधारणा होत नसते तर सामाजिक सुधारणेसाठी सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे. आज हुंडाबंदी विरोधात मोठ्या प्रमाणात एक सामाजिक चळवळ उभी करणे सामाजिक गरज बनली आहे.

हुंडा नव्हे मेहर:
इस्लाममध्ये हुंडाप्रथा नाही. याउलट मेहरची संकल्पना आहे. मेहर म्हणजे ती अनिवार्य रक्कम जी वराने विवाह कराराच्यावेळी ‘सुरक्षा निधी’रुपात वधूला द्यायची असते. मेहर देणे अनिवार्य आहे. मेहर दिल्याशिवाय विवाह करार कायदेशीर वैधता प्राप्त करूच शकत नाही. मुस्लीम कायदेपंडितांनी मेहर न दिलेल्या विवाह कराराला अवैध घोषित केले आहे. काही कायदेपंडितांनी मेहर न देण्याच्या इच्छेने केलेल्या विवाहाला ‘व्यभिचार’ संबोधले आहे.

पवित्र कुरआनात आदेश देण्यात आला आहे. “स्त्रियांचे मेहर स्वखुशीने देऊन टाका.” (कुरआन : अध्याय ४ : संकेत ४) काही कारणाने विवाह करार संपुष्टात आला आणि तलाक घडला तरी पुरुषाने स्त्रीला दिलेला मेहर परत घेऊ नये अशी ताकीद कुरआन करतो. पवित्र कुरआनच्या वरील उल्लेखित अध्यायात आदेश देण्यात आलेला आहे, “जर तुम्ही पहिलीच्या जागी दुसरी पत्नी आणण्याचा संकल्प केलाच आहे तर (अशा परिस्थितीत) तिला तुम्ही ढीगभर संपत्ती जरी दिली असली तरी त्यातून अंशमात्रही परत घेऊ नका.” (कुरआन : अध्याय ४ : संकेत २०)

म्हणून आपण पाहू शकतो की देशात मुस्लीम समाजात हुंड्याची समस्या त्या प्रमाणात नाही ज्या प्रमाणात इतर समाजात दिसते. जेथे कोठे मुस्लीम समाजात हुंड्याची प्रथा आढळून येते तेथे प्रादेशिक संस्कृती आणि सभ्यतांच्या प्रभावाने ती आढळून येते. इस्लाम आणि मुस्लीम कायद्यामध्ये या प्रथेला समर्थन मिळण्यासाठी कोठेही वाव नाही. वरपक्ष वधुपक्षाकडून काही अपेक्षा करीत असेल तर मुस्लीम कायदा अशा विवाहाला अवैध ठरवितो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *