कुर्बानीवरील आक्षेपांची उत्तरे

प्रकरण ५ वे

आक्षेप क्र. कुर्बानी म्हणजे बळीप्रथा आहे
काही लोक कुर्बानीला बळीप्रथा समजतात. वास्तविकतः कुर्बानी आणि बळी यामध्ये खूप मोठा फरक आहे. कुर्बानीचे मराठी भाषांतर बळी होत नाही. तसेच बळी देण्यामागचा उद्देश आणि कुर्बानी मागचा उद्देश यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. बळी देवतेला दिली जाते. बळीवर बळी देणाऱ्याचा कसलाही अधिकार नसतो. बळी नवस स्वरूपात दिला जातो. बळी देताना प्राणी देवतेला अर्पण केला जातो. परंतु कुर्बानीमध्ये तसे होत नाही. कुर्बानी एका उदात्त उद्देशाचे प्रतीकात्मक स्वरूप आहे. ईदच्या दिवशी प्रेषित इब्राहीम (शांती व कृपा असो) यांच्या कुर्बानीचे स्मरण करून ही जाणीव निर्माण केली जाते की आम्हाला यातून प्रेरणा घ्यायची आहे. खाण्यायोग्य चतुष्पाद[1] पाळीव पशूची कुर्बानी प्रतीकात्मक आहे. तसेच हे माहीत असावे की इस्लाममध्ये नवस स्वरुपात बळी देणे किंवा बळी दिलेल्या प्राण्याचे मांस खाणे निषिद्ध आहे.

आक्षेप क्र. २ – कुर्बानीमध्ये अन्नाची नासाडी आणि पैश्यांचा अपव्यय होतो
कुर्बानी त्याग आणि बलिदानाचा सण आहे. ज्यामध्ये लोक आपल्या चतुष्पाद पाळीव पशूची कुर्बानी देऊन हा समर्पणाची भावना जागृत करतात. कुर्बान केलेल्या प्राण्याचे मांस मांसाहार करणाऱ्या गोर-गरीबांमध्ये खाण्यासाठी वितरीत केले जाते. यामुळे अन्नाची नासाडी होत नाही. राहिला मुद्दा पैश्यांचा तर कोणत्याही समाजाचे सण-उत्सव त्या समाजाला एकात्म आणि संघटीत ठेवण्याचे माध्यम असतात. या एकात्मतेसाठी काही प्रतीकं निर्धारित केली जातात. उद्देशाच्या दृष्टीने मग त्या सणावर होणारा खर्च वगैरे गोष्टी शुल्लक असतात, दुय्यम दर्जाच्या असतात. आपल्या देशात १५ ऑगस्टला स्वतंत्र दिनानिमित्त आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त कोट्यावधींचा खर्च केला जातो. परंतु यावर कोणताही सच्चा राष्ट्रप्रेमी कधीच आक्षेप घेणार नाही. कोणीच असे म्हणणार नाही की, “या दोन दिवसांत देशाची कोट्यवधींची संपत्ती ‘बुडीत खात्यावर’ खर्च केली जाते. त्यातून काहीच उत्पन्न होत नाही. त्याचप्रमाणे १२५ कोटी नागरिकांचे २४ तास प्रत्येकी याप्रमाणे देशाचे १२५ कोटी दिवस म्हणजे जवळपास ३४ लाख वर्ष अर्थात २५०० कोटी तास वाया घातले जातात. इतका वेळ वाया गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान होते”. अगदी तसेच कुर्बानीचे आहे. सत्यासाठी आम्ही आमचे प्राण कुर्बान करण्यासाठी देखील तयार आहोत, याची प्रतीकात्मक ग्वाही आहे कुर्बानी!

आक्षेप क्र. एकाच दिवशी लाखो मुस्लिम लाखो प्राण्यांची हत्या करतात
एक आक्षेप असाही घेतला जातो की एकाच दिवशी लाखो प्राण्यांची हत्या केली जाते. तर प्रश्न असा आहे की जगात कोणत्या दिवशी प्राण्यांची हत्या केली जात नाही? जगात दररोज लाखो टन मांस खाल्ले जाते. प्रत्येक देशातून लाखो टन मासांची आयात आणि निर्यात केली जाते. आपल्या अहिंसावादी देशातून दररोज लाखो टन मांस निर्यात होते. अर्थात हे मांस निर्यात करण्यासाठी प्राण्यांची हत्याच करावी लागते. हे मांस आकाशातूनही खाली उतरत नाही की जमिनीतूनही उगवत नाही. जगातील जवळपास ८० टक्के पेक्षा जास्त जनता मांसाहारी आहे. त्यांची अन्न गरज पूर्ण करण्यासाठी दररोज लाखो जनावरे कापली जातात. त्यावर कधीही आक्षेप घेतला जात नाही. केवळ कुर्बानीवर आक्षेप कशासाठी? याचे प्रामाणिक उत्तर कुर्बानीवर आक्षेप घेणाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. कारण रोज केली जाणारी कत्तल आणि कुर्बानीच्या वेळेस केली जाणारी कत्तल यात काहीच फरक नाही. फरक असला तरी केवळ कुर्बानीमागच्या प्रेरणेचा! कुर्बानीच्या विरोधकांना मुस्लिमांच्या या प्रेरणेशी तर वैर नसेल ना?

तसेच कुर्बानी केवळ कुटुंब प्रमुखाने द्यायची आहे. कुटुंब प्रमुखाने केलेली कुर्बानी त्यांच्या कुटुंबाचे प्रतिनिधित्व करते. तसेच उंट आणि गाय-बैल सारख्या प्राण्यांमध्ये अनुक्रमे १० आणि ७ वाटेकरू सहभागी होतात. म्हणजे उंटाची कुर्बानी १० जणांची मिळून असते तर गाय-बैलाची कुर्बानी ७ जणांची मिळून असते. भारतात उंटाची कुर्बानी केली जात नाही. देशातील अनेक राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाल्याने मुस्लिम समाज बकऱ्याची कुर्बानी करीत आहे. बकऱ्याच्या कुर्बानीमध्ये वाटेकरू नसतात. देशातील बहुसंख्य मुस्लिम समाज दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतो हे सच्चर समितीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच बहुसंख्य मुस्लिमांची बकऱ्याची कुर्बानी करण्याची ऐपत नाही. गाय-बैलाच्या कुर्बानीत ७ वाटेकरू असल्याने प्रत्येकांस जवळपास ३५००/- रुपये द्यावे लागायचे तर बकऱ्याच्या कुर्बानीसाठी आता एका व्यक्तीस १२ ते १५ हजार रुपये मोजावे लागतात. अर्थातच हा खर्च मोठा असल्यामुळे आणि एकट्यानेच करायचा असल्यामुळे कुर्बानी करणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे.

आक्षेप क्र. ४ – कुर्बानी पशुदयेच्या विरोधी आहे
काही लोक कुर्बानीला विरोध करताना पशुदयेचा मुद्दा उपस्थित करतात. पशुदयेचा मुद्दा येथे निरर्थक आहे. मांसाहार योग्य आहे कि अयोग्य आहे हा चर्चेचा विषय असायला हवा. विरोधकांना मांसाहारच मान्य नसेल तर कुर्बानी हा विरोधाचा मुद्दा राहत नाही. त्यावेळेस मूळ विषयावर चर्चा करावी लागेल. मांसाहाराच्या टीकाकारांनी हे पटवून द्यावे लागेल की मांसाहार अयोग्य आणि चुकीचा आहे. जेव्हा मांसाहार चुकीचा सिद्ध होईल तेव्हा कुर्बानीचा प्रश्न उरतोच कुठे? परंतु कुर्बानीला विरोध करणाऱ्यांना मांसाहार मान्य असेल तर मग कुर्बानीला विरोध कसला? विरोधक स्वतः मांसाहार करण्यासाठी जनावराचा मुका घेऊन तर प्राण्याचा जीव घेत नाहीत किंवा तो प्राणी स्वखुशीने प्राणत्याग करीत नाही. कुर्बानी विरोधकांनादेखील मांसाहार करण्यासाठी प्राण्यांची कत्तलच करावी लागते. म्हणून पशुदयेच्या आधारवर किमान मांसाहारींनी तरी कुर्बानीला विरोध करू नये.

आक्षेप क्र. ५ – कुर्बानी एक अंधश्रद्धा आहे
कुर्बानीवर घेतला जाणारा आणखीन एक आक्षेप म्हणजे कुर्बानी एक अंधश्रद्धा आहे. प्रश्न हा निर्माण होतो की एखादी बाब श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे ठरविण्याचे साधन काय आहे? धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर भूमिकेतून श्रद्धा आणि अंधश्रद्धा ठरविल्या जाऊ शकत नाहीत. कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ठरविणे हे धर्मनिरपेक्ष आणि सेक्युलर क्षेत्राच्या अखत्यारीत येत नाही. केरळच्या एका शाळेतील ‘विटनेस फेथ’ या ख्रिस्ती संप्रदायाच्या मुलांनी राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला म्हणून शाळेने त्यांचे निलंबन केले. या प्रकरणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने म्हंटले, “कोणतेही धर्मनिरपेक्ष न्यायालय एखादी धार्मिक श्रद्धा योग्य की अयोग्य हे ठरवू शकत नाही.” असे म्हणून कोर्टाने विद्यार्थांचे निलंबन रद्द केले आणि हे निलंबन घटनेच्या कलम २५ द्वारे धार्मिक स्वातंत्र्याच्या विरुद्ध असल्याने नमूद केले.[2]

श्रद्धा आणि अंधश्रद्धा विज्ञानाच्या आधारावर निर्धारित केल्या जाव्यात असे काही जणांचे म्हणणे असते. तेव्हा आदरपूर्वक सांगावेसे वाटते की विज्ञान याबाबतीत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार राखत नाही. कारण विज्ञान भौतिक क्षेत्रापुरते मर्यादित आहे. अध्यात्म हा विज्ञानाचा विषय नाही. मग प्रश्न निर्माण होतो की कोणती बाब श्रद्धा आहे आणि कोणती अंधश्रद्धा हे कसे ठरवणार? याचे अधिकार कोणाकडे आहेत? तर या प्रश्नाचे साधे सरळ सोपे उत्तर आहे की हे अधिकार स्वतः धर्मसंस्थेलाच आहेत. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या बाबतीत धर्मसंस्थाच प्रमाण असू शकते. इतर कोणत्याही संस्थेला हा अधिकार नाही. धर्मानुसार जी श्रद्धा आहे तीच श्रद्धा असेल आणि जी बाब अंधश्रद्धा आहे तीच अंधश्रद्धा असेल. जर एखाद्या धर्मातील एखादी श्रद्धाच मुळात अंधश्रद्धा वाटत असेल किंवा एखादा धर्मच मुळात अंधश्रद्धांचे समर्थन करीत असेल तर ही बाब त्या धर्माच्या सत्यधर्म नसण्याचा उघड पुरावाच आहे.

आक्षेप क्र. ६ – अल्लाहच्या नावाने पशु कापणे निर्दयी कृत्य आहे
थोडा गांभीर्याने या आक्षेपाकडे पाहिल्यास समजेल की आक्षेप ‘अल्लाहच्या नावाने’ करण्याला आहे. विरोधक बांधवांना ‘अल्लाहच्या नावाने’ केले जाणारे कर्म म्हणजे भयंकर असे धार्मिक अनुष्ठान वाटते. यात त्यांचा कसलाच दोष नाही, दोष आहे सभोवतालच्या हिंसक वातावरणाचा. जेथे ते पाहत असतात की अधर्मांध[3] शक्ती धार्मिक घोषणा देऊन कशाप्रकारे दंगली घडविल्या जातात किंवा अल्पसंख्यांकांच्या कत्तली घडवितात. तेव्हा त्यांना असे वाटते की मुसलमान जेव्हा अल्लाहचे नाव घेऊन कुर्बानी देत असतील तेव्हा तेदेखील कदाचित असेच हिंस्र होत असतील. परंतु अल्लाहचे नाम स्मरण करणे मुस्लिमांचे नित्यकर्म आहे. मुस्लिम व्यक्ती आपल्या प्रत्येक सत्कर्मापूर्वी अल्लाहचे नाव घेत असते. पाणी पिण्यापूर्वी, जेवणापूर्वी, झोपण्यापूर्वी, झोपेतून उठताना, घराबाहेर पडताना, घरात शिरताना इतकेच काय तर पत्नीशी प्रेम करतानादेखील अल्लाहचे नाव घेतले जाते. म्हणून अल्लाहच्या नावाने कुर्बानी म्हणजे वेगळं काही नाहीच मुळात. प्रश्न हा निर्माण होतो की अल्लाहचं नाव घ्यायचंच कशासाठी? तर साधे सरळ सोपे उत्तर आहे. कृतज्ञतेसाठी! बाकी याच्या होणाऱ्या सकारात्मक मानसिक परिणामांवर चर्चा करण्याची ही जागा नाही.

आक्षेप क्र. ७ – जगात सर्वाधिक मांस मुस्लिमच खातात.
KFC च्या जगभरातील १८ हजार ८८७५ आणि Mc Donalds च्या जगभरातील ३६ हजार ८९९ शाखांमधून लाखो टन चिकन खाल्ले जाते. United Poltery Concern च्या अहवालानुसार जगभरात वर्षाकाठी ५ अब्ज कोंबड्या कापल्या जातात.[4] मांसासाठी दररोज ६० कोटी प्राण्यांची कत्तल केली जाते.[5] National Geographic च्या अहवालानुसार २०११ मध्ये जगात १३ लाख टन मांस खाल्ले गेले. २००१-२०११ या कालावधीत जगभरात बीफ खाणाऱ्याच्या संख्येत १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिकन खाणाऱ्याची संख्या ४५ टक्क्यांनी वाढली आहे. सागरी प्राणी खाणाऱ्याची संख्या ३२ टक्क्यांनी वाढली आहे. तर इतर मांस खाणाऱ्याची संख्या २१ टक्क्यांनी वाढली आहे. भारतात मागील दहा वर्षात बीफ खाणाऱ्याची संख्या २३ टक्क्यांनी घटली आहे. तर चिकन खाणाऱ्याची संख्या १३२ टक्क्यांनी वाढली आहे. सागरी प्राणी खाणाऱ्याच्या संख्येतदेखील ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर इतर मांस खाणाऱ्याची संख्या २० टक्क्यांनी वाढली आहे.[6]

भारतात दक्षिणेकडची केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील सात राज्ये मांसाहारी बहुल राज्ये आहेत. या राज्यांतील मांसाहारी जनतेचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गोवाची ८९ टक्के जनता मांसाहारी आहे. National Family Health Survey, 2015-16 च्या रिपोर्टनुसार देशातील ८० टक्के पुरुष तर ७० टक्के महिला मांसाहारी आहेत.[7] म्हणून केवळ मुस्लिम समाजालाच मांसाहारी समजणे चुकीचे आहे. खालील तक्ता पहा.

आक्षेप क्र. ८ – कुर्बानीच्या पद्धतीत सुधारणा होणे गरजेचे आहे.
कुर्बानीवर घेतले जाणारे आक्षेप ‘सुधारणावादी’ मानसिकतेतून घेतले जात असल्याचे सामान्यतः सांगितले जाते. सुधारणावाद हा मानवाचा नैसर्गिक स्वभाव आहे. जेव्हा जेव्हा तो चुका करतो तेव्हा अनुभवातून तो तुलनेने सुधारित पाऊल उचलतो, हाच सुधारणावाद आहे. ठेच लागल्यानंतर चालताना लक्षपूर्वक चालणे हादेखील सुधारणावादच आहे. अग्नीला हात लावल्याने हात पोळतो, हे कळल्यानंतर आगीत हात न घालणे हा लहान मुलांचा सुधारणावादच! वडिलांनी बांधलेल्या जीर्ण घरात राहणे धोक्याचे आहे हे कळताच त्याच्या जागी नवीन इमारत बांधणे हा देखील सुधारणावादच आहे. सुधारणावाद एका विशिष्ट गटाची मक्तेदारी असलेली ‘विचारसरणी’ नसून मानवात जन्मतः Inject करण्यात आलेला मुलभूत मानवी स्वभाव आहे.

सुधारणावाद काय आहे हे पाहताना सुधारणावाद काय नाही हेदेखील आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. एखाद्या क्षेत्रात सुधारणावादाच्या प्रवेशासाठी दोनच आधार असू शकतात. मुळात या दोन आधारामुळेच सुधारणावादी दृष्टीकोन जन्माला येतो. ते आधार म्हणजे एखादी गोष्ट समाजासाठी हानिकारक ठरत असेल किंवा उद्देश प्राप्तीसाठी अपुरी ठरत असेल तरच त्या क्षेत्रात सुधारणावादास वाव मिळतो, अन्यथा त्या क्षेत्रात सुधारणेस कदापि वाव मिळत नाही. या दोन आधारांचे अस्तित्व नसताना सुधारणावादाची मागणी होत असेल तर हा सुधारणावाद नव्हे वितंडवाद आहे. तसेच हे देखील लक्षात असू द्यावे की एखाद्या गोष्टीचे केवळ ‘प्राचीन’ असणे सुधारणेसाठी आधार होऊ शकत नाही.

एक उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूयात. भारतीय संविधान सुधारणावाद मान्य करतो. राज्यघटनेत सुधारणा केली जाऊ शकते हे आपल्याला माहित आहे. परंतु याचा अर्थ असा होत नाही की कोणीही कधीही कोणत्याही कलमात बदल करू शकतो. जर असा अर्थ होत असेल तर सुधारणेच्या नावावर राज्यघटनेस वाट्टेल ते रंगरूप दिले जाऊ शकते. राज्यघटना जुनी झाली चला त्यात सुधारणा करू म्हणून कोणीही उठेल आणि सुधारणा सुचवू लागेल. अशाने समाजात सुधारणा होणे दूरच उलट अराजकता निर्माण होईल. कोणतीही सामान्य ज्ञान असलेली व्यक्तीही अशा वेळेस हेच म्हणेल की सुधारणा करायची असेल तर प्रस्थापित घटनेत काय दोष आहे ते दाखवा. दाखवा की घटनेचे कोणते कलम देशासाठी हानिकारक सिद्ध होत आहे किंवा कोणते कलम घटनेच्या उद्देशाप्रती अपुरे सिद्ध होत आहे. असे असेल तरच सुधारणा होऊ शकते अन्यथा सुधारणेस कसलाही वाव नाही. मागील ६७ वर्षात घटनेत १०० पेक्षा जास्त सुधारणा झाल्या आहेत त्या याच दोन आधारांवर!

आता या दोन आधारांच्या प्रकाशात कुर्बानीची चर्चा करूयात. सुधारकांना सांगता आले पाहिजे कि कुर्बानी कोणासाठी कशाप्रकारे हानिकारक सिद्ध होत आहे? किंवा हे दाखविता आले पाहिजे की कुर्बानी आपल्या उद्देशाप्रती कशी अपुरी ठरत आहे? या व्यतिरिक्त जो काही आधार कुर्बानीवर आक्षेप घेण्यासाठी वापराला जाईल, तो आधार कुचकामी सिद्ध होईल. सुधारणेसाठी कसलाही आधार नसताना सुधारणावाद सुधारणावाद म्हणून आकांडतांडव करणे हा वितंडवाद आहे. एखाद्या प्रथा परंपरेचे केवळ प्राचीन असल्याने सुधारणेची संधी उपलब्ध होत नाही. सुधारणेसाठी हवे असतात सुधारणेचे मजबूत आधार!

[1] चार पायांचा शाकाहारी पाळीव प्राणी.
[2] The Telegraph, Wednesday,  August 24 , 2016
[3] मी धर्मांध हा शब्दप्रयोग करीत नाही. कारण धर्म व्यक्तीला डोळस बनवितो. तर अधर्म मानवाला अंधळा करतो.
[4] http://www.upc-online.org/chickens/chickensbro.html
[5] https://www.animalequality.net/food
[6] https://www.nationalgeographic.com/what-the-world-eats/
[7]https://www.thequint.com/news/india/many-indians-are-non-vegetarian-most-meat-eaters-in-kerala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *