About

 

माझा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी तालुक्यात झाला. प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातूनच झाले. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत तेरणा महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण प्राप्त केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी लातूरला गेलो. काही कारणामुळे पदव्युत्तर शिक्षण अर्धवट सोडावे लागले.

घरात शैक्षणिक वातावरण असल्याने मला लहानपणापासूनच वैचारिक पाया लाभला. वडील पोलीस दलात कार्यरत असल्याने सामाजिक प्रश्न आणि समस्यांकडे विविध दृष्टीकोनातून पाहण्याची संधी भेटली. सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी किती जरुरी आहे, याची जाणीव झाली, शासकीय पातळीवर यासाठी काय प्रयत्न केले जातात आणि समाजाकडून शासनाच्या काय अपेक्षा असतात, याची माहिती लहानपणापासूनच मिळत राहिली.

पोलीस लाईनमधील सर्वसमावेशक वातावरणात सर्व बालसंस्कार झाल्याने एक आदर्श भारतीय समाज कसा असावा? भारतीय घटनेतील सर्वसमावेशकता म्हणजे नेमके काय? सर्वधर्म समभाव कसा राखला जातो इत्यादी बाबी व्यवहारातून शिकण्याची संधी भेटली. शालेय जीवनापासून विविध सामाजिक उपक्रमात भाग घेतल्याने समाजिक प्रश्नांची उकल करीत खोलपर्यंत जाण्याची प्रवृत्ती निर्माण झाली.

माझे स्पष्ट मत आहे, “जगातील सर्व समस्यांचे मूळ “गैसमज” मध्ये दडले आहे! मग ते गैरसमज वयक्तिक पातळीवर असोत, कौटुंबिक पातळीवर असोत, सामूहिक पातळीवर असोत कि राजकीय पातळीवर. एकाच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल गैरसमज निर्माण होतात, वर्षानुवर्षांचे नातेसंबंध एका झटक्यात संपुष्टात येतात. पती पत्नीच्या मनात एकमेकांसंबंधी गैरसमज निर्माण होतात आणि सुखी कुटुंबाची राखरांगोळी होते. दोन समाजादरम्यान दरी निर्माण होते, अविश्वास निर्माण होतो, कारण एकच – गैरसमज! एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राच्या विरोधात युद्ध घोषित करतो. कारण एकच – गैरसमज.

हे गैरसमज दूर केले जाऊ शकतात. त्यासाठी केवळ इतकंच करायचं आहे की ज्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. चर्चेतूनच विचारांची देवाणघेवाण होईल, एकमेकांस समजण्यास मदत मिळेल आणि गैरसमज दूर होतील.”

ढोकी, शिरढोण, तेर आणि उस्मानाबादच्या मातीत लहानाचे मोठे झाल्याने महाराष्ट्राच्या विशेषकरून मराठवाड्याच्या मराठी मातीशी माझा भावनिक बंध अतिशय दृढ आहे. मराठी मातीतील मुस्लीम विचारवंत असल्याचा मला अभिमान आहे. स्वत:ला मर्द मराठी मुसलमान या नावाने संबोधने माझ्यासाठी गौरव आहे असे मी समजतो.