कुर्बानीची पार्श्वभूमी

प्रकरण ३ रे

आजपासून ४००० वर्षांपूर्वी इराकमध्ये प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) या महापुरुषाचा जन्म झाला. त्यांनी आपल्या आयुष्यात पार पडलेल्या कामगिरीमुळे मानवी इतिहासात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. ज्या काळात त्यांचा जन्म झाला तो काळ ‘अंधकार युग’ म्हणून इतिहासात नोंदविला गेला आहे. अशा अंधकार युगात त्यांनी प्रकाशज्योत प्रज्वलित केली. त्याकाळी सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांची उपासना केली जात होती. शासकांना देवतांचे पुत्र मानले जात होते. देवपुत्र मानले गेल्याने त्यांचा वंश हा कायमस्वरूपी शासक असायचा. शासक आपल्या मर्जीचे मालक असायचे. जनता शासकांचीदेखील पूजा करायची. त्यांच्या प्रत्येक शब्दाला जीवनाचा उद्देश मानायची. त्यासाठी मरायची आणि मारायची! अशा काळात पुरोहितांच्या कुटुंबात प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो)[1] यांचा जन्म झाला. पुरोहित देवता आणि शासकांच्या दरम्यान मध्यस्थ होते. ते देवतांचे आदेश शासकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असत. तत्कालीन समाजाला अंधश्रद्धेत गुरफटून ठेवण्यात पुरोहितांचा सिंहाचा वाटा होता. शासकांना देवपुत्र ठरविणारे पुरोहितच होते. प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांच्यासमोर पुरोहितपदाची गादी तयार होती. ते त्या गादीवर विराजमान होऊ शकले असते. राज्यातील सर्वोच्च धार्मिक व्यक्ती बनण्याचा मान त्यांना मिळाला असता. परंतु ते इतरांसारखे नव्हते. कोणत्याही गोष्टीला न्याय आणि विवेकाच्या कसोटीवर घासल्याशिवाय मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेला पुरोहितवादाचा मार्ग नाकारला. त्यांनी आपल्या विवेकाला जागृत केले. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीवर चिंतन केले. समाजाच्या समस्या आणि त्यांचे मूळ शोधण्यासाठी ते चिंतन करू लागले. चिंतनाअंती त्यांनी आपल्या समाजाच्या अनेकेश्वरवादी अंधश्रद्धा नाकारल्या. समाजाने निर्माण केलेल्या देवतांच्या मुर्त्या त्यांनी नाकारल्या. निसर्ग पुजाणाऱ्या समाजात ते पहिले होते ज्यांनी निसर्गपूजनाला नाकारले. या संदर्भात पवित्र कुरआनात उल्लेख आलेला आहे तो असा,

“ते (इब्राहीम) एक सत्यवादी संदेष्टा होते. त्यांनी आपल्या पित्यास म्हटले बाबा! का बरं तुम्ही अशांची भक्ती करता जे न ऐकतात न पाहतात, न कोणत्याही प्रकारे तुमच्या कामी येऊ शकतात.” [2]

आपल्या भावी पुरोहितपदाच्या गादीला लाथाडून त्यांनी घोषणा केली, मी त्या देवतांना मानीत नाही ज्यांचे पुत्र असण्याचा दावा हे शासक करीत आहेत. त्यांनी तत्कालीन समाजाच्या सूर्य, चंद्र आणि नक्षत्र रूपातील असंख्य देवतांना मानण्यास नकार दिला आणि विवेकवादी तर्कशुद्ध एकेश्वरवादाची कास धरली. त्यांचे देवतांना नाकारणे केवळ अध्यात्मिक नव्हते तर शासकांच्या देवत्वाला उघड विरोधदेखील होता. देवता नाकारणे म्हणजे शासकांना देवपुत्र मानण्यास नकार देणे. त्या काळात शासकांना शासक बनण्याचा अधिकार यामुळेच मिळत होता कारण समाज त्यांना देवपुत्र मानीत असे. शासकांचे निर्णय देवाज्ञा म्हणून मान्य केली जात असे. यामुळे शासनाला अनिर्बंध अधिकार प्राप्त झाले होते, तर जनता कायम शोषित राहिली होती. पिढ्यानपिढ्याचे मालकी हक्क असलेली पुरोहितपदाची गादी लाथाडून त्यांनी विवेकाचा आवाज बुलंद केला. यासाठी आपल्या जीवाचीही पर्वा न करता भौतिक जगातील सर्वोच्च शक्तीच्या विरोधात जाण्याची तयारी दाखविली.

याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले. केवळ शासकच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, राज्याचा प्रत्येक नागरिक त्यांचा जीवाचा शत्रू झाला. त्यांच्या रक्ताचे घोट पिण्यासाठी त्यांच्यामागे लागला. समाजाची प्रत्येक व्यक्ती त्यांच्या विरोधात उभी ठाकली. राज्यात एकही व्यक्ती त्यांच्या समर्थनार्थ पुढे आली नाही. तरीही त्यांनी आपल्या समाजात सुधारणा घडविण्याचे प्रयत्न चालूच ठेवले. एके दिवशी शहरातील सर्व लोक उपासना स्थळापासून दूर गेले असताना त्यांनी स्वतः उपासना गृहातील साऱ्या मुर्त्या आडव्या पाडल्या. हातात हातोडा किंवा कुऱ्हाडी असणारी मोठी मूर्ती त्यांनी आहे तशीच ठेवली. जेव्हा लोक प्रार्थना स्थळाकडे आले तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितले कि या मोठ्या देवतेने छोट्या देवतांचे हे हाल केले आहे. साहजिकच त्यांना हे दाखवायचे होते कि या निर्जीव मुर्त्या देवता नाहीत. या घटनेने जनता त्यांच्यावर भडकली. देवतांची विटंबना केली म्हणून त्यांच्या समाजाने त्यांना ठार मारण्याचे ठरविले. या घटनेने क्रोधीत होऊन त्यांच्या पित्याने त्यांच्याशी जो व्यवहार केला त्याचा पवित्र कुरआनात उल्लेख आलेला आहे तो असा,

“तू (इब्राहीम) माझ्या देवतांपासून फिरलास की काय? तू जर परावृत्त झाला नाहीस तर मी तुला दगडांनी ठेचून काढीन.” [3]

जेव्हा घडलेल्या घटनेची माहिती राजाला मिळाली तेव्हा राजाने त्यांना धर्मद्रोहाच्या आरोपाखाली जिवंत जाळण्याची शिक्षा ठोठावली. प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांनी ती शिक्षा आनंदाने स्वीकारली. शासकीय दंडस्थळावर मोठी आग पेटविण्यात आली. राज्यभर दवंडी देऊन जनतेला बोलविण्यात आले. त्यांना सर्वांसमोर धगधगत्या अग्नीमध्ये जिवंत फेकण्यात आले. पवित्र कुरआनात याचा उल्लेख आला आहे तो असा,

“ते (लोक) म्हणाले जर तुम्हाला खरेच काही करायचे असेल तर या मनुष्याला जाळून टाका आणि आपल्या देवतांची मदत करा.” [4]

त्यांचा गुन्हा तरी काय होता? पुरोहिताच्या घरात जन्माला येऊन त्यांनी अनेकेश्वरवाद नाकारला होता. मुर्त्या नाकारल्या होत्या. शासकाला देवता मानण्यास त्यांनी नकार दिला होता. विवेकाच्या मार्गावर चालताना सारा समाज विरोधात उभा असताना आनंदाने मृत्यूला कवटाळून सत्यासाठी स्वतःचे बलिदान देण्यास ते तयार होते. अशा वेळेस अल्लाहने त्यांची मदत केली. त्यांना या अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर काढले. त्यांचा पालनकर्ता त्यांची मदत करतोय, त्यांच्या मदतीसाठी दैवी शक्ती कार्यरत आहे असे समजून शासकाने आणि जनतेने त्यांची वाट मोकळी केली. त्यांना राज्याबाहेर काढण्यात आले. प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांनी आपल्या सुखी आणि समृद्ध जीवनाचा त्याग करून वणवण भटकण्याचा मार्ग केवळ सत्यासाठी स्वीकारला. आपल्या राज्यातून बाहेर पडल्यानंतर ते जेथे जेथे गेले तेथे त्यांनी हाच संदेश दिला की ज्या ज्या नैसर्गिक वस्तूंना किंवा मूर्तींना तुम्ही देवता म्हणून पुजता त्या केवळ निर्मिती मात्र आहेत. शासक देवतांचे पुत्र नसून ते आपल्यासारखेच सामान्य मनुष्य आहेत. परिणामतः प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात शासक आणि जनता त्यांची शत्रू झाली. तसेच प्रत्येक राज्यातून त्यांना अनुयायीही मिळू लागले. अशाप्रकारे त्यांनी कित्येक राज्ये पालथी घातली. सर्व ठिकाणी हाच संदेश दिला की आपल्या वास्तविक निर्मात्याशिवाय इतर कोणालाही देवता मानू नका. त्यांच्या आवाहनाचा पवित्र कुरआनात उल्लेख करण्यात आला आहे तो असा,

“धिक्कार असो तुमचा आणि त्यांचा ज्यांची तुम्ही एकमात्र पालनकर्त्याशिवाय उपासना करता. तुम्ही बुद्धीचा वापर करीत नाही का?” [5]

शेवटी असे भटकंतीचे जीवन जगत असताना Palestine च्या भूमीवर ते स्थाईक झाले. उतारवयात म्हणजे नव्वदीच्या आसपास त्यांना आपल्या दुसऱ्या पत्नीपासून पहिल्या पुत्राची प्राप्ती झाली. आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना हे गोंडस बाळ झाले होते. त्याचे नाव त्यांनी इस्माईल ठेवले. उतारवयात इस्माईल आपला आधार बनेल या आशेने ते जीवन जगू लागले. त्यांनी आपले विचार इस्माईलच्या मनावर अलगद कोरले. मुलानेही ते विचार आत्मसात केले. आयुष्य संथगतीने व्यतीत होत असतानाच अल्लाहकडून इस्माईल आणि हाजरा[6] यांना मक्का[7] या निर्जन स्थळी सोडण्याचे आदेश देण्यात आले. अल्लाहच्या आदेशाला समर्पित होऊन त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलाला मक्का या ठिकाणी सोडले. काही वर्षे अशीच निघून गेली. आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी ते अनेकदा मक्केला जात असत. एका भेटीत त्यांनी रात्री एक स्वप्न पाहिले. पाहतात काय तर ते इस्माईलची कुर्बानी[8] देत आहेत. आपल्या स्वप्नाला ईशआज्ञा मानून त्यांनी पुत्राची कुर्बानी करण्याचे ठरविले. इस्माईल किशोरवयात आल्यानंतर अल्लाहकडून त्याची कुर्बानी देण्याची आज्ञा झाली होती. तेव्हा त्यांच्या मनावर काय गुदरली असेल हे त्यांनाच ठाऊक! त्यांनी आपल्या पुत्रास अल्लाहच्या आज्ञेसंबंधी सांगितले. पुत्राने आपल्या पित्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सहमती दर्शविली. जेव्हा आपल्या एकुलत्या पुत्रास कुर्बानी जमिनीवर पालथे पाडले, त्यावेळी त्या दोघांचा दृढ निर्णय पाहून अल्लाहने शेवटच्या क्षणी प्रतीकात्मक कुर्बानीसाठी त्यांच्यापर्यंत एक मेंढा पोहोचविला. आणि इब्राहीम (शांती व कृपा असो) यांना आज्ञा दिली की पुत्र इस्माईल यांची कुर्बानी न करता आम्ही पाठविलेल्या मेंढ्याची प्रतीकात्मक कुर्बानी करा. आपला एकुलता एक पुत्र ते अल्लाहच्या आज्ञेनुसार कुर्बान करतात की नाही ही त्यांची खरी परीक्षा होती आणि त्यात ते यशस्वी ठरले. पवित्र कुरआनात उल्लेख आलेला आहे,

“आणि जेंव्हा त्यांचा (इब्राहीम) मुलगा (इस्माईल) वयात आला आणि सहकार्य करू लागला तेव्हा ते आपल्या मुलास म्हणाले, ‘माझ्या मुला! मी स्वप्न पाहीले आहे की मी तुझी कुर्बानी करीत आहे. विचारपूर्वक सांग तुझे याविषयी काय मत आहे?’ तो म्हणाला, ‘बाबा! तुम्हांस जी आज्ञा दिली जात आहे त्यानुसार कृती करा. एकमात्र पालनकर्त्याने इच्छिले तर मी तुम्हाला संयमी आढळेन.’ आणि जेंव्हा दोघे पालनकर्त्याच्या इच्छेला पूर्णतः समर्पित झाले आणि त्यांनी आपल्या मुलास पालथं केलं. तेंव्हा आम्ही हाक दिली, ‘हे इब्राहीम! तुम्ही आपले स्वप्न खरे करून दाखविले. निश्चितच आम्ही सदाचारी लोकांना अशाचप्रकारे मोबदला देत असतो.’ खरोखर ती एक मोठी परीक्षा होती. आम्ही मोठ्या कुर्बानीऐवजी प्रतिकुर्बानी दिली.” [9]

कुर्बानीद्वारे अल्लाहने प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांची परीक्षा घेतली. आयुष्यभर आपल्या प्राणाची कुर्बानी देण्यास तयार असणारे इब्राहीम (शांती व कृपा असो) आपल्या एकुलत्या पुत्राची कुर्बानी करू शकतात का? सत्याप्रती अर्पण होण्याची त्यांची कितपत तयारी आहे? या गोष्टींची ही परीक्षा होती. आयुष्यातील अनेक परीक्षांप्रमाणे या परीक्षेतही ते यशस्वी ठरले. त्यांच्या सत्याप्रती असलेल्या त्याग आणि बलिदानाच्या भावनेमुळे प्रसन्न होऊन पालनकर्त्याने त्यांच्यावर आपल्या कृपाप्रसादाचा वर्षाव केला. अल्लाहच्या आज्ञेनुसार त्यांनी पुत्राच्या कुर्बानीच्या जागी पशुची कुर्बानी दिली. त्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानाच्या स्मरणार्थ मानवी इतिहासात त्यांना कायमस्वरूपी जिवंत ठेवण्यात आले. त्यांच्या अनुयायांना कायम त्यांची आठवण राहावी आणि त्यांच्या जीवन संदेशास समस्त मानव पिढ्यांत चर्चिले जावे म्हणून दरवर्षी या सणाद्वारे त्यांच्या समर्पित जीवनाचे स्मरण केले जाऊ लागले.

ईदच्या दिवशी त्यांच्या समर्पित जीवनाच्या आठवणी या दिवशी ताज्या केल्या जातात. त्यांच्या जीवनातून सत्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा घेतली जाते. कुर्बानीचा सण हा पशूंची हत्या करून साजरा केला जाणारा आनंदोत्सव नाही तर त्यांच्या त्याग आणि बलिदानाचा स्मरणोत्सव आहे! ज्याद्वारे सत्यासाठी आपल्या प्राणाची, प्राणाहून प्रिय वस्तूची कुर्बानी देण्याची भावना समाजामध्ये जागृत केली जाते.

इतिहासकारांनी प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांचा काळ आजपासून जवळपास ४००० वर्षांपूर्वीचा सांगितला आहे. बुद्धपूर्व १५०० वर्षांपूर्वी झालेल्या प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांच्या समर्पित जीवनातून प्रेरणा घेण्यासाठी कुर्बानीचा उत्सव ‘हज’ यात्रेच्या महिन्यात साजरा केला जातो. इतिहास प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांचा ‘राष्ट्रांचे पिता’ म्हणून गौरव करतो. ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम हे तिन्ही समुदाय स्वतःला प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांचे अनुयायी मानतात. काही ख्रिस्ती-हिंदू विद्वानांच्या मते हिंदू धर्मामध्ये प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांचा उल्लेख अभीराम या नावाने करण्यात आलेला आहे. परंतु मुस्लिम विद्वान याबाबतीत सहमत नाहीत. १४०० वर्षांपूर्वी झालेले अंतिम प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) इब्राहीमपुत्र इस्माईल यांचे वंशज. त्यांनी तोच धर्मसंदेश दिला, जो प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांनी दिला होता.[10] प्रेषित मुहम्मद (शांती व कृपा असो) कुर्बानीचे जनक नव्हे तर प्रचारक आहेत. कुर्बानी प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांच्या काळापासून आजपर्यंत अखंडपणे चालू आहे.

[1] प्रेषितांच्या नावाचा उल्लेख येताच त्यांच्यासाठी अल्लाहकडे ‘शांती आणि कृपेची’ दुआ करण्याची मुस्लिम परंपरा आहे.
[2] कुर’आन, अध्याय १९, मरयम, संकेत ४१-४२
[3] कुर’आन, अध्याय १९, मरयम, संकेत ४६
[4] कुर’आन, अध्याय २१, आंबिया, संकेत ६८
[5] कुर’आन, अध्याय २१, अंबिया, संकेत ६७
[6] हाजरा प्रेषित इब्राहीम यांच्या दुसऱ्या पत्नी आणि इस्माईल यांच्या माता.
[7] मक्का हे स्थान त्यावेळी निर्जन होते. पुढे हाजरा आणि इस्माईल यांनीच मक्केला वसविले. अरब लोक इस्माईल यांचे वंशज.
[8] कुर्बानीसाठी मराठी भाषेत कोणताही समांतर शब्द नाही, म्हणून मूळ शब्द वापरला आहे.
[9] कुर’आन, अध्याय ३७, साफ्फात, संकेत १०२-१०७
[10] कुर’आन, अध्याय ४२, शूरा, संकेत १३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *