प्रकरण ४ – लोकहितवादी शासन

शिवाजी राजांचा संघर्ष हा मुस्लिमविरोधी नव्हता. शिवाजी राजे मुस्लिमद्वेष्टे नव्हते. त्यांना मुसलमानी सत्तांचा विध्वंसही करायचा नव्हता. त्यांना हिंदूचे राज्यही स्थापन करायचे नव्हते तर मग शिवाजी राजांना इतरांच्या तुलनेत इतके समर्थन प्राप्त होण्याचे कारण काय होते? आधुनिक इतिहासकारांनी शिवाजी राजांचे दैवतीकरण का करून टाकले? याचे वास्तविक उत्तर शोधण्यासाठी शिवचरित्राचा प्रामाणिकपणे अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्या इच्छा आणि अपेक्षांना शिवाजी राजांवर लादून शिवचरित्राचा अंग नि अंग, रूप नि रंग बदलून शिवाजी राजे कसे कळणार? अशा अभ्यासातून जे काही बाहेर येईल ते शिवाजी राजांचे तुम्हाला अपेक्षित असलेले रूप असेल. खरे शिवाजी राजे तर आत इतिहासातच बसलेले असतील. वाट पाहत की कोणीतरी येईल आणि त्यांची खरी ओळख जगाला करून देईल.

प्रा. नरहर कुरुंदकर म्हणतात, शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का उभे राहिले, हा पहिला प्रश्न आणि दुसरा, लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले? या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे.[1] आपले सारे पूर्वग्रह, आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा आणि आपल्या साऱ्या अपेक्षा बाजूला ठेऊन शिवचरित्राचा अभ्यास केल्यास जे शिवाजी राजे समोर येतात ते शिवाजी राजे लोककल्याणकारी राज्याचे ध्येय मनात बाळगणारे शिवाजी राजे आहेत. शिवाजी राजांनी लोक कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून ते राज्य सर्वजातीधर्मीय प्रजेला आकर्षित करू लागले.

गोविंद पानसरे लिहितात, शिवाजीचे कार्य सुरु झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत, असे शिवाजी सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण येऊ लागले. त्यांनी कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम झाले.[2]

मुस्लिम शासकांना त्यांच्या ‘परकीय’ असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राबविण्यासाठी ज्या मर्यादा येत होत्या, त्या शिवाजी राजांच्या मार्गात येत नव्हत्या. त्यामुळे शिवाजी राजांना सामाजिक कुप्रवृत्तींवर अंकुश राखण्यात यश मिळविता आले. याचा परिणाम असा झाला की प्रजा शिवाजी राजांच्या मागे उभी राहू लागली. या संदर्भातील काही दाखले गोविंद पानसरे यांनी आपल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात दिले आहेत. प्रा. न. देशपांडे लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे’चा दाखला देताना ते लिहितात, रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. गावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या तरण्या पोरीला दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष उचलून नेली अन भोगली. माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं, म्हणून पोरीनं जीव दिला. सारा गाव हळहळला. पण मुकाच राहिला.

शिवाजीच्या कानी ही गोष्ट आली. पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हातपाय तोडायची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर अमलात आली आणि साऱ्या मावळखोऱ्यात आश्चर्य पसरले. गरीब रयतेच्या पोरीची अब्रू घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचं पाहून रयत शिवाजीवर फिदा झाली अन रयतेच्या अब्रूरक्षणासाठी शिवाजी कार्य करीत असेल तर त्या कार्यासाठी मरायला तयार झाली.[3]

सेतू माधवराव पगडी लिखित ‘छत्रपती शिवाजी’चा दाखला देऊन पानसरे अशाच प्रकारची आणखीन एक घटना आपल्या पुस्तकात नोंदवितात. ते लिहितात, १६७८ मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचे नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने २७ दिवस किल्ला लढविला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकूण शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढावयास लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही. कारण  शिवाजीची भूमिका होती, “स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे. मग ती कुणी असो!”[4]

या दोन घटना काय दर्शवितात? सर्वसामान्य प्रजा शिवाजी राजांच्या मागे का उभी होती? ते मुस्लिमविरोधी होते म्हणून की त्यांचे राज्य लोककल्याणकारी होते म्हणून? अर्थातच याचे उत्तर हेच आहे की शिवाजी राजांचे राज्य लोककल्याणकारी होते म्हणून सर्वजातीधर्मीय प्रजा त्यांच्यामागे उभी राहिली. एक प्रश्न असाही निर्माण होतो की केवळ शिवाजी राजांचेच राज्य लोककल्याणकारी होते का? इतर शासकांचेही राज्यदेखील लोककल्याणकारी होतेच की! मग शिवाजी राजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत भिन्न ते असे काय होते? याचे उत्तर हे आहे की शिवाजी राजांचे राज्य एतद्देशीय होते. तत्कालीन शासकांचे शासन लोकहितवादी असले तरी ते एतद्देशीय नव्हते आणि जर का ते एतद्देशीय असले तर ते लोकहितवादी नव्हते. शिवाजी राजांच्या स्वराज्यात या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम झाला होता. एतद्देशीय लोकहितवादी शासन उदयास येऊ पाहत होते. तसेच आपल्या मातीतला कोणीतरी आपला राजा असावा कदाचित ही भावना शिवाजी राजांना सर्वसामान्य प्रजेमध्ये स्थान निर्माण करून देत होती. प्रा. नरहर कुरुंदकरांनी आपल्या ग्रंथात यावर सविस्तर चर्चा केली आहे. अगदी हीच बाब टिपू सुलतानच्या बाबतीतदेखील प्रेरक ठरली आहे.[5]

वरील दोन्ही घटनांचा संदर्भ देऊन पानसरे सवाल करतात, २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतातील ‘पुरोगामी’, ‘न्यायी’ महाराष्ट्र राज्यात आजही स्त्रियांवर बलात्कार होतात अन बलात्काराकडे दुर्लक्ष करणारे इतकेच नव्हे, तर बलात्कार करणाऱ्यास पाठीशी घालणारे शिवाजीच्या नावाने जयजयकार करतात आणि आपण शिवाजीचे वारसदार आहोत म्हणून सांगत फिरतात. समजा, शिवाजी आज आला तर या शिवभक्तांचे काय करील?[6]

स्त्रियांबाबत शिवाजी राजांचे धोरण समजून घेण्यासाठी आणखीन एक संदर्भ पाहूयात. जदुनाथ सरकार लिखित ‘शिवाजी आणि त्याचा काळ’चा दाखला देताना पानसरे लिहितात, त्या काळी शिवाजी महाराजांनी सक्त हुकुम दिला होता की, “मोहिमेस जाताना कुणीही बटकिणी, कुणबिणी अगर कलावंतीणीस बरोबर घेऊ नये. कुणाही स्त्रीस बटकिणी बनविता कामा नये.”[7]

[1] कुरुंदकर नरहर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य, पृ.१६
[2] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ. ८
[3] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ.१३
[4] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ.१४
[5] इतिहासकार सरफराज अ. रज्जाक शेख त्यांच्या ‘सल्तनत ए खुदादाद’ या मराठी ग्रंथात याबाबत सविस्तर चर्चा करतात.
[6] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ.१५
[7] पानसरे गोविंद, शिवाजी कोण होता? पृ.१५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *